Wednesday, October 18, 2017
फिरंगी तडका -१० (हॉलंड)
नमस्कार खवैय्यांनो. फिरंगी तडकामध्ये तुमचे परत एकदा स्वागत आहे. मंडळी मागच्या भागात आपण नेदरलँड्स म्हणजेच हॉलंडची भटकंती करता करता तिकडच्या पारंपारिक ब्रेकफास्ट आणि लंचबद्दल माहिती घेतली. आज आपण डच लोक डिनर मध्ये काय काय खातात आणि त्यांना डेझर्ट म्हणून काय खाया आवडते हे बघणार आहोत. मंडळी, डच लोकांना इंग्रजांसारखेच लवकर डिनर करायला आवडते. स्पॅनिश व इटालियन लोकांप्रमाणे यांना रात्रीच्या जेवणाला फार उशीर करायला त्यांना आवडत नाही. अनेक डच परिवार त्यांच्या कुटुंबीयांसोबत जास्तीत जास्त संध्याकाळी सहा वाजता डिनर करणे पसंत करतात. पारंपारिक डच डिनर मध्ये ‘boerenkoolstamppot’ हा पदार्थ असतो. उकडलेला बटाटा बारीक करून त्यात cale म्हणजेच हिंदीत ज्याला आपण करम साग म्हणून ओळखतो ती भाजी घालतात आणि सोबत रुकवर्स्ट म्हणजेच स्मोक्ड सॉसेजेस घालतात. कधी कधी हिवाळ्यात त्यांच्या आवडीचे ‘erwtensoep’ म्हणजेच मटारचे सूप सुद्धा घेतात.
डिनर नंतर डेझर्टमध्ये बऱ्याच वेळा व्ला (vla)हे थंड कस्टर्ड डच लोकांचे अत्यंत आवडीचे आहे. हे व्ला डेझर्ट चॉकलेट ,स्ट्रॉबेरी , व्हॅनिला, बनाना , कॅरॅमल अशा अनेक फ्लेवर्समध्ये मिळते. डच लोकांना दुधाच्या पदार्थांबरोबरच गोड पदार्थ सुद्धा फार आवडतात. dropjes’ (Dutch liquorice) आणि ‘koekjes’ (डच बिस्किट्स) हे गोड पदार्थ हॉलंड मध्ये लोकप्रिय आहेत. लहान मुलांना pannenkoeken’ म्हणजेच पॅनकेक आणि ‘poffertjes' (मिनी पॅनकेक) खायला आवडतात. ह्या पॅनकेक ‘stroop’ म्हणजेच घट्ट डच सिरप बरोबर सर्व केल्या जातात आणि त्यावर भरपूर आयसिंग शुगर भुरभुरवलेली असते. इतर देशात पॅनकेक हा ब्रेकफास्टचा मेन्यू समजला जातो परंतु डच लोक लंच किंवा डिनर मध्ये पॅनकेक खाणे पसंत करतात. डच लोक हे गोड पदार्थ खात असले तरी त्यांचा खाण्यावर कंट्रोल असल्यामुळे आणि भरपूर सायकलिंग केल्यामुळे त्यांच्या देशात लठ्ठपणाची समस्या अजिबात नाही.
हॉलंडच्या लोकांमध्ये फास्ट फूड सुद्धा खूप लोकप्रिय आहे. त्यांच्याकडे कॉईन ऑपरेटेड मशीन्स असतात. त्यात पैसे टाकले कि आवडीचे पदार्थ येतात. हॉलंड मध्ये FEBO फूड जॉइंट्स फेमस आहेत. FEBO हे नाव ऍमस्टरडॅम जवळच्या Ferdinand Bolstraat ह्या रस्त्यावरून घेतले आहे. कारण त्यांचे पहिले आउटलेट ह्याच रस्त्यावर सुरु झाले होते. जगात जसे Mcdonalds प्रसिद्ध आहे तसे हॉलंड मध्ये FEBO प्रसिद्ध आहे. तिकडे बर्गर, फ्रेंच फ्राईज तर मिळतातच शिवाय ‘kroketten’, frikadel’ , ‘Vlaamse Friet’ , ‘patatje oorlog’, ‘Surinaamse broodje’ असे पदार्थ सुद्धा मिळतात. हे ऑथेंटिक डच पदार्थ आहेत. तुम्ही जर कधी ऍमस्टरडॅमला गेलात तर तिकडचे Poffertjes, Appetaart, Bitterbalen , Rookworst, Stroopwafels, Koffie Verkeerd, Hollandse Nieuwe Herring, Goudse Kaas, Chocoladetters, Drop, Stamppot, Hagelslag, Rijsttafel , Ossenworst, Oliebollen, Lekkerbejke/ kibbeling हे पदार्थ नक्की ट्राय करा. ह्यातील काही पदार्थ नॉनव्हेज आहेत. पण गोड पदार्थ खूप छान असतात.
हॉलंड मध्ये पाच प्रकारातून शेतमाल व पदार्थांचे उत्पादन केले जाते. शेती, ग्रीनहाउस, फळांच्या बागा, पशुपालन आणि मासेमारी. शेतीतून बटाटे, बीटरूट, हिरव्या शेंगा, गाजर, सेलेरी, कांदा, कोबी, ब्रुसेल्स स्प्राऊट, फुलकोबी, पालक, शतावरी, लेट्युस अशा भाज्या , ग्रीनहाउस मधून टोमॅटो, लेट्युस, काकडी, स्वीट पेपर असे उत्पादन होते. आणि फळांमध्ये सफरचंद , पियर, चेरी बेरीज, प्लम अशी फळे तिकडे तयार होतात आणि गायी, कोंबड्या, डुकरे, मेंढ्या हे प्राणी तिकडे विविध प्राणीजन्य उत्पादनांसाठी पाळले जातात. तसेच मासेमारीतून विविध प्रकारचे मासे मिळवले जातात. स्मोक्ड ईल आणि सॉस्ड हेरिंग हे डच क्विझीन मधील फेमस प्रकार आहेत.
आज आपण बघणार आहोत डच क्विझीन पैकी अत्यंत लोकप्रिय डिश जि तुम्हाला सुद्धा नक्की आवडेल.आपण भेटूच पुढील भागात एका नव्या देशाच्या नव्या माहितीसह. तोवर खाते राहो और खिलाते रहो.
रेसिपी- ‘erwtensoep’ डच पीज सूप
साहित्य- ६ कप व्हेजिटेबल स्टॉक, २ कप सोललेले मटार दाणे किंवा हिरवा वाटाणा , १ मध्यम आकाराचा कांदा , १ कप बारीक चिरलेले गाजर , २ सेलेरीच्या काड्या चिरलेल्या , २ लसूण पाकळ्या बारीक चिरलेल्या, अर्धा टीस्पून ओरेगॅनो, अर्धा टीस्पून ड्राय बेसिल , पाव टीस्पून जीरा पावडर, अर्धा टीस्पून मीठ, पाव टीस्पून काळीमिरी , ५ टेबलस्पून किसलेले गाजर, २ पातीचे कांदे बारीक चिरलेले
कृती- एका मोठ्या भांड्यात ६ कप व्हेजिटेबल स्टॉक, २ कप सोललेले मटार दाणे किंवा हिरवा वाटाणा , १ मध्यम आकाराचा कांदा , १ कप बारीक चिरलेले गाजर , २ सेलेरीच्या काड्या चिरलेल्या , २ लसूण पाकळ्या बारीक चिरलेल्या, अर्धा टीस्पून ओरेगॅनो, अर्धा टीस्पून ड्राय बेसिल , पाव टीस्पून जीरा पावडर हे सर्व एकत्र करा. आणि एक उकळी येईपर्यंत गॅसची फ्लेम हाय ठेवा आणि नंतर गॅसची आच कमी करून मटार/ वाटणे चांगले शिजवून घ्या. मधून मधून मिश्रण ढवळून घ्या. नंतर मीठ आणि काळीमिरी घालून गॅस कमी करून अजून १० मिनिट शिजवून घ्या. हे मिश्रण थंड झाले कि सर्व मिश्रणाची प्युरी करून परत पाच मिनिटांसाठी गरम करून घ्या. सर्व्ह करताना किसलेले गाजर आणि पातीचा कांदा घालून गरमागरम सर्व्ह करा.
- वैदेही राजे- जोशी
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment