Thursday, September 8, 2016
रुणुझुणुत्या पाखरा...
रुणुझुणूत्या पाखरा , जा रे माझ्या माहेरा,
आली गौराई अंगणी तिला लिम्बलोण करा...
माझं माहेर सावली, उभी दारात माउलि
तिच्या काळजात बाई माया - ममतेचा झरा ..
आज सकाळपासून मनात सारख हेच गाण वाजतय! लग्न झाल्यापासून दर वर्षी आमच्या कडच्या दीड दिवसाच्या गणपतीचे विसर्जन झाले कि मला वेध लागतात ते
माहेरच्या महालक्ष्म्यांचे ... दर वर्षी आई बाबा सांगतात "आम्ही महालक्ष्म्यांना जातोय " तेव्हा खुप वाटतं कि आपणही जावं, परत लहान व्हावं, सणासुदीची मजा अनुभवावी, आई- बाबा , काका काकू, दादा -वहिनी, ताई ह्यांच्याकडून लहानपणापासून केलं गेलेलं माझ pampering परत एकदा अनुभवावं !
आज रोहन (माझा दादा) म्हणाला कि मी आपलं लहानपण, महालक्ष्म्यांची मजा, माहूरची ट्रिप सगळ खूप मिस करेन तेव्हा मन भूतकाळात गेलं! दर वर्षी महालक्ष्म्यांना जाणं हि किती आनंदाची गोष्ट् असायची! आई , ताई , काकू ह्यांना फुलोरा , आरास करतांना पाहणं , महालक्ष्म्यांना वाजत गाजत आणणं , त्यांना साड्या नेसवणं , दागिने घालणं , आरास करणं , मुखवटे बसवणं हे सगळं मोठी माणसं करत असताना मध्ये मध्ये लुडबुड करणं ह्यात खूप मजा यायची. दुसऱ्या दिवशी काकू- आई ह्यांना नैवेद्याचा सोवळ्यात स्वंयपाक करताना बघून, स्वैपाकघरातून रुचकर नैवेद्याचा घमघमाट येताना बघून पोटातली भूक चाळवली जायची. मग काकूंच्या हातचा उपमा, चिवडा -लाडू असा भरपेट नाश्ता सगळे बहीण भाऊ मिळून करायचो. त्यात मन आणि पोट दोन्ही मनसोक्त भरायचं ..
मग रोहन , मी , अजित दादा ,प्रसाद दादा आणि देवी अंगणातल्या स्वस्तिकाच्या झाडाची भरपूर फुलं काढायला जायचो. वैजू ताई ,वर्षा ताई एव्हाना भरपूर फुलं घेऊन हार करायला बसलेल्या असायच्या . हार करावा तर ह्यांनीच ! मी तर हार करायला ताईंकडूनच शिकले. भरगच्चं सुंदर हार घातलेल्या महालक्ष्म्या अजूनच सुंदर दिसायच्या. मग गुरुजी येऊन छान साग्रसंगीत पूजा सांगायचे . मग सगळ्यांनी मिळून छान आरत्या म्हणायच्या, धूप फिरवायचा, काजळ धरायचं आणि ते लगेच डोळ्यात घालायचं .. आणि मग पुसदचे स्पेशल पेढे प्रसाद म्हणून मनसोक्त खायचे. मग पंगतीमध्ये आई, ताई, काकू ह्यांना छोटे , कोरडे पदार्थ वाढायला थोडी मदत करायची आणि महालक्ष्म्यांचे विडे कसे तयार करतात ते बघायचं ! ह्या सगळ्यात दुपारचे तीन चार कसे वाजायचे कळायचंच नाही. दुपारची महापूजा आणि दगदग आटोपून सगळे निवांत बसलेले असताना कधी गप्पा, कधी अंताक्षरी ह्यात दिवस संपायचा.
दुसऱ्या दिवशी महालक्ष्मीची कहाणी वाचणे, गाठी पाडणे , अष्टक म्हणणे आणि पौतं बांधून मोठ्यांना नमस्कार करणे ह्यात सकाळची दुपार व्हायची. मग संध्याकाळी आई ,काकु छान साड्या नेसून हळदी - कुंकवासाठी तयार व्हायच्या आणि मला आणि देवी ला रोहन, प्रसाद दादा , अजित दादा आम्हाला पुसद चे फेमस गणपती बघायला न्यायचे. .मोठ्या दादा लोकांना दुसरं काम असलं तरी रोहन मात्र न चुकता दर वर्षी आम्हाला नक्की गणपती बघायला न्यायचा.
असे हे महालक्ष्म्यांचे तीन दिवस हसतखेळत कसे निघून जायचे कळायचं सुद्धा नाही. परत नागपूरला निघताना मन जड व्हायचं! तसंच ते आताही झालंय! ते नुसतं feeling nostalgic असं स्टेटस ठेवून सांगता येणार नाही.
पूर्वी मुलींना सासुरवास असायचा म्हणून हे माहेरवाशिणींसाठी खास सण असायचे ,तेव्हा मुली माहेरी येऊन जरा रीलॅक्स व्हायच्या. हल्ली आम्हा मुलींचे सासरी छान लाड होतात, कोडकौतुक होतं..तरीही माहेरच्या ह्या खास आठवणीने मन का हळवं होतं ?
-वैदेही राजे - जोशी
Friday, July 22, 2016
चक्रव्यूह
I beg to disagree !" अतिशय मंजुळ पण आत्मविश्वासपूर्ण आवाज कॉन्फरन्स रूम मध्ये घुमला आणि आपल्याच प्रेझेंटेशनमध्ये गुंगलेल्या हर्षदने अविश्वासाने मागे वळून पाहिले!
हर्षद क्षीरसागर, HK ग्रुपचा चेअरमन. फर्स्ट जनरेशन बिझिनेसमन. सेल्फ मेड मॅन. कोट्याधीश. आपले कोणतेही निर्णय कधीच चूक नसतात ह्याचा अभिमान बाळगणारा. आणि काही चुकले तरी "मेरे मन को भाया मै कुत्ता काट के खाया" ह्या टेचात वावरणारा. थोडक्यात आलम दुनियेची पर्वा न करता आपल्याच धुनकीत जगणारा मस्त कलंदर. त्याला विरोधाची सवयच नव्हती. त्याचे मुख्य कारण असे की त्याला विरोध करायचा म्हणजे त्याच्यापेक्षा जास्त अक्कल असणे आवश्यक होते किंवा नोकरी गमवायची तयारी आवश्यक होती. ह्या दोन्ही गोष्टींचा अभाव स्टाफ मेम्बर्सपैकी प्रत्येकात असल्याने कोणी त्याच्या वाटेला जात नसे. हर्षदही शक्यतो धंद्यात चुकत नसे. त्याचे आजवरचे बहुतेक निर्णय लॉन्ग टर्म मध्ये योग्यच ठरले होते. जे चुकले त्यातून त्याने स्वतः धडे घेतले होते. पण आजवर त्याला तू चुकतो आहेस हे सांगणारे ऑफिसात कोणीच भेटले नव्हते. त्यामुळे ते वाक्य ऐकून हर्षद अविश्वासाने मागे वळला. कॉन्फरन्स रूममध्ये दडपणयुक्त शांतता पसरली!
त्या आवाजाच्या दिशेने पाहात हर्षद म्हणाला "come again please!"
तोच आवाज आणखी निर्धाराने आला "मला हा निर्णय कंपनीच्या हिताच्या दृष्टीने जरा रिस्की वाटतो आहे. This will impact the top line badly and also the reputation of the organisation!"
मानसी पटवर्धन, फक्त हुशारीच्या जोरावर सीए आणि एमबीए करून दहा वर्षांचा अनुभव गाठीशी घेऊन HK मध्ये व्हीपी फायनान्स म्हणून काही दिवसांपूर्वीच रुजू झाली होती. HK मध्ये, विशेषतः हर्षद समोर डेसिग्नेशला फारसा अर्थ नसे. हर्षदने घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी करण्यासाठी पाचशेच्या वर स्टाफ पगार घेत होता. त्याच्या दृष्टीने त्यातीलच एक "जरा जास्त पगार घेणारी" ह्या पलीकडे फारसे महत्व नसलेली बाई आज त्याला मॅनेजमेंट टीम समोर चॅलेंज करत होती. चक्क तू चुकतो आहेस असे खुल्ला सांगत होती!
"ओह. आपण जे काही म्हणालात ते जरा डिटेल मध्ये समाजवाल का आम्हा सर्वांना?" इतके कुत्सितपणे म्हणत हर्षद त्याच्या गुबगुबीत चेयरमध्ये कॉफी सिप करत बसला आणि मानसीला समोर येऊन बोलायची त्याने सूचना केली. मानसी शांतपणे चालत पुढे आली आणि हर्षदचेच प्रेझेंटेशन एक एक स्लाईड करत दाखवत, त्यावर आपले मत मांडत आपले मुद्दे डेटा पॉइंट्ससह शाबीत करत गेली. हर्षदला तिची हुशारी, आत्मविश्वास, ज्ञान आणि मुख्य म्हणजे हिम्मत ह्याचे मनोमन कौतुक वाटत होते. तिचे प्रेझेंटेशन संपले. हर्षद हातात पेन फिरवत, पेनाकडे बघत विचारात गुंगला होता. दोन मिनिटे शांततेत गेली. सगळेजण हर्षदच्या प्रतिसादाची वाट बघत होते. अचानक हर्षद उठून उभा राहिला. बाकी सर्व लगबगीने उठले. "Gentleman let me think through this. Wait for my mail tomorrow." इतके म्हणून हर्षद निघून गेला. जाताना फक्त एक कटाक्ष मानसीकडे टाकून. ती शांतपणे आणि त्याच आत्मविश्वासाने उभी होती. सुंदर चेहर्यावर मोहक स्माईल लेऊन.
आपल्या केबिन मध्ये आल्यावर हर्षद विचारात पडला. म्हटलं तर त्याला मानसीचं डेरिंगबाज वागणं आवडलं होतं. पण कुठेतरी इगो दुखावल्यामुळे तिचा रागही येत होता. इतकी वर्ष आपल्या मनाला येईल ते डिसिजन घेणारा हर्षद आज विचारात पडला होता. इकडे ऑफिस मध्ये मात्र उद्या काय मेल येणार ह्याची कुजबुज सुरु होती. काही जणांना मानसीचे कौतुक वाटत होते. काही जेलस लोक कशी बॉस ची जिरली ह्याच विचाराने सुखावले होते तर कंपनीतल्या काही सिनियर लोकांना मानसीच्या जॉबची चिंता लागून राहीली होती कारण त्यांना त्यांच्या बॉसचा स्वभाव आणि आधीच्या एमप्लॉयीजचा इतिहास हे सगळे ठावूक होते.
“हर्षद सर , आठ वाजलेत. आजही उशिरापर्यंत काम करणार आहात का?” अरुणने म्हणजेच कंपनीतल्या प्यूनने त्याच्या बॉसला नेहमीप्रमाणे विचारले. “काका तुम्ही बाकी सगळं बंद करून व्हा पुढे. मी माझं काम झालं कि निघेन. मला आज वेळ लागणार आहे. तुम्ही जा घरी. उगाच तुमचा खोळंबा नको. चाव्या नेहमीप्रमाणे watchman कडे ठेवतो मी. “ हर्षद ने त्याच्या चांगुलपणाच्या नेहमीप्रमाणे प्यून ला घरी पाठवले आणि कामं करीत बसला. वर्कोहोलिक असलेल्या हर्षदच्या डोक्यात फक्त कामाचेच विचार असल्यामुळे लग्न बिग्नाचा विचार त्याने घरचे मागे लागून लागून कंटाळले तरी कधी केला नव्हता. म्हणूनच ऑफिस मध्ये उशिरापर्यंत काम करण्याची लक्झरी त्याच्याकडे होती. शेवटी जेव्हा भुकेची जाणीव झाली तेव्हा रात्री अकरा वाजता त्याने ऑफिस बंद केले आणि पार्किंग मधून बाईक काढून तो निघाला. एका कंपनीचा मालक असला तरी हर्षद ला चारचाकी गाड्यांचे कधीच आकर्षण नव्हते. त्याचे फर्स्ट लव्ह होते बाइक्स आणि स्पीड. नेहमीप्रमाणे हेल्मेट घालून निर्मनुष्य रस्त्याने तो निघाला. अशाच एका निर्मनुष्य गल्लीतून जाताना त्याला एक माणूस जखमी अवस्थेत जीव मुठीत घेऊन पळताना दिसला. आणि त्याच्या मागे दोन माणसे हातात कोयता आणि तलवार घेऊन त्याच्या मागे पळत होती. तो माणूस नेमका हर्षद च्या गाडी समोर येऊन पडला आणि त्याला वाचवायला म्हणून हर्षदने करकचून ब्रेक मारला आणि गाडी थांबवली. त्याला मदत करणार इतक्यात ती दोन माणसे आली आणि त्या जखमी माणसावर सपासप कोयत्याचे वार करून त्या माणसाला जागीच ठार केले. वर हर्षदलाही धमकी दिली कि ह्या प्रकरणाची कुठे वाच्यता केल्यास त्याची अवस्था सुद्धा त्या ठार मारलेल्या माणसासारखीच होईल. जे काय डोळ्यासमोर दिसतंय ते समजेपर्यंत ती माणसं निघून गेली होती आणि हर्षद समोर पडला होता एका अनोळखी पुरुषाचा रक्तबंबाळ मृतदेह. ते सगळं बघून हर्षदला घेरी आली आणि भयंकर भीती वाटली .त्याच्या अंगाला दरदरून घाम फुटला आणि त्याला त्या मारेकर्यांचे बोलणे आठवले. त्याने गाडीला किक मारली आणि तो कसाबसा घरी पोचला. त्याची तहानभूक सगळीच मेली होती. पायातील बूट काढून कसाबसा बेडवर आडवा पडला आणि त्याचे विचारचक्र सुरु झाले. त्याच्या मनात भीती बसली. आता ती माणसं आपला जीव तर घेणार नाही ना ? काय करावं आता? ती माणसं आपला पत्ता शोध घरी किंवा ऑफिस मध्ये तर नाही येणार ना?ह्या विचारांनी त्याचं डोकं भणाणून गेलं. ह्याच विचारात त्याला पहाटे केव्हातरी झोप लागली आणि जेव्हा जाग आली तेव्हा सकाळचे दहा वाजून गेले होते. हर्षदच्या आई वडीलांना हर्षद चे हे अनियमित रुटीन नवीन नव्हते.त्यामुळे रात्री उशिरा आला म्हणून आईनेही त्याला उठवले नाही. हर्षद उठला तेव्हा त्याचे डोके घणाचे घाव घातल्याप्रमाणे दुखत होते आणि ताप चढला होता. त्याने सेक्रेटरीला “आज येणार नाही” चा मेसेज टाकून घरीच आराम करण्याचे ठरवले. नाहीतरी कालच्या घटनेमुळे आज त्याचे लक्ष ऑफिस च्या कामात लागणे शक्यच नव्हते. त्याने आईला बोलावून औषध मागितले, आणि सेक्रेटरीला “ Not feeling well. On leave today. If anything urgent, let Mr. Pushkar handle the matter.” असा मेसेज टाकून तो परत बेड वर आडवा पडला. झोप येणे शक्यच नव्हते. “असे किती दिवस घरात बसून राहणार? किती नुकसान सहन करणार! I must tell this to someone. येस. पुष्कर.. पुष्करशी बोलायला हवे. पुष्कर नक्की मला मदत करेल.“ हर्षदने विचार केला व पुष्कर ला ऑफिस नंतर सरळ घरीच यायला सांगितले. पुष्कर म्हणजे हर्षदचा जवळचा मित्र. कंपनी सुरु झाल्यापासून त्याचा पहिला एमप्लॉयी आणि आता HK ग्रुप चा चेअरमन. हर्षद नंतर पुष्करच कंपनीचा सर्वेसर्वा होता.
संध्याकाळी पुष्कर आल्यावर हर्षदने पुष्करला सगळे सांगितले आणि हताशपणे शून्यात नजर लावून बसला. जे घडले ते ऐकून पुष्करलाही धक्का बसला पण त्याने हर्षद ला सांगितले कि “ टेन्शन घेऊ नकोस. ते लोक तुला काही करणार नाहीत. त्यांना तुला काही करायचं असतं तर कालच केलं असतं जे त्यांच्यासाठी सोपं होतं. फक्त आता हे सगळं विसरून जा आणि कुठेही वाच्यता करून स्वतःचा जीव धोक्यात घालू नकोस. आणि उद्यापासून तुझं रुटीन नेहमीसारखं सुरु कर. आणि त्या मिस.मानसीचे काय करायचे ठरवले आहेस?” हर्षदला पुष्करशी बोलून जरा हलके वाटले आणि त्याचे बोलणे पटले. त्याने सांगितले कि मानसीविषयी त्याने काही ठरवले नाही. पण मुलगी हुशार आहे आणि मुख्य म्हणजे धीट आहे. थोड कंट्रोल मध्ये ठेवायला हवी. कारण तिच्या हुशारीचा कंपनीला फायदाच होणार आहे. तिच्या सजेशन्स चा विचार केला जाईल. “चल बाय! उद्या सकाळी ऑफिसला भेटू!” असं म्हणून पुष्कर गेला. दुसर्या दिवशी सकाळी हर्षद नेहमीसारखा ऑफिसला पोचला. केबिन मध्ये जाताच त्याला त्याच्या टेबलवर एक envelope दिसले. त्यावर ना पाठवणार्याचे नाव होते ना पत्ता. त्याने उत्सुकता म्हणून ते उघडून बघितले तर त्यात एक ग्रीटिंग कार्ड होते, ज्यावर लिहिले होते कि “टेक केअर हर्षद. आय नो युअर लिटील सिक्रेट.” हे वाचून हर्षदला चक्कर आली आणि तो खुर्चीवर कोसळला. जरा भानावर आल्यावर त्याने पुष्करला केबिन मध्ये बोलावून घेतले. पुष्करसुद्धा ते कार्ड पाहून हादरला. पण त्याने हर्षदला शांत राहण्याचा सल्ला दिला. आणि सांगितले कि कदाचित कुणीतरी मुद्दाम मस्करी केली असेल. परत असं काहीतरी झालं तर बघू काय करायचं ते. हर्षद शांत झाला खरा पण त्याला हे प्रकरण काही सोपे वाटत नव्हते. आपलं मन तो कामात रमवण्याचा पुरेपूर प्रयत्न करत होता खरा पण त्याच्या मनातून कालची भयंकर घटना काही जात नव्हती. दोन तीन दिवस असेच गेले आणि एक दिवस हर्षदच्या घरी एक कुरियर आले. त्यावरही पाठवणार्याचे नाव पत्ता काहीही नव्हते. आणि परत एका ग्रीटिंग कार्ड वर एक मेसेज होता. “हाय हर्षद! पोलिसांकडे जायचा विचारही करू नकोस. नाहीतर माहितीये ना काय होईल? “ हे बघून हर्षदच्या पायाखालची जमीनच सरकली. त्याने pAnic होऊन पुष्करला बोलावून ते कार्ड दाखवले. आता मात्र पुष्करने हर्षद ला प्रोफेशनल हेल्प घेण्याचे सुचवले.
हर्षदचे contacs मोठे होते. त्यामुळे त्याने डायरेक्ट पोलीस कमिशनर अय्यर ह्यांची भेट घेऊन त्यांना सगळी कल्पना दिली. त्यांनी त्याला संपूर्ण सहकार्य करण्याबद्दल आणि त्याच्या सुरक्षेची काळजी घेण्याबद्दल आश्वस्त केले. त्यांचा खुनाचा तपास सुरुच होता त्यात त्यांना एक साक्षीदार सापडला होता. त्याने मारेकर्यांचे संपूर्ण वर्णन पोलिसांना सांगितले. दोन दिवसात पोलिसांनी खुन्यान्ना शोधून काढले. आणि तसे हर्षद ला कळवले. ती केस वैयक्तिक शत्रुत्वातून घडलेल्या गुन्ह्याची होती आणि मारेकरी सुद्धा हर्षद ला blackmail करू शकतील असे वाटत नव्हते. ते स्वतःच स्वतःच्या टोकाच्या रागातून घडलेल्या गुन्ह्यामुळे घाबरलेले होते. आणि हर्षद ने हेल्मेट घातलेले असल्यामुळे त्याला त्या लोकांनी पहिले नव्हते. गुन्हेगार पकडले गेले हि बाब पोलिसांनी जाहीर केली नाही कारण पोलिसांना हर्षदच्या blackmailers ना शोधून काढायचे होते. गुन्हेगार पकडल्या गेल्यामुळे हर्षद्ची भीती कमी झाली होती. तरी अनपेक्षित पणे परत त्याला एक निनावी ग्रीटिंग कार्ड मिळाले. ह्यावेळी परत त्याच्या ऑफिसच्या पत्त्यावर. त्यातही धमकीवजा संदेश होता. आता मात्र पोलिसांची खात्री पटली कि हे blackmailing कुणीतरी भलतीच व्यक्ती करतेय जिचा गुन्ह्याशी काहीही संबंध नाही.मात्र त्याला फक्त हर्षद ला मानसिक त्रास देण्यात रस आहे. पोलिसांनी हर्षदला परत परत आठवून बघायला सांगितले कि कोणाकोणाला ह्या घटनेबद्दल माहिती आहे. पण पुष्करखेरीज कुणालाही हर्षदने ह्या बाबतीत सांगितलेले नव्हते. संशयाची सुई पुष्कर वर आली होती पण पुष्करची चौकशी केल्यानंतर पोलिसांना तो निर्दोष आढळला.
दिवस जात होते पण blackmailerचा शोध काही केल्या लागत नव्हता. आणि हर्षदला धमकीवजा संदेश असलेले ग्रीटिंग कार्ड मिळतच होते. त्यावर काहीच लिहिलेले नसल्यामुळे कुणी पाठवले , कुठुन पाठवले ह्याचा थांगपत्ता लागत नव्हता. एक दिवस पुष्कर आणि हर्षद सगळे कार्ड्स घेऊन बसलेले असताना पुष्करच्या लक्षात आले कि सगळे कार्ड्सवरील हस्ताक्षर एकच आहे. त्याला ते हस्ताक्षर कुठेतरी पाहिल्याचे आठवत होते पण नेमके कुठे हे कळत नव्हते. पहिल्यांदा कार्ड ऑफिसच्याच पत्त्यावर आले म्हणून त्याला संशय ऑफिस स्टाफ वरच येत होता. त्याने हि गोष्ट अय्यर साहेबांच्या कानावर घातली . राहून राहून त्याला वाटत होते कि कोण अशी हिम्मत करेल? इतका टोकाचा सूड कोण उगवेल? हर्षद विषयी स्टाफ मध्ये असंतोष होता पण त्याचा सूड घेण्यासारखं कुणीच नव्हतं. पण पोलिसांच्या मते कोण कुणाचं काय बोलणं मनाला लावून घेईल ह्याचाही भरवसा नाही. म्हणून पोलिसांनी हर्षदला ऑफिस स्टाफच्या हस्ताक्षराचे नमुने पाठवायला सांगितले. पण तेही काळजीपूर्वक! कारण नमुने घेताना blackmailerला संशय येत कामा नये. इतके दिवस गुप्तता पाळली तर थोडक्याने गडबड व्हायला नको म्हणून एक दिवस हर्षदने टीम बिल्डींग activity च्या नावाखाली सर्व स्टाफ चे हस्ताक्षराचे नमुने मिळवले.
पोलिसांनी हस्ताक्षर तज्ज्ञाची मदत घेतली असता, त्यांना आढळले कि पंकजनामक सेल्स ऑफिसर च्या हस्ताक्षराशी ग्रीटिंग कार्ड मधील हस्ताक्षर मिळते जुळते आहे. हर्षद ला हे ऐकून धक्का बसला .कारण पंकज अतिशय शांत असं मुलगा होता. कामात कधीतरी काही चुका केल्या असल्या तरी तो कुणाच्या अध्यात न मध्यात असा होता. पण वेळी अवेळी कधीतरी त्यालाही हर्षदच्या फटकळपणाला सामोरे जावे लागले असल्याने त्याने असे केले असल्याची शक्यता होती.
पोलीस स्टेशन मध्ये पंकज, पुष्कर आणि हर्षद बसले होते. सुरुवातीला पंकजने सगळं कबुल करण्यास नकार दिला. पण पोलिसी खाक्याचा दणका बसताच त्याने कबुली दिली. “हो. मीच केलयं हे सगळं. मीच सरांना blackmail केलं. आयतीच संधी चालून आली होती मला . ती का सोडू मी? सगळ्यांना मानसिक त्रास देणाऱ्या हर्षद क्षीरसागर ला मी मानसिक त्रास दिला. कारण हा माणूस अतिशय स्वार्थी आणि घमेंडी आहे. अतिशय अहंकारी आणि आत्मकेंद्रित आहे. स्टाफला तर हा कवडीमोलाची हि किंमत देत नाही. कुणाच्या चुका समजून घेत नाही. मला तर किती वेळा अपमानित केलंय ह्याने. पण जेव्हा मानसीने ह्याला challenge केलं तेव्हा ह्याचा इगो दुखावला. मला भीती वाटली कि आता हा मानसी ला काढून टाकणार. मी मानसी ला पहिल्यांदा पाहिलं तेव्हाच तिच्या प्रेमात पडलो. आणि म्हणूनच तिच्यासाठी काहीही करायची माझी तयारी होती. त्या दिवशी जेव्हा मानसीने ह्याची चूक सर्वांसमक्ष दाखवली तेव्हा हा मानसी ला जॉब वरून काढून टाकणार असं वाटलं होतं मला. आणि इतक्या हुशार मुलीच्या करियरची वाट लागू द्यायची नव्हती मला. खरं तर तेव्हाच बोलणार होतो सरांशी. पण सर आलेच नाहीत आणि मग पुष्कर सरांना फोन वर बोलताना ऐकलं आणि त्यांचा तुमच्या घरापर्यंत पाठलाग केला. तुमच्या नकळत तुमचं सगळं बोलणं ऐकलं आणि ह्या आयत्याच चालून आलेल्या संधीचा फायदा घ्यायचं मी ठरवलं. मानसिक त्रास काय असतो ह्याची कल्पना आलीच असेल ह्या माणसाला. आता तरी पुढे माणसांशी वागताना नीट वागेल हा!” इतकं बोलून पंकज थांबला आणि म्हणाला “मला हवी ती शिक्षा द्या. पण मानसीला काढू नका!”
हे सगळं ऐकून हर्षदला धक्का बसला पण ह्यापुढे माणसांना कस्पटासमान न लेखता वागायचं त्याने ठरवलं. पुष्कर आणि पोलिसांच्या मदतीने खरा गुन्हेगार समोर आला होता आणि हर्षद चक्रव्यूहातून सहीसलामत सुटला होता.
-वैदेही राजे –जोशी
Wednesday, June 29, 2016
के दिल अभी भरा नही..
“अभी ना जाओ छोडकर ...के दिल अभी भरा नही...” निर्जराचे सख्खे शेजारी, देशपांडे काका चप्पल घालता घालता छान गुणगुणत होते. लिफ्ट कडे जाता जाता ते सहज तिच्या घरात डोकावले. “काय निर्जरा , आलीस होय ऑफिस मधून?” काकांनी सहज चौकशी केली. रोज करतात तशीच.. तिनेही हि हसून उत्तर दिले. “हे काय आत्ताच आले. पण तुम्ही पार्टी बिर्टी ला चाललात कि काय? इतके छान तयार होऊन निघालात म्हणून विचारलं!” तिने हि नेहमीसारखं विचारलं. “छे गं ! पार्टी बिर्टी काही नाही. ते नवीन नाटक आलय ना ‘दिल अभी भरा नही’ ते बघायला जातोय मित्रांबरोबर. राघव ने मस्त पहिल्या रांगेतली तिकिटं अधून आणलीयेत आमच्यासाठी आणि फार आग्रह केला कि आजोबा, हे नाटक बघाच एकदा, म्हणून जातोय गं, तेवढाच विरंगुळा!” आजोबा म्हणाले आणि पटकन गेले. वयाच्या ऐंशीव्या वर्षी सुद्धा आजोबांचा इतका सळसळता उत्साह पाहून तिलाच छान वाटलं. ती आत वळणार इतक्यात निर्जराचा नवरा रेयांश आला आणि घरात शिरता शिरता म्हणाला, “ ह्या देशपांडे आजोबांची पण कमाल आहे हा! ऐंशी वर्षाचे झाले पण म्हणे ‘दिल अभी भरा नही’ . अजून चाललेत नाटकं बघायला सूट बूट घालून! “ “अरे तुला काय करायचंय? जाउदे ना त्यांना! तू जा फ्रेश हो आणि चल चहा घे! ” निर्जरा वैतागून म्हणाली. ती दार लावणार इतक्यात तिला देशपांडे आजी दिसल्या.. डोळ्यात पाणी होते त्यांच्या! “बहुतेक रेयांशचं बोलणं ऐकलं त्यांनी! आता उद्या समजूत काढावी लागेल आजींची! ह्या रेयांशला कळतच नाही कुठे काय बोलावं ते! काय गरज होती असं बोलायची? “ असा विचार निर्जरा करत होती आणि आजींना बघून कसंनुस हसून तिने दार लावून घेतलं.
दुसर्या दिवशी संध्याकाळी निर्जरा जरा लवकरच आली. आली ते आजींशी बोलायचं हा निर्धार करूनच! तिने छान चहा केला आणि आजींना हाक मारली. तिला माहित होतं, संध्याकाळच्या वेळी अर्धा पाऊण तास एकट्याच असतात. “आजी येता का चहा घ्यायला? तेवढीच मला कंपनी मिळेल. नाहीतरी रेयांश आज उशिरा येणार आहे.” चहाच्या निमित्ताने निर्जराने आजींना घरी बोलावले. “आले हं! जरा देवाला दिवा लाऊन येते!” आजी येते म्हणाल्या तेव्हा निर्जराचा जीव भांड्यात पडला. कालच्या प्रकाराने आजी रागावल्या तर नसतील ना अशी तिच्या मनात धाकधूक होती. आजी तश्या प्रेमळ होत्या आणि निर्जराला सुद्धा कोणालाही दुखावणे आवडत नसे. म्हणून झाला प्रकार त्यांनी फार मनाला लावून घेतला नसावा असे निर्जराला वाटले. निर्जरा ने दोन कपांमध्ये चहा ओतला , जोडीला छान बिस्किटं प्लेट मध्ये रचून ठेवली तेवढ्यात आजी आल्याच.
दोघी एकत्र डायनिंग टेबल वर बसून चहा घेऊ लागल्या. “छान झालाय हं चहा..बरं झालं बाई तू आज चहाला बोलावलंस ते.. नाहीतर ही संध्याकाळ ची वेळ अगदी नकोशी वाटते ग घरात एकटीला. घरात सगळं छान असूनसुद्धा हे कातरवेळ हुरहूर लावते बघ जीवाला.” आजी म्हणाल्या. “आजी, हेही तुमचच घर आहे. या कि रोज चहाला. मलाही छान वाटेल.” निर्जरा म्हणाली. “आजी ..एक विचारू का? काल रेयांश जे आजोबांविषयी बोलला ते ऐकून तुम्हाला वाईट वाटलं असेल ना! खरं तर त्याच साठी मी आज तुम्हाला त्याच्या वतीने सॉरी म्हणायला म्हणून मुद्दामच बोलावले. त्याच्या मनात तसं काहीच नव्हत हो! आपला सहज परिणामांचा विचार न करता बोलून गेला तो! माफ करा आजी त्याला! मला माहितेय तुम्हाला खूप वाईट वाटले असणार. पण तरी तुमचा नातू समजून त्याला माफ करा.” निर्जरा कळकळीने बोलली. “निर्जरा अगं इतकी माफी वगैरे मागायची काहीच गरज नाही.. मला जसा राघव तसाच रेयांश. तू वाईट वाटून घेऊ नकोस. काल रेयांश चे बोलणे ऐकून मला वाईट वाटले होते पण ते तेवढ्यापुरतेच. नंतर मी तो विषयच सोडून दिला.. अगं तुम्हा तरुण मुलांच्या मनात हे येणेही अगदी साहजिक आहे कि संपूर्ण आयुष्य गेल्यावर आता म्हातारपणी कशाला बाहेर फिरायचं? नाहीतरी आपल्याकडे पूर्वीपासून अशीच मानासिकता आहे की म्हातारपणी आपापल्या खोलीत बसावं ,जगापासून अलिप्त राहावं आणि मरणाची वाट बघत हरी हरी करावं. पण ज्याच्यावर वेळ येते ना, त्यांच्यासाठी हे खूप कठीण असतं गं!” आजी पोटतिडकीने मन मोकळं करत होत्या आणि निर्जरा मन लावून आजींचे बोलणे ऐकत होती.
“अगं आम्ही सुद्धा आधी ह्याच मानसिकतेचे होतो. एका विशिष्ट वयानंतर सणासुदीला नवीन कपडे घेणं , बाहेर येण जाणं कमी केलं होतं , सगळ्यातून अलिप्त राहू असच ठरवलं होतं. अरुण आणि कल्याणी अगदी प्रेमाने आमचं सगळं करत होते . आम्हाला हवं नको ते सगळं छान बघतात ती दोघं, नातवंड म्हणजे तर अगदी आमचे जणू मित्रच होते नि आहेत. तरी आमच्यासाठी त्यांनी आपापली कामे का सोडायची? त्यांनाही त्यांचं आयुष्य आहेच कि! मुलं आपापल्या व्यापात असतात नि मोठ्या शहरात नोकरीच्या ठिकाणाहून परत यायलाही उशीर होतो. अशावेळी संध्याकाळची वेळ अगदी आम्हाला दोघांना नको वाटायची. हुरहूर लागायची जीवाला. हे तर अगदी खचल्यासारखे दिसायचे आणि माझ्या डोळ्यात का कुणास ठावूक पाणी यायचं. शेवटी आमच्या मुलांनाच आमचं हे अलिप्त वागणं आणि आमची मानसिक अवस्था बघवली नाही आणि एक दिवस त्यांनी आम्हाला समोर बसवून विचारलच कि त्यांचं काही चुकतंय का ! आम्हाला का इतका त्रास होतोय! आम्हालाही कारण कळेना गं! आणि त्यांनी आमचं कौन्सिलिंग का काय म्हणतात तेच केलं! आणि आम्हा दोघांनाही त्यांचं बोलणं पटलं कि म्हातारे झालो म्हणून सकारात्मक राहणं का सोडायचं? छोट्या छोट्या गोष्टीत आनंद घेणं का बंद करायचं? ह्या वयाला हे शोभत नाही, ते करणं चांगलं दिसतं का ह्या समाजाच्या बंधनात का अडकवून घ्यायचं स्वतःला? कशासाठी म्हातारपणाला शाप समजून नकारात्मक विचारात मृत्यूची वाट बघत दिवस ढकलायचे? उलट देवाने इतकं छान बोनस आयुष्य दिलाय ते आनंदात जगायचं. छान आवडी निवडी , छंद जोपासायचे! नवीन पिढीशी, त्यांच्या तंत्रज्ञानाशी ओळख करून घ्यायची, त्यांच्यात सामील व्हायचं म्हणजे सकारात्मकता वाढायला मदत होते. सूर्यास्ताची जर हुरहूर वाटते तर त्या सुर्यास्ताच्याच वेळी छान आपल्या आवडीच्या गोष्टी करण्यात वेळ व्यतीत केला तर कशाला हुरहूर वाटेल? हो कि नाही? म्हणूनच संध्याकाळी हे त्यांच्या मित्रांच्यात वेळ घालवतात आणि आनंदी राहत्तात आणि ह्यांना असं उत्साही बघून मीही मुला सुनांच्या आवडीचे पदार्थ करण्यात वेळ घालवते. थोडं वाचन करते, मनाला वाटेल ते करते. बरोबर कि नाही? बघ बोलत काय बसले मी! आज मस्त शेवपुरी करणार आहे घरी, त्याची तयारी करायची आहे. आमच्या कल्याणीला फार आवडते .तुलाही आवडत असेल ना? झाली कि हाक मारते हो तुलाही..चल येते मी.” असं म्हणत आजी उठल्या. “हो आजी ..नक्की हाक मारा मला.. मी येईन मस्त शेवपुरी एन्जॉय करायला! “ निर्जरा म्हणाली. तिला आजी आजोबांचे त्यांच्या सकारात्मकतेबद्दल खूप कौतुक वाटत होते आणि आजी रागावल्या नाहीत हे ऐकून हायसे आणि मोकळेही वाटत होते.
वैदेही राजे- जोशी
Thursday, June 16, 2016
आणि नर्मदा बोलावत होती.
रात्रीचे दोन वाजले आणि कावेरी आजींना जाग आली. परत डोळा लागेना म्हणून पाणी प्यायला उठल्या. बघतात तर काय नरेश , त्यांचा नातू , त्याच्या बिछान्या वर नव्हता. आजींच्या काळजात धस्स झाले. घरात सगळीकडे त्यांनी शोधले पण नरेश कुठेही दिसत नव्हता. त्यांनी घाई घाईने त्यांच्या नवर्याला म्हणजेच सुधाकर रावांना उठवले. "अहो.. अहो उठा ना.. बघा ना आपला नरेश परत दिसत नाहीये. कुठे गेला बघा ना.. अहो झोपलात काय? उठा आणि शोधा त्याला." आजी जिवाच्या आकांताने आजोबांना उठवत होत्या. आजोबा ताडकन उठून बसले. "काय गं काय झाले? इतकी का घाबरलियेस तू? " आजोबांनी आजीला विचारले. "अहो घाबरू नको तर काय करू! आपला नरेश कुठेतरी निघून गेलाय रात्रीचा! बघा ना.. शोधून आणा ना त्याला. अहो तिकडे नदीवर तर गेला नसेल ना? काय करायचे आपण आता? अहो बोलावा ना कुणालातरी.. आणा ना त्याला शोधून.." आजी आता रडायला लागल्या होत्या. " अगं पण आपण इतकी काळजी घेऊन परत असं कसं झालं? आता त्याच्या बापाला काय तोंड दाखवणार आपण?" आजोबा कपाळावर हात मारून मटकन खाली बसले. "अहो बसलात काय? उठा ना.. आणा त्याला शोधून. तुम्हाला मेलं वेळेवर काही करायच सुचत नाही. मीच बघायला हवं आता." अस म्हणून पदर खोचून ओसरीवर येऊन आजींनी त्यांच्या नोकराला गणूला हाक मारली.
वयाच्या ऐंशिव्या वर्षी सुद्धा आजी खमक्या होत्या. पण आजोबा मात्र आता थकले होते. "गणू ए गण्या .. अरे ए गणू.." आजींनी गणूला आवाज दिला तसा गणू धावत पळत ओसरीवर आला. "काय झाल वैनीबाई? कशापाई रातीचा आवाज देतया? मालक बरे हाइती नं वं? " "अरे गणू नरेश घरात नाहीए. रात्री झोपताना नीट होता. रात्रीचा कुठे जाउ नकोस म्हणून त्याला बजावले देखील होते. सगळी दारं खिडक्या कुलुपबंद करून त्याला झोपवले होते रे..पण आता बघ ना अचानक कुठे नाहीसा झाला कळतच नाहीए. जा जरा बघून ये परत नदिपाशी नाही ना गेलं माझं लेकरू!! जा आणि त्याला घेतल्याविना परत येऊ नकोस." आजींनी फर्मान सोडले. "व्हय वैनिबाई..आत्ता आणतो बघा धाकल्या मालकास्नी हुडकून..तुमि कायबी काळजी करू नगसा..” अस म्हणत गणू नरेश ला शोधायला गेला. इकडे कावेरी बाईंनी दारात भांडं उपड घालू ठेवल आणि त्या देवाचा धावा करत बसल्या. पण त्याचं लक्ष लागतय कुठे! “काय गं.. इथे काय दाराशी बसलीयेस? गणू ला सांगितलस ना नरेश ला शोधायला? येईल बघ तो.. तू आत चाल बरं!” आजोबांच्या ह्या बोलण्याने आजी भानावर आल्या. “ हं! हो! येते!” असं म्हणून आजी आत आल्या खर्या पण मनातून त्या खूप अस्वस्थ व घाबरलेल्या होत्या. “अहो! गिरीजा नसेल ना घेऊन गेली त्याला?” असं हळू आवाजात आजोबांना म्हणाल्या.
गिरीजाचं नाव काढल्याबरोबर आजोबा सुद्धा घाबरले. पण उसनं अवसान आणून म्हणाले. “नाही गं! असं कुठे असतं का? ती गेली त्याला २५ वर्ष झालीत आता. इतक्या वर्षांनी कशाला असं काही होईल? असं काही नसतं ! तू उगाच नसत्या शंका काढून जीवाला घोर लावू नकोस.” आजोबा असं म्हणाले खरे पण त्यांनाही तीच भीती वाटत होती जी आजींना वाटत होती. गिरीजा म्हणजे कावेरीबाई व सुधाकर राव ह्यांच्या एकुलत्या एक मुलाची म्हणजेच राजेंद्रची बायको. एकदम शांत , गुणी व सालस मुलगी. एखाद्याला सून म्हणून व बायको म्हणून हवी असे तशीच होती गिरीजा. लग्न करून सासरी येताच तिने तिच्या स्वभावाने व गुणांमुळे सर्वांचे मन जिंकले. पण कुणाची तरी दृष्ट लागली आणि गिरीजाचे आयुष्य उध्वस्त झाले.लग्नाला ५ वर्ष झाली तरी गिरीजाकडे गोड बातमी नव्हती. छोट्या गावात राहणार्या ह्या कुटुंबाला हि गोष्ट म्हणजे गिरीजाचा घोर अपराध वाटू लागला. सर्वांचे गिरीजाशी वागणे बदलले. अगदी राजेंद्रचे सुद्धा! त्यालाही ती डोळ्यापुढे नको असायची. पण गिरीजा मात्र शांतपणे नशिबाचे भोग म्हणून हे सगळं सहन करत होती. टोमणे ऐकून घेणं, कुजकट बोलणी ऐकणं , शुभ कार्यात तिला न बोलवणे हे तिच्यासाठी नित्याचेच झाले होते. पण जेव्हा तिला कळले कि तिच्या सासरचे राजेंद्रचे फक्त वंशाच्या दिव्याच्या अट्टाहासापायी दुसरे लग्न लावून देत आहेत तेव्हा तिच्या सहनशक्तीचा कडेलोट झाला आणि तिने सर्व शक्तीनिशी ह्याचा विरोध केला. पण तिचे प्रयत्न तोकडे पडले आणि राजेन्द्र्चा दुसरा विवाह लावून देण्यात आला. ज्या दिवशी गिरीजाची सवत घरात आली त्याच दिवशी सासरच्यांनी गिरिजाला कायमचे माहेरी निघून जाण्यास सांगितले. गिरीजा मानी होती. ती माहेरी गेली नाही. घरातून तर ती बाहेर पडली. पण जाता जाता संध्याकाळच्या वेळी ती म्हणाली. “ज्या वंश्याच्या दिव्याखातर तुम्ही घराच्या लक्ष्मी ला बाहेर काढत आहात, त्याच वंशाच्या दिव्याला एक दिवस मी घेऊन जाईन. हा माझा शब्द आहे. “ ती घराबाहेर पडली आणि नंतर कुणाला सापडलीच नाही. गावातल्या काही लोकांनी तिला गावाबाहेर जो नर्मदेचा प्रवाह वाहत होता तिकडे जाताना पाहिले ते शेवटचेच. नंतर तिचे प्रेतही सापडले नाही. इकडे राजेंद्र आणि त्याचे घरचे ब्याद गेली म्हणून निश्चिंत होते. पण कावेरीआजी मात्र धास्तावलेल्या असायच्या. उगाच बोला फुलाला गाठ नको म्हणून त्यांनी राजेंद्र ला नोकरीसाठी शहरात पाठवून दिले व नरेश च्या जन्मानंतर त्याला बजावले कि चुकून सुद्धा गावात यायचे नाही. उलट आम्हाला आठवण आली कि आम्हीच शहरात येऊन तुमची भेट घेऊ.
आणि आज तब्बल २५ वर्षांनंतर नरेश एकटाच गावाला आला होता. त्याने त्याचे शिक्षण पूर्ण झाल्याच्या निमित्ताने बाबांकडे हट्ट केला होता कि मला एकदाच गावाला जाऊन येऊ द्या. फक्त दोन दिवस! मुलाचे मन बापाच्याने मोडवेना म्हणून राजेंद्र ने नरेश ला आजी आजोबांकडे पाठवले ,पण बाजावूनच कि आजी आजोबा सांगतील तसच वागायचं , उगाच गावात इकडे तिकडे अनोळखी ठिकाणी भटकायला जायचे नाही. नरेश ने बाबांना वचन दिले कि तो त्यांना काळजी वाटेल असे काहीही करणार नाही. आणि तो बस ने गावाला यायला निघाला. गावाला पोचल्यावर रिक्षा वगैरे च्या भानगडीत न पडता त्याने गाव बघायला मिळेल म्हणून सरळ चालत घरी जायचा निर्णय घेतला. घराकडे जात असताना का कुणास ठाऊक पण कुठल्याश्या अनामिक ओढीने तो नदीच्या प्रवाहाकडे चालत जाऊ लागला. नदीच्या पात्रामध्ये पाय ठेवणार इतक्यात त्याला कुणीतरी हटकले. “ओ पाव्हनं ! तिकडं कुठं जाताय? भोवरा आहे पाण्यात! पोहायला येतं का तुम्हास्नी? उगा जीव जायचा! अन कुणाकड आलं म्हणायचं तुमी?” रामाचे बोलणे ऐकून नरेश भानावर आला आणि म्हणाला अहो मी नरेश , सुधाकर पाटलांचा नातू! आजच आलो आजी आजोबांना भेटायला!” हे ऐकून रामा म्हणाला ,”पाटलांचा व्हय रे तू! चल तुला सोडतो घरी! म्या बी तिकडच चाल्लूया !” नरेश ला घेऊन रामा पाटलांच्या घरी गेला आणि त्याने सांगितले कि नरेश कसा एकटाच नदीकडे जाताना त्याला दिसला आणि त्याने नरेश ला घरी आणून सोडले. पाटलांनी रामाचे आभार मानले आणि नरेश ला बजावले कि परत नदीच्या रस्त्याला सुद्धा जायचे नाही. त्यांना गिरीजाच्या सूडप्रतिज्ञेची आठवण झाली आणि काळजी वाटू लागली. रात्री झोपताना नरेशने परत कुठे जाऊ नये म्हणून त्यांनी कडेकोट बंदोबस्त केला तरी नरेश अचानक नाहीसा झाला होता.
“देवा आमच्या पापाची शिक्षा आमच्या पोराला देऊ नकोस”. असं म्हणत दोघेही देवाचा धावा करत बसले होते तेवढ्यात गणू नरेश ला घेऊन आला. गणू ने सांगितले कि नरेश त्याला नदीच्या रस्त्यावरून परत येताना दिसला. आजी आजोबा दोघांनीही नरेश ला चांगलेच फैलावर घेतले . पण नरेशने त्यांना सांगितले कि त्याला कळलेच नाही कि तो झोपेतून उठून चालत नदीपाशी कसा पोचला.नरेश ला काहीही आठवत नव्हते. त्याला इतकेच आठवत होते कि पायाला नदीच्या पाण्याचा स्पर्श झाल्याबरोबर त्याला एका अनोळखी स्त्री ने हटकले आणि परत घरी जाण्यास सांगितले. आजीने त्याला त्या स्त्रीचे वर्णन विचारले तर त्याने सांगितले कि तिने हिरव्या रंगाची साडी नेसली होती , कपाळावर मोठे कुंकू होते व चांगल्या घरची वाटत होती. त्यालाही आश्चर्य वाटत होते कि रात्रीच्या वेळी एक चागल्या घरची बाई नदीपाशी काय करत होती. तो तिला विचारणार इतक्यात ती बाई झपझप चालत नाहीशी झाली आणि हा घरी यायला निघाला इतक्यात याला गणू भेटला. चला देव पावला व नरेश सुखरूप घरी आला, संकट टळले असे म्हणत सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला.
दुसर्या दिवशी सकाळीच आजोबांनी हि घटना राजेंद्र ला कळवली व कसलाही विचार न करता राजेंद्र एकटाच परस्पर नरेश ला परत घेऊन जायला म्हणून गावाकडे निघाला. गावी पोचल्यावर त्याने त्याच्या आई वडिलांना सांगितले कि तो नरेशला परत घेऊन जायला आला आहे.व ती दोघं उद्या सकाळी निघणार आहेत. आजी आजोबांना घडल्या प्रकारची पुनरावृत्ती व्हायला नको असेच वाटत असल्याने त्यांनीही परवानगी दिली. बर्याच वर्षांनी गावाकडे आल्याने राजेंद्र जरा निवांत होता. जरा जुन्या मित्रांना भेटून येतो असे सांगून तो घराबाहेर पडला पण मित्राच्या घराच्या दिशेने न जाता ओ कुठल्याश्या अनामिक ओढीने नदीकडे जायला निघाला. त्याला जणू नर्मदा बोलवत होती. चालत चालत नदीच्या पात्रात शिरल्यावर तो भानावर आला पण तोवर उशीर झाला होता. पट्टीच्या पोहणाऱ्या राजेंद्रला नदीत कोणी खेचतय असे वाटू लागले.त्याने बाहेर पडण्याचा आटोकाट प्रयत्न केला पण त्याचे प्रयत्न विफल ठरले. अखेर त्याने धडपड थांबवली आणि शेवटचे डोळे उघडून पहिले तेव्हा त्याला गिरीजा दिसली, सूडाच्या भावनेनी हसत असलेली.. त्याला ऐकू आले, आज मी मुक्त झाले.. आज मी माझा शब्द खरा ठरवला.. पाटलांच्या वंशाचा दिवा मी नेतेय! निष्पाप नरेशला जीवनदान देऊन तिने राजेंद्रला त्याच्या पापाची शिक्षा दिली होती. गिरीजा मुक्त झाली होती. राजेंद्रला नर्मदेच्या स्वाधीन करून गिरीजा मुक्त झाली होती!..
वैदेही राजे- जोशी..
Friday, February 26, 2016
Wednesday, February 17, 2016
चॉकलेट डे
Subscribe to:
Comments (Atom)