Wednesday, October 18, 2017
फिरंगी तडका -९ (नेदरलँड्स /हॉलंड)
Hallo mensen फिरंगी तडका मध्ये तुमचं परत एकदा स्वागत आहे. आज आपण ज्या देशात फिरस्ती करणार आहोत तो युरोपातील देश क्षेत्रफळाने छोटासा असला तरी खूप सुंदर आणि प्रगत आहे. तिथले ट्युलिप गार्डन अतिशय प्रसिद्ध आहेत शिवाय तिथले चीज सुद्धा जगप्रसिद्ध आहे. बरोबर ओळखलंत...आज आपण नेदरलँड्स म्हणजेच हॉलंडच्या खाद्यसंस्कृतीची माहिती करून घेणार आहोत. नेदरलँड्स किंवा ज्याला आपण हॉलंड म्हणून ओळखतो तो देश लहान असला तरी अनेक गोष्टींसाठी जगात प्रसिद्ध आहे. हॉलंडचे बल्ब फिल्ड्स म्हणजेच फुलांची बाग,पवनचक्क्या, चीजचे मार्केट, लाकडी शूज, ऍमस्टरडॅमचे कालवे , अत्यंत प्रगत वॉटर मॅनेजमेंट टेक्निक हे अत्यंत प्रसिद्ध आहेत. तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल पण हॉलंडचा बराचसा भूभाग हा समुद्रसपाटीच्या खाली आहे. ह्या देशाची राजधानी ऍमस्टरडॅम असून येथील राष्ट्रीय भाषा डच आहे.
डच लोकांचे जेवण हे मुख्यत्वेकरून मासेमारी,पशुपालन आणि शेतीवर आधारित आहे. डच क्विझीन अत्यंत साधे आणि सरळ आहे. हॉलंड मध्ये दुग्धजन्य पदार्थ लोकांना अतिशय प्रिय आहेत म्हणूनच ह्या दुग्धजन्य पदार्थांचा कुठलाही पदार्थ तयार करताना मुक्त हस्ते वापर केला जातो. ह्यांच्या ब्रेकफास्ट आणि दुपारच्या जेवणात बऱ्याचवेळी वेगवेगळ्या प्रकारचे ब्रेड आणि त्यावर टॉपिंग असे असते किंवा हे लोक नाश्त्याला विविध धान्यांपासून बनवलेल्या सिरियल्सचे सेवन करतात. पारंपारिक डच डिनरच्या मेन्यू मध्ये बटाटे, मांस, आणि सिझनल भाज्या ह्यांचा समावेश असतो. पूर्वी डच डाएट मध्ये कर्बोदके आणि स्निग्ध पदार्थ ह्यांचा जास्त समावेश असे . ह्या कर्बोदक व स्निग्ध पदार्थांची गरज ते दुग्धजन्य पदार्थ ह्यांतून भागवत असत. कारण ज्यांनी ह्या देशाच्या प्रगतीमध्ये मोठा हातभार लावला ते कष्टकरी लोक होते आणि त्यांना शारीरिक कष्ट करण्यासाठी आहारात कर्बोदके व स्निग्ध पदार्थांची आवश्यकता असे. आता मात्र डच क्विझीन सुद्धा ग्लोबलाईज झाले आहे.
टिपिकल डच ब्रेकफास्ट मध्ये ब्रेड बटर, किंवा ब्रेड जॅम किंवा ब्रेड वर Hageslag नावाचे चॉकलेट स्प्रीन्कल्स टाकून खाल्ले जाते. किंवा उकडलेले अंडे आणि डच चीज सुद्धा खाल्ले जाते. इतर युरोपियन देशांपेक्षा डच लोकांचा सकाळचा नाश्ता अगदी साधा सोपा असतो. जर नाष्ट्यानंतर भूक लागलीच तर मिड मॉर्निंग खाणे म्हणून ते घरी बनवलेले ऍपल टार्ट किंवा ऍपल पायचा आस्वाद घेतात. त्याची चव आणखी छान लागावी म्हणून ते त्यावर फ्रेश व्हीप केलेले क्रीम घालून खातात. डच लोक दुपारचे जेवण लवकर म्हणजे दुपारी बारा वाजता घेणे पसंत करतात. त्यांना दुपारच्या जेवणात सुद्धा हलका आहार घेणे आवडते. डच चीज घालून केलेले सँडविच म्हणजेच ‘boterham met kaas’ हा पदार्थ दुपारच्या जेवणातील एक पदार्थ आहे.गंमत म्हणजे सगळी दुनिया जेव्हा सँडविच हाताने खाणे पसंत करते तेव्हा डच लोकांना त्यांचे सँडविच काटा आणि सुरीने खायला आवडते. ह्या सँडविच बरोबर त्यांना karnemelk म्हणजेच ताक किंवा Chocomelk म्हणजेच दुध आणि चॉकलेट पासून तयार केलेले गार पेय घ्यायला आवडते. हॉलंड मध्ये गाईंचे प्रमाण माणशी एक गाय असे आहे म्हणूनच तिथे दुध दुभते तुडुंब भरून वाहत असते आणि लोक दुग्धजन्य पदार्थ अगदी आवडीने खातात.आणि दुपारच्या जेवणात ते सफरचंद किंवा संत्र अशी फळे सुद्धा खातात. थोडक्यात त्यांचे जेवण हे साधे, सुटसुटीत आणि एकदम हेल्दी असते. कधी मूड असला तर डच लोक uitsmijter’ हा पदार्थ खातात.Uitsmijter म्हणजे टोस्टबरोबर हॅम आणि दोन ते तीन अंडी वितळलेल्या डच चीज मध्ये कोट करून सर्व केली जातात. आता डच डिनर कसे असते आणि डच लोक डेझर्ट म्हणून काय काय टेस्टी पदार्थ बनवतात हे आपण पुढील भागात बघणारच आहोत. तोवर आज दिलेली रेसिपी करून बघा आणि घर बसल्या हॉलंडचा फील घ्या. Vaarwel!!
Rijstebrij (राईस पुडिंग /डच तांदळाची खीर)
साहित्य- १ लिटर गाईचे दूध, १५० ग्राम तांदूळ, ५० ग्राम साखर,जायफळ पावडर चवीनुसार, दालचिनी पावडर चवीनुसार, स्ट्रॉबेरी जॅम आवश्यकतेनुसार , वॅनिला इसेन्स आवश्यकतेनुसार
कृती – एका भांड्यात दूध गरम करायला ठेवा. दूध उकळल्यावर त्यात धुवून घेतलेले तांदूळ घाला . नंतर साखर घालून चांगले ढवळून घ्या. त्यात चिमुटभर मीठ, आणि वॅनिला इसेन्सचे काही थेंब घाला. वॅनिला इसेन्स नको असल्यास जायफळ आणि दालचिनीपावडर थोडी घालू शकता. नंतर मंद आचेवर पदार्थ शिजवून घ्या. तांदूळ पूर्णपणे शिजवून घेणे आवश्यक आहे. पदार्थ लहान लहान बाउल्स मध्ये सर्व्ह करताना त्यावर ब्राऊन शुगर किंवा स्ट्रॉबेरी जॅम घालून दिल्यास पदार्थाची चव वाढते.
-वैदेही राजे- जोशी
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment