Wednesday, October 18, 2017
फिरंगी तडका भाग - (स्पेन)
नमस्कार मंडळी, फिरंगी तडका मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मागच्या आठवड्यात आपण स्पेनच्या खाद्यसंस्कृती बद्दल माहिती घेतली. आजही आपण स्पेनच्याच आणखी काही पदार्थांबद्दल माहिती करून घेणार आहोत. फुटबॉल , फ्लामेंको , सुंदर समुद्रकिनारा, हॅपनिंग नाईटलाईफ, ला टोमॅटिना फेस्टिवल , बुल फाईट ,सिएस्ता ह्या सर्व गोष्टींसाठी स्पेन जगभरात प्रसिद्ध आहे.लज्जतदार तसेच स्पॅनिश फूड साठी सुद्धा स्पेनचे जगभरात नाव आहे. “आमचं स्पॅनिश फूड जगात सर्वात हेल्दी जेवण आहे”, असं स्पॅनिश लोक मोठ्या अभिमानाने सांगतात. स्पॅनिश जेवण म्हणजे वेगवेगळ्या रंगांचे,पद्धतींचे आणि चवींचे फ्युजन असते. स्पॅनिश लोक आहे खवय्ये असतात आणि त्याचा त्यांना अभिमान आहे. सकाळच्या नाश्त्यापासून तर रात्रीच्या जेवणापर्यंत त्यांच्या जेवणात खूप विविधता असते.सकाळचा नाश्ता ते हलका घेतात. स्ट्रॉंग कॉफी आणि त्याबरोबर जॅम सह बोलोज (स्वीट रोल्स),किंवा टोस्ट जॅम किंवा माईल्ड चीज बरोबर टोस्ट किंवा गरम दुधाबरोबर “मारिया” क्रॅकर्स किंवा Magdalenas (कपकेक सारख्या छोटा .मऊ आणि हलका केक) खातात. त्यानंतर Tapas म्हणजे नाश्ता आणि जेवणाच्या मधल्या वेळात खायचे पदार्थ काही लोक खातात. टॉर्टिला एस्पानोला म्हणजेच स्पॅनिश ऑम्लेट ह्यालाच Tortilla de patata, असेही म्हणतात. स्पॅनिश ऑम्लेट म्हणजेच बटाट्यापासून बनवलेले ऑम्लेट , Patatas Bravas म्हणजेच बटाट्यासह तिखट मसालेदार ब्रावा सॉस , Gambas al Ajillo म्हणजेच लसूण घातलेली कोलंबी माश्यापासून बनवलेला पदार्थ.. हे आणि असे पदार्थ tapas दरम्यान खातात.
स्पॅनिश लोक त्यांच्या दुपारच्या जेवणाला La Comida असं म्हणतात. त्याचं दुपारचं जेवण हे भरगच्च असतं. आणि त्यानंतर ते दुपारची वामकुक्षी म्हणजेच सिएस्ता एन्जॉय करतात. दुपारच्या जेवणाबरोबर स्पॅनिश लोक वाईनचा आस्वाद घेतात. तुम्ही जर कुठल्या स्पॅनिश व्यक्तीकडे लंचला गेलात तर तुम्हाला व्हेजेटेबल , बीन्स किंवा सीफूड चे सूप (ह्यात बऱ्याच वेळा भात, पास्ता किंवा बटाटा घातलेला असतो), ताजे मासे, भाजलेले चिकन किंवा मटण, फ्राईड बटाटे, मांसापासून बनवलेले स्ट्यू, हिरवे सलाड किंवा मिक्स भाज्या , अनेक प्रकारचे ब्रेड, पेस्ट्री, फळे किंवा आईस्क्रीम हे डेझर्ट म्हणून आणि कॉफी किंवा वाईन किंवा ब्रँडी असे भरगच्च जेवण तुम्हाला खायला मिळेल. स्पॅनिश लोकांना अंडी तसेच दुधाचे पदार्थ विशेष प्रिय आहेत. म्हणूनच त्यांचे बरेचसे गोड पदार्थ हे फ्रेश क्रीम आणि दुधापासून बनवलेले असतात. तसेच अनेक प्रकारची फळे सुद्धा त्यात घालतात आणि ह्या डेझर्ट बरोबर सॉफ्ट चीज सुद्धा वाढले जाते.
दुपारच्या जेवणानंतर भूक लागली तर रात्रीच्या जेवणाआधी La Merienda म्हणजेच स्नॅक्स ची वेळ असते. ह्या वेळी फ्रेंच स्टाईल ब्रेड चॉकलेटसह खातात किंवा सलामी किंवा हॅम सोबत ब्रेड खातात. ह्यानंतर रात्रीच्या जेवणाला la cena असे म्हणतात. स्पॅनिश लोक रात्रीचा आहार लंच पेक्षा हलका ठेवण्यावर भर देतात. रात्रीच्या जेवणात ते ताजे मासे किंवा रोस्टेड चिकन किंवा मटण ह्यासोबत फ्राईड बटाटे किंवा भात ह्यांचा आस्वाद घेतात. सोबत ग्रीन सलाड सुद्धा घेतात. स्पॅनिश डिनर मधील एक प्रसिद्ध पदार्थ म्हणजे arroz cubano. हा पदार्थ म्हणजे भाताच्या मुदीवर त्यांचा स्पेशल टोमॅटो सॉस आणि फ्राईड अंड होय. डेझर्ट मध्ये ते ताजे सिझनल फळ किंवा flan म्हणजे स्पॅनिश व्हॅनिला कस्टर्ड खातात. कधी कधी रात्री जेवणानंतर ते Churros ह्या स्पेशल पदार्थाचा आस्वाद घेतात. हयासह ते हॉट चॉकलेट घेणे पसंत करतात. आज आपण टिपिकल स्पॅनिश फ्लॅन कसे बनवतात हे बघू. भेटू पुढील भागात तोवर खाते रहो और खिलाते रहो.
बेसिक स्पॅनिश फ्लॅन
साहित्य- ३/४कप साखर, ३५० मिली आटवलेले दूध, दीड कप फुल क्रीम दूध, ४ अंडी, १ टीस्पून व्हॅनिला इसेन्स , साखर किंवा मध अजून गोड हवे असल्यास
कृती- सॉसपॅनमध्ये साखर घेऊन ती मध्यम आचेवर ठेवा. साखर हळू हळू वितळू लागेल आणि तिचा रंग पालटून ब्राऊन होऊ लागेल. ती सतत ढवळत राहा. साखर वितळली कि ती फ्लॅन च्या साच्यात काढून घ्या, आता ती घट्ट होऊ लागली तरी काळजी करू नका कारण बेक करायला घेतल्यावर ती परत वितळेल. आता एका भांड्यात आटवलेले दूध( तुम्ही कंडेन्स्ड मिल्क सुद्धा वापरू शकता), साधे दूध , अंडी आणि व्हॅनिला इसेन्स एकत्र करून घ्या. ते चांगले फेटून घ्या.तुम्हाला पदार्थ जास्त गोड हवा असल्यास हे मिश्रण फेटत असतानाच त्यात साखर किंवा मध घालू शकता. आता हे मिश्रण साच्यात ओतून घ्या. एका मोठ्या भांड्यात एक इंच इतके पाणी घाला आणि त्यात हा साचा ठेवा. पण साच्याच्या वर पाणी जाईल इतके पाणी घालू नका. आणि साचा ठेवलेले भांडे ओव्हन मध्ये ठेवा आणि ओव्हन ३५० डिग्री फॅरेनहाईट वर सेट करा. ओवनला प्रीहीट करून ठेवू नका. हे मिश्रण एक तास बेक करून घ्या. एका तासाने सुरी घालून मिश्रण नीट बेक झाले आहे ह्याची खात्री करून घ्या. फ्लॅन चांगले बेक झाल्यावर साचा थंड होऊ द्या. आता कॅरामेल वर आणि फ्लॅन खाली अशा पद्धतीने त्यातून फ्लॅन काढून घ्या. आणि फ्रीज मध्ये चिल्ड करून फ्लॅनची मजा अनुभवा.
वैदेही राजे- जोशी
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment