Wednesday, October 18, 2017
फिरंगी तडका मोमोज स्पेशल
नमस्कार मंडळी!फिरंगी तडका मध्ये तुमचं परत एकदा स्वागत आहे. तर आज अनेकांच्या घरी वाजतगाजतआपल्या लाडक्या मंगलमुर्ती मोरयाचे आगमन होणार.गणपतीबाप्पा तुम्हा सर्वांना सुख ,समाधान, यश, उत्तम आरोग्याचा आशीर्वाद देवो! तुमची सगळी विघ्ने दूर करो. आज बाप्पाला सगळे वेगवेगळ्या प्रकारच्या मोदकांचा नैवेद्य दाखवणार. उकडीचे मोदक, तळलेले मोदक, काजू मोदक,ड्रायफ्रुट चे मोदक तसेच चॉकलेट मोदक आणि खवैय्यांच्या सुपीक डोक्यातून निघालेल्या अनेक रेसिपीज वापरून तयार झालेले विविध प्रकारचे मोदक आपण तयार करतो.
मोदकांवरून आठवले कि फक्त भारतातच नव्हे तर परदेशात सुध्दा गणेश चतुर्थी साजरी केली जाते. मौरीशस, कॅनडा , अमेरिका तसेच युके मध्ये सुद्धा उत्साही भक्त गणेशचतुर्थी साजरी करतात. इंडोनेशियात तर श्रीगणेशाची अनेक मंदिरे आहेत आणि त्यांच्या करन्सीवर सुद्धाविद्येची देवता म्हणून श्रीगणेशाचे चित्र आहे. आपले शेजारी म्हणजेच नेपाळ आणि श्रीलंकेत सुद्धा हिंदू लोक श्रीगणेशाची पूजा करून गणेशचतुर्थी साजरी करतात. आणि नैवेद्य म्हणून त्यांच्याकडचे स्पेशल पदार्थ असतात.
ह्यावरून एक जोक आठवला. मोमो म्हणजे काय तर मोदकाचा फॉरेनचा भाऊ! जोक्स अपार्ट मोमोज म्हणजे खरंच उकडीच्या मोदकांचेच एक व्हेरीयेशन आहे. ह्याचा आकार एकत्र आपल्या मोदाकांसारखा किंवा करंजीसारखा असतो. ह्या मोमोजचा उगम हिमालयाच्या परिसरात झाला. मुळचा नेपाळचा असलेला हा पदार्थ नंतर चीन, तिबेट, भूतान, मंगोलिया, कोरिया आणि जपान मध्ये जाऊन स्थिरावला. चीन मध्ये ह्या मोमोजना पिनयीन किंवा बओझी किंवा जियोझी म्हणतात तर मंगोलियात ह्या पदार्थाचं बारसं buzz असं झालं. जपानमध्ये मोमोजना ग्योझा तर कोरिया मध्ये मंडू असे म्हणतात.
पूर्वी मोमोज पारंपारिक पद्धतीने करायचे झाले तर मैद्याच्या पारी मध्ये तिबेटीयन लोक मांसाचे सारण भरत असत. ह्या पारीमध्ये चांगले टेक्स्चर येण्यासाठी हे लोक थोडे यीस्ट किंवा बेकिंग सोडा घालत असत. आता मात्र मोमोज मध्ये अनेक प्रकारची व्हरायटी आली आहे. ज्यांना मांस नको असेल त्यांच्या साठी भाज्या , टोफू , पनीर, चीज किंवा मउ छुर्पी(तिकडचे लोकल हार्ड चीज) ह्या पदार्थांपासून अनेक परम्युटेशन आणि कॉम्बिनेशन करत अनेक प्रकारचे मोमोज जगभरात बनवले जातात. मांसाहारी लोकांसाठी नेपाळ, भूतान, चीन ,जपान,कोरिया ह्या ठिकाणी चिकन, मटण, बीफ, मेंढीचे मांस, याक मीट वापरतात. ह्या सारणात ते कांदा, लसूण, आलं, कोथिंबीर, सोया सॉस आणि क्वचित कधीतरी tomato ची प्युरी सुद्धा वापरतात.
शाकाहारी लोक मोमोज मध्ये बारीक चिरलेल्या भाज्या जसे कोबी, बटाटा, गाजर, मश्रूम आणि आपापल्या आवडीच्या भाज्या घालतात. भारतात आणि नेपाल मध्ये भाज्या ,पनीर आणि चीज घालून केलेले मोमोज सर्वात जास्त लोकप्रिय आहेत. काठमांडू मध्ये खवा आणि साखर घालून केलेले गोड मोमोज अत्यंत प्रसिद्ध आहेत. (आपल्या गूळ खोबऱ्याचे सारण घालून केलेल्या उकडीच्या मोदकांचा हाच तो विदेशी भाऊ). हे मोमोज मुक्तु नावाच्या भांड्यात वाफवले जातात. काही ठिकाणी ज्यांना फक्त वाफवलेले मोमोज आवडत नाहीत ते लोक मोमोजना डीप फ्राय करतात किंवा अगदीच तेल नको असेल तर शॅलो फ्राय करतात . हे मोमोज एकतर सोया सॉस किंवा चिली सॉस बरोबर खाल्ले जातात. आपल्याकडे भारतात हे चटणी बरोबर सर्व केले जातात.
तर काय मंडळी मोमोजचे वर्णन वाचून तोंडाला पाणी सुटले असेल ना? चला तर मग पुढे दिलेली रेसिपी वाचा आणि पटकन मोमो बनवून त्यांचा आस्वाद घ्या!आपण भेटूच पुढील भागात!
गणपती बाप्पा मोरया!
व्हेजिटेबल मोमोज
साहित्य- पारीसाठी : मैदा -२ कप, तेल- १ टीस्पून, मीठ चवीनुसार, कोमट पाणी आवश्यकते नुसार
सारणासाठी – मध्यम आकाराचा कांदा -१ बारीक चिरून, हिरव्या मिरच्या- १-२ बारीक चिरून, आलं – अर्धा इंच बारीक चिरून, लसूण-२ ते ३ पाकळ्या बारीक चिरून, गाजर- पाउण कप बारीक चिरून, पानकोबी -१ कप बारीक चिरून, सोया सॉस – १ टीस्पून, साखर –पाव चमचा, मीठ चवीनुसार, काळीमिरी पूड- पाव चमचा
कृती- मोमोजची पारी बनण्यासाठी एका भांड्यात मैदा, तेल व मीठ एकत्र करून घ्या आणि हळूहळू कोमट पाणी घालून मऊ गोळा मळून घ्या. हा गोळा झाकून ठेवा. आता सारण बनवण्यासाठी एका कढईत थोडे तेल घालून त्यात लसूण घाला, एक मिनिट परतून घ्या. त्यात बारीक चिरलेली हिरवी मिरची, आलं घाला आणि व्यवस्थित ढवळा. ह्यात चिरलेला कांदा घालून कांदा गुलाबीसर होई पर्यंत तीन ते चार मिनिट परतून घ्या. नंतर ह्यात चिरलेले गाजर घालून तीन ते चार मिनिटे चांगले शिजवून घ्या व नंतर कोबी घालून चांगले आठ ते दहा मिनिटे शिजवून घ्या.(ह्याच वेळी तुम्ही ह्यात तुमच्या आवडीच्या आणखी भाज्या जसे मक्याचे दाणे, फुलकोबी, सिमला मिरची, ब्रोकोली, मटार, मश्रूम किंवा पनीर, टोफू घालू शकता). ह्यानंतर ह्यात सोया सॉस ,काळीमिरी पावडर, साखर,मीठ हे सर्व घालून नीट ढवळून घ्या. हे मिश्रण ओले चिकट किंवा पातळ असता कामा नये. आता हे मिश्रण थंड होऊ द्या.
आता मोमोज साठी भिजवलेला मैद्याचा गोळा परत दोन ते तीन मिनिटांसाठी नीट मळून घ्या. ह्या गोळ्याचे लहान लहान गोळे करून घ्या. आणि त्यावर थोडा कोरडा मैदा भुरभुरावा.आता मोदाकांसारखी पारी करून त्यात एक चमचा भरून वरील सारण घाला आणि मोदकांचा आकार देऊन मोमोज नीट बंद करून घ्या. सर्व मोमोज तयार होईपर्यंत आधी तयार झालेले मोमोज ओल्या फडक्या खाली झाकून ठेवा म्हणजे ते कोरडे पडणार नाहीत.
आता हे तयार झालेले मोमोज मोदक पात्रातकिंवा कुकर मध्ये मोदक जसे वाफवून घेतो तसेच १० मिनिटांसाठी वाफवून घ्या. गरमागरम मोमोजचा सॉस किंवा चटणी बरोबर आनंद लुटा.
वैदेही राजे –जोशी
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment