Friday, February 26, 2016


परक्याचे धन हॉस्पिटल मधून फोन आला आणि घाबरलेल्या नर्मदाकाकूंनी देव्हार्यातले देव ताम्हणातील पाण्यात ठेवून महाराजांच्या पोथीचे पठण चालू केले. पोथीचे पठण यंत्रवत सुरु होते. आणि नर्मदा काकूंच्या मनात सारखे हेच विचार येत होते. “देवा सगळ नीट सुखरूप पार पडू दे रे.. या वेळेला तरी मागच्यासारखं करू नकोस. तुझी काय कमी सेवा केली म्हणून आम्हाला ह्या सुखापासून वंचित ठेवतो आहेस? लक्षं असू दे रे बाबा! सगळं नीट होऊ देत!” “अरे देवा ! दिव्यातले तेल संपत आले आहे. तेल घालायला हवे” असे म्हणत त्यांनी पोथी बाजूला ठेवली, दिव्यातील वात नीट केली व दिव्यात तेल घालून देवापुढे हात जोडून नर्मदाकाकू देवाची करुणा भाकत बसल्या. मनात विचारांची गर्दी असतानाच रश्मीच्या आवाजाने त्यांची तंद्री भंगली. “आई , आता देवांना पाण्यात ठेवून काय उपयोग आहे? आधीच विवेकाने वागला असतात तर आज देवांना पाण्यात ठेवण्याची वेळ तुमच्यावर आली नसती.” रश्मी पोटतिडकीने बोलत होती. “रश्मी, अगं प्रसंग काय अन तू काय बोलतेस? आणि मुलींनी असं उद्धट स्वरात बोलू नये गं ! चांगलं दिसत नाही ते!” “नर्मदा!नशीब तरी तूच बोलतेस हे..मी बोलले तर माझ्या अंगावर धावून येईल हि.. माहेरी होती तेव्हा अगदी गरीब गायी सारखी होती, निमूट सगळं ऐकायची! आता सासरी गेल्यावर मोठे शिंगच फुटलेत महाराणीला. समजाव बाई नर्मदा आता तूच तुझ्या पोरीला..नाहीतर उद्या सासरचे येतील हिच्या कागाळ्या करायला !” पार्वती आजी, नर्मदाकाकूंच्या सासूबाई म्हणजेच रश्मीच्या आजी बोलल्या! “ आजी माझी चिंता करू नकोस. माझ्या सासरचे तुमच्या सारखे कुजकट आणि बुरसटलेल्या विचारांचे नाहीत. सुदैवाने मी सुटले तुमच्या कचाट्यातून आणि माझी बिचारी मीरा वाहिनी सापडली तुमच्या तावडीत. तुमच्या ह्या घरात लग्न करायची काय दुर्बुद्धी झाली तिला कोण जाणे! दादाच्या प्रेमाखातर तिने ह्या घरात गृहप्रवेश केला आणि तिच्यावर हि वेळ ओढवली ..केवळ तुमच्यामुळे!” रश्मीने थंडपणे आजीला उत्तर दिलं! त्यावर आजी उसळून बोलल्या ,”काय अशी वेळ ओढवली गं? बाळंतपणात असं व्हायचच! त्यात काय एवढं? आमची नाही झाली बाळंतपणे? आमच्या वेळी तर ना असे डॉक्टर होते ना अशी औषधं! आणि रश्मी, आता तुझं हे घर नाही. हे आमचं घर आहे आणि आमच्या घरात काय होतं ते आमचं आम्ही बघून घेऊ. तू आता परकी आहेस. तू तुझ्या घरचं बघायचस. आम्हाला इकडे अक्कल शिकवायला येऊ नको. तुझी काय ती थेरं तुझ्या घरी कर! इकडे मी आणि तुझा बाप जिवंत असेपर्यंत तुमची थेरं चालवून घेणार नाही मी! तू परक्याचं धन होतीस ते आम्ही त्याचं त्यांना दिलय. आता ह्या घरात तू तुझ्या नवीन पद्धती चालवायच्या नाहीस! हे मी शेवटच सांगतेय. नाहीतर आजची हि गोष्ट मला नाईलाजाने तुझ्या बापाच्या कानावर घालावी लागेल. मग तो काय करील ना ह्याच्या भरवसा नाही!” आजी चिडून बोलल्या. आजींच हे बोलणं ऐकून नर्मदाकाकू म्हणाल्या ,”माई ,नका हो असं करू. मी समजावते हिला. ती परत नाही असं बोलणार. तुम्ही ह्यांना काही सांगू नका. लहान समजून माफ करा तुमच्या नातीला. तिच्या वतीने मी माफी मागते तुमची.” देवघरात चाललेला हा संवाद आणि आजीचा मोठा आवाज बाहेर हॉलमध्ये ऐकायला आला तेव्हा लक्ष्मणरावांच्या डोक्यात तिडीक गेली. “काय कटकट आहे ह्या बायकांची? मला घरात असले वाद चालत नाहीत हे माहित असूनही कोण मोठमोठ्यानी बोलतय? घरंदाज बायकांना हे असं बोलण शोभतं का?” अशी बडबड करत लक्ष्मणराव आत देवघराच्या दिशेने चालू लागले. तेव्हा त्यांच्या कानावर रश्मीचे बोलणे पडले. “आई, तुझ्या अश्याच स्वभावामुळे ह्या दोघांचे फावते. आणि आजी, माझ्या सासरच मी बघून घेईन. पण हे ही माझंच घर आहे. बाकी कुठल्या विषयात मी काही बोलत नाही. बोलणारही नाही. पण आज तुमच्या विचित्र वागण्याचा आणि दुसर्याला त्रास देण्याचा कडेलोट झालाय. मला परक्याचं धन म्हणता अन मग जे धन तुम्हाला मिळालय, मीरा वहिनीच्या आई- वडिलांनी तुम्हाला कन्यादान दिलंय ते तरी नीट सांभाळायचं होतं ना? तुला कळतंय का आजी, आज तुमच्या एका फालतू हट्टापायी मीरा वाहिनीचा जीव धोक्यात घातलाय तुम्ही.. आज तिला जर काही झालं तर काय उत्तर देणार आहात तिच्या आई वडिलांना? काय सांगणार त्या छोट्या आर्या ला? काय उत्तरं देणार तिच्या प्रश्नांची? बोल न आजी.. आता का गप्प बसलीस?” रश्मीचे हे बोलणे ऐकून लक्ष्मणरावांच्या तळपायाची आग मस्तकात गेली. देवघरात येत ते रागावून म्हणाले, “रश्मी, भरल्या घरात काय आरडाओरड चाललीये? काय बोलतेस तू? शुद्धीत आहेस का?” लक्ष्मणरावांना अचानक असे देवघरात आलेले पाहून नर्मदाकाकू घाबरून सावरून उभ्या राहिल्या. येणाऱ्या प्रसंगाला आता कसे तोंड द्यायचे याचं त्यांना टेन्शन आलं. “अहो..अहो.. शांत व्हा ..तुम्हाला त्रास होईल. नका मनावर घेऊ पोरीचं बोलणं. लहान आहे हो अजून ती. माफ करा तिला. बसता का तुम्ही? पाणी देऊ का तुम्हाला?” नर्मदा काकू लक्ष्मणरावांना शांत करायचा प्रयत्न करत होत्या. लक्ष्मणराव त्यांचा काहीही न ऐकता म्हणाले, “रश्मी, वाटेल ती थेरं ह्या घरात चालणार नाहीत. तुझं डोकं चालवायची वेळ आली नाहीये! आम्ही मोठे जिवंत आहोत अजून!” “बाबा आजवर तुमचं सगळं खरं केलंत तुम्ही ! लहानपणी तुमच्या धाकापायी आम्ही तुमचं ऐकत होतो आणि आता तुम्हाला वाईट वाटू नये म्हणून आणि तुमच्या तब्येतीकडे पाहून सगळे तुमचं ऐकतात. पण तुम्ही मात्र फक्त स्वतःचं खरं करत आलात. कधी आमचा विचार केलात का हो? आमचा जाऊदे ..कधीतरी आईचा तरी विचार केलात? आज मला तुमचा अपमान करण्याची मुळीच इच्छा नाही. किंवा तुम्हाला त्रास व्हावा असेही मला वाटत नाही. पण तुमच्या भ्रमातून तुम्हाला कोणीतरी जागं करणं आवश्यक झालय कारण आता तुम्ही दुसर्याच्या मुलीच्या आयुष्याशी खेळत आहात. “ रश्मी पोटतिडकीने बोलत होती. “काय केलं गं मी असं? काय नुकसान झालं तुझं?” लक्ष्मणराव चिडून बोलले. “रश्मी तू घरी जा. आमचं आम्ही बघून घेऊ. आज तुझ्यामुळे माझ्या मुलाला काही झालं तर तुझं तोंड कधी बघणार नाही मी.” पार्वती आजी ओरडल्या. “आजी, ते माझे वडील आहेत. आणि तू आज आमच्यात पडू नकोस. फार तर काय होईल? हे मला इकडून हाकलून देतील, कधी माझं तोंड बघणार नाहीत इतकाच ना? करू देत त्यांना काय करायचं ते. पण ह्यांना त्याच्या वागण्याची जाणीव कोणीतरी करून देणं अतिशय आवश्यक आहे. आणि आज मी तुझं काहीही ऐकणार नाही. तू प्लीज आमच्या मध्ये पडू नकोस नाहीतर माझ्याकडून माझी इच्छा नसताना तुलाही काहीतरी वेडंवाकडं बोलल्या जाईल आणि तुला वाईट वाटेल.” रश्मीने आजीला स्पष्टपणे सांगितले. “बाबा मला आठवतं तेव्हापासून अरविंद दादा आणि माझ्यात तुम्ही फरक करायचात. आजी तर अगदी खाऊ सुद्धा त्याला जास्त आणि मला कमी असा द्यायची. पण दादाचं माझ्यावर खूप प्रेम असल्यामुळे दादाने कधीही माझ्यावर अन्याय होऊ दिला नाही. स्वतः त्रास सहन करून मला प्रेम दिलं. पण नंतर मोहित झाला आणि तुम्ही आणि आजीने सतत माझ्यावर अन्याय केला. मला आठवतं मोहित झाला आणि आईचं सगळं लक्षं त्याच्यावरच केंद्रित झालं. ती जणू विसरलीच कि तिला अजून दोन मुलं देखील आहेत ज्यांना तिनेच जन्म दिलाय. मी कौतुकाने मोहितशी खेळायला गेले कि आजी खस्स्कन मला मागे ओढायची. मी आईच्या मांडीत बसायला गेले कि आजी धपाटा घालायची पाठीत. आईने सुद्धा कधी आजीच्या ह्या वागण्याला विरोध केला नाही. आजीला तर कधी माझ्याविषयी काही वाटलेच नाही, पण मी तर तुमचीच मुलगी होते ना? मग तुम्ही का असे अंतर दिलेत मला नेहेमी? तुमचं असं वागण पाहून मोहित सुद्धा माझ्याशी नीट वागत नाही. म्हणूनच माझ्या मनात त्याच्याविषयी अढी निर्माण झाली. मला सांगा ज्या मोहित साठी तुम्ही माझ्यावर सतत अन्याय केलात तो कसा वागला? सांग ना आजी, कुठे गेला होता तो देवाला सोडलेला वळू जेव्हा बाबांना त्याची खरी गरज होती?” रश्मी बोलत होती. मोहित विषयी असं बोललेलं आजी ला सहन झालं नाही. ती ओरडली, ”रश्मी! अगं तो लहान भाऊ आहे तुझा. ह्या घराण्याच्या वंशाचा दिवा आहे तो! त्याच्याविषयी असं बोललेलं मी खपवून घ्यायची नाही.” “हो? वंशाचा दिवा? काय दिवे लावलेत गं त्याने? माझं शिक्षण डावलून त्याच्यासाठी कॉलेजमध्ये लाखो रुपयांचं डोनेशन भरून त्याला घातला ना इंजिनिअर व्हायला? काय दिवे लावलेत त्याने? २ वर्ष कॉलेजमध्येच गेला नाही. कुठे उकिरडे फुंकत होता कोण जाणे! बाबांनी विचारल्यावर खोटी मार्कलिस्ट दाखवली त्याने. अन हे सगळं बाबांना बाहेरून कळाल त्याच वेळी त्यांना हार्ट अटॅक आला. त्यावेळी मी आणि दादाने सगळी धावपळ केली. पण आला का तुझा हा वंशाचा दिवा एकदातरी तोंड दाखवायला? आताही जेव्हा घरात आईला , बाबांना टेन्शन आहे, आधाराची गरज आहे तेव्हा कुठे आहे तुझा वंशाचा दिवा? बसला असेल कुठेतरी मित्रांसोबत अड्ड्यावर पत्ते कुटत. त्याच्यासाठी वाया घालवले ते पैसे माझी मेडिकल ची फी भरायला वापरली असती, तर आज तुमच्याच घराण्याचं नाव झालं असतं. पण मला माझी इच्छा असतानाही डॉक्टर बनू दिलं नाही तुम्ही.माझं जाउद्या हो! माझ्या सगळ्या इच्छा आता माझ्या सासरी पूर्ण होत आहेत. तुम्ही मी मुलगी म्हणून माझ्याकडे दुर्लक्ष केलत. पण दादाने काय बिघडवलय तुमच? का त्याच्या आयुष्याशी खेळत आहात? देवाच्या दयेने छान नात मिळाली ना तुम्हाला? मग पहिल्या बाळंतपणात त्रास होऊन सुद्धा का वाहिनीला दुसरा चान्स घ्यायला भाग पाडलत? का दादाशी असे शत्रू सारखे वागलात? “ लक्ष्मणराव सुन्न होऊन ऐकत होते. आजवर त्यांना त्यांच्या अश्या वागण्याची जाणीव कोणी करून दिली नव्हती. पण आज त्यांची मुलगीच त्यांना त्यांच्याच मुलाचा शत्रू म्हणत होती आणि हे ऐकून लक्ष्मणराव अंतर्मुख झाले. “तुम्हाला चांगली सून मिळाली म्हणून तुम्ही तिलाही सोडल नाहीत? आणि त्या छोट्या आर्या चा काय दोष? माझ्याशी जसे वागलात तसेच आजी आर्याशी वागते. लाज नाही का गं वाटत आजी तुला? स्वत: एक स्त्री असून एका लहान मुलीशी वाईट वागतेस? तुम्ही सुद्धा दादाला सतत मुलगा हवा घराण्याला वारस हवा म्हणून मागे लागलात, माझ्या तब्येतीचं काही खरे नाही, मारण्याच्या आधी एकदा नातवाचे तोंड बघू दे म्हणून त्याला सतत इमोशनली ब्लॅकमेल केलत. आणि तुमच्या प्रेमाखातर दादाने हि रिस्क घेतली. आणि दादाच्या प्रेमाखातर वहिनीने हि रिस्क घेतली. तुम्हाला काय वाटतं बाबा कि वहिनीचे आई बाबा मुलीकडची बाजू म्हणून तुम्हाला घाबरतात? तसं वाटत असेल तर हा तुमचा गैरसमज आहे. त्यांना वहिनीने सांगितलय कि माझ्या घरी कोणालाही काही बोलू नका. आणि वाहिनीच्या प्रेमाखातर ते शांत आहेत. पण आज जर का त्यांच्या मुलीला काही झालं तर ते शांत बसणार नाहीत. आजी,तुझ्यासकट सगळ्यांची पोलीस कम्प्लेंट करायलाही ते मागे पुढे बघणार नाहीत.” इतकं सगळं ऐकल्यावर आजी गप्प बसणे शक्यच नव्हते. ती परत म्हणाली, “रश्मी, तुझा बाप ऐकून घेत असला तरी मी काही ऐकून घेणार नाही. आम्ही काहीही चुकीचं वागलो नाहीये. सुनेकडून वंशाच्या दिव्याची अपेक्षा करणं चूक आहे का? तुझ्या आईने नाही ऐकलं आमचं? काही नाही..हि सगळी तुम्हा नवीन मुलींची थेरं आहेत. ती काही ह्या घरात चालणार नाहीत हो.. घराण्याला वारस हा हवाच.. “ ह्यावर रश्मी पेटून उठून बोलली “आजी, मोहित च्या वेळी आई मरता मरता वाचली होती. माझ्या आणि दादाच्या नशिबात सख्ख्याच आईचं प्रेम होतं म्हणून! नाहीतर तू तर काय लगेच तयार होतीस ह्या घरात दुसरी सून आणायला. तुम्हाला मऊ जमीन मिळालीये ना म्हणून कोपराने खणताय तुम्ही. वृद्धाश्रमात हाकलून देणारी सून मिळाली असती तर कळल असतं तुम्हाला. बाबा, आता मी जे तुम्हाला सांगणार आहे ते ऐकून तरी तुमच्या हृदयाला पाझर फुटू द्या !” रश्मीचं हे सगळं बोलण ऐकून लक्ष्मणरावांना स्वतःचीच लाज वाटू लागली. त्यांचा कंठ दाटून आला. त्यांच्या डोळ्यातून पाण्याच्या धारा वाहू लागल्या. ते कसं बसं इतकच म्हणू शकले ,”बोल बेटा! आज सगळं बोलून टाक. सगळं मन मोकळ कर. सांग आम्ही कुठे कुठे कमी पडलो. “ आज आयुष्यात पहिल्यांदा रश्मी तिच्या बाबांना रडताना बघत होती. तिला स्वतःचीच लाज वाटली. ती त्यांच्याजवळ गेली. त्यांच्या खुर्चीजवळ त्यांच्या पायाशी बसून त्यांच्या मांडीवर डोकं ठेवलं. लक्ष्मणरावांनी सुद्धा आयुष्यात पहिल्यांदा आपल्या लेकीच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवला. रश्मी रुद्ध कंठाने बोलू लागली ,”मला माफ करा बाबा. मला तुमचा अपमान करायचा नव्हता. तुम्हाला त्रास द्यायचा नव्हता. पण तुमच्याशी हे सगळं बोलणं सुद्धा खूप आवश्यक होतं. बाबा.. आता मी जे तुम्हाला सांगणार आहे ते प्लीज दादाला सांगू नका कि मी तुम्हाला सांगितलाय. त्याने शपथ घातलीये मला पण तुम्हाला सांगणे आवश्यक आहे. बाबा , दादाला अमेरिकेला खूप चांगला चान्स मिळत होता. पण त्याने तो नाकारला केवळ तुमच्या तब्येतीमुळे! इकडे मोहीतचा काही उपयोग नाही आणि आईला सतत तुमची काळजी असते, तिला एकटीला काही त्रास होऊ नये म्हणून आणि माझ्यावर काही पडू नये म्हणून दादाने त्याच्या करियर मधली एक खूप मोठी संधी सोडली. आणि ह्याला वहिनीचा सुद्धा दुजोरा होता. बाबा, आता तरी तुमची जुनाट मतं सोडून दया. आर्याकडेच तुमच्या घराची ज्योत म्हणून बघा. आणि आजीच्या जुन्या मतांकडे फारसं लक्ष देऊ नका.” तिचं बोलणं ऐकून लक्म्जणराव म्हणाले, “ बरं केलस पोरी तू हे सगळं मला सांगितलस. नाहीतर मला कधी माझ्या मुलांची किंमत कळलीच नसती गं! ह्यापुढे ह्या घरात कुठल्याही स्त्रीवर अन्याय होणार नाही ह्याची जबाबदारी मी घेतो. तुझ्या आईवर सुद्धा मी खूप अन्याय केलाय. पण आता तिच्यावर सुद्धा मी अन्याय होऊ देणार नाही. दर से हि सही लेकीन अब इस घर मी सब दुरुस्त होगा. फक्त आता मीरा सुखरूप घरी येऊ दे.” हे ऐकून नर्मदाकाकुंनाही भरून आलं. आणि त्यांनी परत देवाकडे प्रार्थना केली कि “ देवा, मुलगा मुलगी काहीही चालेल. पण आमच्या मीराला सुखरूप घरी येउ दे बाबा.” तेवढ्यात रश्मीचा फोन वाजला. तिच्या दादाचाच फोन होता. तिने थरथरत्या हाताने फोन घेतला आणि म्हणाली ,”बोल दादा, वहिनी कशी आहे?” अरविंद म्हणाला ,”रश्मी, अगं मीरा ठीक आहे आता. स्टेबल आहे. पण मुलगी झाली गं. बाळ सुद्धा ठीक आहे. मी खूप आनंदात आहे. पण घरी...” त्याचं वाक्य पूर्ण न होऊ देताच रश्मी म्हणाली, “दादा, मी घरीच आहे. आणि तू काळजी करू नकोस. हि बातमी ऐकल्यावर सगळे खूप खुश होतील. आता आपल्या घरात कोणीही मुलीच्या जन्माचं दु:ख करणार नाही. सगळे वहिनी आणि बाळाचं खूप आनंदात स्वागत करतील. आता तू फोन ठेव आणि वहिनीकडे बघ. बाकी सगळं डिटेल मध्ये नंतर सांगते तुला. ” इतकं बोलून रश्मीने फोन ठेवला आणि म्हणाली, “आई, बाबा, आपल्या घरात परत एक लक्ष्मी आलीये. तुमच्या घरच्या धनात आता देवाने आणखी एका गोड परीची भर घातलीये. मीरा वाहिनी आता बरी आहे. बाळ सुद्धा ठीक आहे. चला आपण सगळे जाऊया हॉस्पिटल मध्ये.” रश्मीने सांगितलेली गोड बातमी ऐकून सगळ्यांना आनंद झाला, आजीने सुद्धा मीरा आणि बाळ सुखरूप आहे हे ऐकून देवाला हात जोडले व सगळे कुटुंब त्यांच्या घरात आलेल्या परीची भेट घ्यायला आनंदाने हॉस्पिटलकडे रवाना झाले. .... समाप्त

Wednesday, February 17, 2016

चॉकलेट डे


सारंग आज खूप टेन्शन मध्ये होता.. “आज चॉकलेट डे.. पाच वर्षांपूर्वी ह्याच दिवशी ह्याच चॉकलेटच्या मदतीने स्पृहाला आयुष्यात आणले होते..आणि आज..” ऑफिस मध्ये आपल्या क्युबिकल मध्ये बसून विचार करत असताना मित्राने आवाज दिला.. “सारंग, चल यार लंच करून येऊ” आणि सारंगच्या विचारांची तंद्री भंगली. स्पृहा आणि सारंग, वर वर दिसणारे एक आदर्श जोडपे. सारंग इंजिनिअर तर स्पृहा इंटेरियर डेकोरेटर. कॉमन मित्रांच्या माध्यमातून ओळख झाली. आणि हळू हळू मैत्री घट्ट झाली. सारंगला स्पृहा चा स्वभाव रोख ठोक स्वभाव आवडायचा. हळू हळू मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले आणि सारंगने स्पृहा ला प्रपोज करायचे ठरवले. चॉकलेटडे हा दिवस निवडला. ऑफिस मधूनच स्पृहा ला फोन केला. “हैलो स्पृहा, कशी आहेस? तुला आज वेळ असला तर ऑफिस सुटल्यावर भेटूया का ?” स्पृहाला हि सारंगच्या बोलण्यातून वागण्यातून एकंदरीत त्याच्या मनातल्या भावनांची कल्पना होतीच. शिवाय तिलाहि तो आवडत होताच. तो कधी त्याचे मन मोकळे करतोय ह्याचीच ती वाट बघत होती. म्हणून कुठलेही आढे-वेढे न घेता ती म्हणाली , “हो नक्की भेटूया.. पण कुठे भेटायचं ?” “कॅफे निर्वाणा मध्ये भेटूया”. “ओके, साडे सहा शार्प मी तिथे असेन”. इतके बोलून स्पृहाने फोन कट केला. सारंगने सुटकेचा निश्वास टाकला.. “चला पहिली पायरी तरी चढलो. भेटायला तरी हो म्हणालीये..आता पुढचं पुढे पाहू..” असा विचार करून तो काम लवकरात लवकर संपवायच्या मागे लागला. त्याला थोडे लवकर निघायचे होते. कारण स्पृहा ला भेटायला जाताना तिच्या आवडीचे चॉकलेटघेऊन जायचे होते. चॉकलेटम्हणजे स्पृहाचा अगदी वीक point . मूड कितीही खराब असला किंवा Madam कितीही रागावल्या असल्या तरी त्यावरचा रामबाण उपाय म्हणजे चॉकलेटहे सारंगला पक्के माहिती होते. आणि म्हणूनच सेफ साईड दोन chocolates त्याने घेतले आणि तो वेळेच्या थोडा आधीच कॅफे ला पोचला आणि एक कोपर्यातले टेबल पाहून तिथे बसला. म्हणजे कोणी डिस्टर्ब करणार नाही. थोड्याच वेळात स्पृहा आली. सारंग ने इकडचे तिकडचे बोलणे सुरु केले आणि शेवटी मनाचा हिय्या करून तो म्हणाला, “स्पृहा, तुला कल्पना आलीच असेल मी तुला इकडे आज का भेटायला बोलावले.. तुझी माझी मैत्री आज ह्या स्टेजला पोचलीये कि फारसे शब्द न वापरता आपल्याला एकमेकांच्या मनातले लगेच कळते. शिवाय तुम्हा मुलींना तर एक सिक्स्थ सेन्स असतो म्हणतात. त्यामुळे तुला तर चांगलीच कल्पना असेल माझ्या मनात काय चाललाय ह्याची! आहे ना?” स्पृहा ज्या क्षणाची इतक्या दिवसांपासून वाट बघत होती तो अखेर आला होता, तरी स्त्रीसुलभ लज्जेला अनुसरून ती म्हणाली कि, “ सारंग, मला कल्पना आहे. पण मला ह्या क्षणी काय बोलावे हे सुचत नाहीये. तू इतक्या अनपेक्षित क्षणी हा प्रश्न विचारलास कि मला काही सुचतच नाहीये.” त्यावर सारंग म्हणाला ,” कम ऑन स्पृहा, आता लपाछपी कशाला खेळायची? तुला माहितीये कि तू मला आवडतेस आणि कदाचित मी हि तुला आवडतो.. आवडतो ना? प्लीज स्पृहा.. बोल काहीतरी.. युअर सायलेन्स इज किलिंग मी.. तुझ्या उत्तरावर माझ सगळ पुढचं आयुष्य अवलंबून आहे यार. माझं सुख – दु:खं सगळं तुझ्या हातात आहे आता.. प्लीज सांग.. तुला मी आवडतो ना? सांग ना.. माझ्या आयुष्यात आपल्या दोघांची सगळी स्वप्न पूर्ण करायला माझी साथ देशील?” सारंग चे हे बोलणे ऐकून स्पृहाच्या हृदयाची धडधड वाढली होती. तिला खूप काही बोलायचे होते. पण ह्या क्षणाला शब्द मात्र तिची साथ देत नव्हते. तिने फक्त सारंग च्या डोळ्यात पहिले आणि म्हणाली ,” सारंग, तू माझा सगळ्यात जवळचा मित्र आहेस. मला समजून घेतोस, माझी काळजी घेतोस, तू मला कधीही दुखावणार नाहीस हि मला खात्री आहे. माझं पुढचं सगळं आयुष्य तुझ्यासोबत वाटून घ्यायला मी तयार आहे.” स्पृहाचे हे उत्तर ऐकून सारंग चा जीव भांड्यात पडला आणि त्याने, “इस बात पे कुछ मीठा हो जाये” असं म्हणत आणलेला चोकलेटचा अख्खा बॉक्स तिच्या पुढ्यात रिता केला.. स्पृहा आणि सारंग एकमेकांचे चांगले मित्र आहेत हे दोघांच्याही घरच्यांना माहित होते. जेव्हा दोघांनीही लग्नाचा निर्णय आपापल्या घरी सांगितला तेव्हा घरच्यांनीही तो आनंदानी स्वीकारला. कारण दोघेही चांगल्या घरचे, उच्च शिक्षित होते. आक्षेप घेण्यासारखे काही नव्हते. यथावकाश दोघांच्या घरच्यांनी चांगला मुहूर्त बघून दोघांचा साखरपुडा उरकला व लग्नाची तयारी सुरु झाली. सारंग ला बंगलोर ला चांगली ऑफर मिळत असल्यामुळे त्याने घरच्यांशी व स्पृहाशी बोलून बंगलोर ला शिफ्ट होण्याचे ठरवले. एक महिन्यात सारंग चे बंगलोर ला चांगले रुटीन सेट झाले. दोघांनाही भेटता येत नसल्यामुळे दोघेहि थोडे नाराज होते. पण करियरमध्ये चांगली संधी मिळाली म्हणून सारंग खुश होता व त्याची प्रगती पाहून स्पृहालाही समाधान वाटत होते. यथावकाश लग्न झाले. दोघे छान फिरायलाही जाऊन आले आणि दोघांचे रुटीन आयुष्य सुरु झाले. नवीन शहर, त्यात नवीन आयुष्य आणि करियर ची बसलेली घडी मोडून आलेली स्पृहा बंगलोरच्या नवीन वातावरणाशी व नवरा म्हणून सारंग शी जुळवून घेण्याचा आटोकाट प्रयत्न करत होती. त्यात घरचे सगळे एकटीने बघण्याची सवय नसल्यामुळे तिची तारांबळ उडू लागली. त्यात तिलाही नोकरीची संधी चालून आली. तिने ती स्वीकारली. पण नवीन नोकरी, त्यासाठीचा प्रवास व घराची जबाबदारी व नवीन शहर हे सगळं एकदम अंगावर आल्यामुळे ती भांबावून गेली. घरातले सगळे ती तिच्या परीने नीट करण्याचा प्रयत्न करत होती. पण सारंगला सगळं त्याच्या आईने केले तेच बघायची सवय होती. स्पृहा तिच्या पद्धतीने काही करायला गेल्यास सारंग ते खोडून काढून त्याच्या आईची पद्धत सांगायचा. सुरुवातीला स्पृहाने ऐकून घेतले. पण रोजचेच झाल्यावर तिला राग येऊ लागला. पण वाद नको म्हणून ती गप्प बसायची. सगळं मनात ठेवल्यामुळे तिची घुसमट होऊ लागली. आणि घरात आणखी काही चुका होऊ लागल्या. जसं भाजी आणायला विसरणे, दूध संपले आहे हे विसरणे, दही लावायला विसरणे... सारंगला त्याच्या आईची म्हणजेच मुरलेल्या गृहिणीचा संसार बघायची सवय असल्यामुळे त्याला ह्या साध्या साध्या चुका नवीन होत्या. त्यात त्याला बहिणहि नाही. त्यामुळे हल्लीच्या मुलींना कामाची सवय नसते, संसारात मुरायला वेळ लागतो हि बाब त्याच्या लक्षात येईना. त्याच्या मते मुलींना हे सगळ जमलेच पाहिजे. एकदा बोलता बोलता तो तिला बराच बोलला, “आता तू एक अल्लड मुलगी राहिलेली नाहीस. एक संसारी बाई झाली आहेस. तुझ्या आईने तुला इतक्या साध्या गोष्टी शिकवल्या नाहीत? माझी आई नाही का करत? सगळ्या बायका हे नीट करतात. मग तुला ह्या सध्या सोप्या गोष्टी का जमू नये ?” हे सगळ ऐकून स्पृहा वैतागली. मुळात तिचा स्वभाव काही ऐकून घ्यायचा नव्हता. त्यात ती सगळ करायचा प्रयत्न करत होती पण तिला तिचाच जवळचा मित्र, प्रियकर सारंग ह्यानेच समजून घेऊ नये? आधीचा सारंग हाच का असा तिला प्रश्न पडायला लागला. तिच्या मनाला ह्या गोष्टी फार लागल्या. आणि एक दिवस तिच्या संयमाचा बांध फुटला. एक दिवस सारंग ऑफिस मधून घरी आल्यावर म्हणाला उद्या शनिवार आहे. आपल्या दोघांनाही सुट्टी आहे. उद्या काहीतरी स्पेशल बनवतेस का? मस्त भरली वांगी आणि मसालेभात कर. आई करते तसा! झालं!” स्पृहाला राग आला. इतके दिवस साठलेलं सगळ बाहेर पडल. “मी कशाला करू? तुझ्या आईलाच सांग न कुरियर करायला. नाहीतर एक काम कर. जा तुझ्या आईकडे आणि खा मनसोक्त काय खायचं ते. नाहीतरी मी काही केलेलं तुला काही पटत नाही,आणि आवडतही नाही. मी कशाला माझी एनर्जी वाया घालवू मग ?” स्पृहा हे आणि असं बराच काही बोलली. त्यावर सारंगचाही पार चढला. आणि त्याचं पर्यावसान कडाक्याच्या भांडणात झालं. आणि हे असं भांडण हळू हळू छोट्या छोट्या कारणांवरून दर दोन तीन दिवसांनी होऊ लागलं. अशातच स्पृहाची तब्येत बिघडली. डॉक्टरांनी निदान केल कि स्पृहा आणि सारंग आई बाबा होणार आहेत. स्पृहाला वाटलं आता तरी भांडणं’ कमी होतील. तशी ती मी झालीही आणि स्पृहाने एका गोड मुलीला जन्म दिला. बाळाच नाव हौसेनी सानिका ठेवल. आईकडून बंगलोर ला परत आल्यावर स्पृहाने नोकरी सोडायचा निर्णय घेतला कारण बाळाला डे केअर मध्ये ठेवून तिला बाळाची आबाळ करायची तिची इच्छा नव्हती. स्पृहाने तिचे संपूर्ण लक्ष आता फक्त सानिका वर केंद्रित केले. सानिकाचं सगळ करण्यात तिचा सगळा दिवस निघून जात असे. सुरुवातीला स्पृहाला हे हि रुटीन आवडले. पण सानिका दोन वर्षाची झाल्यावर स्पृहाला घरात बसून डिप्रेशन येऊ लागले. आई वडिलांखेरीज इतर कुणावरही तिला आर्थिक दृष्ट्या अवलंबून असण्याची सवय नव्हती. पण नोकरी सोडल्यापासून सारंग कडे पैसे मागताना तिलाच गिल्टी वाटू लागले आणि ह्याचाही तिला मानसिक त्रास होऊ लागला. इकडे सारंग सुद्धा स्पृहाशी पूर्वीसारखा न वागता, तिला समजून न घेता तिच्याकडून सतत आदर्श आई, आदर्श बायको आदर्श सून होण्याची अपेक्षा करायचा. दिवसभर सानिका मागे तिची दमछाक झाल्यावर ऑफिस मधून आल्यावर तरी त्याने सानिकाला बघावे व तिला थोडा मोकळा वेळ द्यावा अशी स्पृहाची अपेक्षा होती. तिने अनेक वेळा सारंग ला असे बोलूनहि दाखवले.पण सारंग ला वाटायचे कि “मी दिवसभर ऑफिस मधून काम करून थकून घरी येतो. तर हिची अपेक्षा मी घरी आल्यावरही काम करावं ? हि दिवसभर घरीच असते आरामात आणि तरी हिला स्वतःसाठी वेळ पाहिजे? काय तीर मारणार आहे हि असा?” हा सगळा विचार करून सारंगची चिडचिड होऊ लागली. इकडे स्पृहा ला स्वतःकडे लक्ष द्यायला अजिबात वेळ मिळायचा नाही. दिवसभर दमल्यावर सानिकाने काही कारणाने रात्री सुद्धा जागवलं कि हिची अपेक्षा असायची सारंग ने सुद्धा थोड्यावेळ सानिकाला बघावे. आणि सारंग ला वाटायचे कि हि दिवसभर घरीच असते, मी ऑफिस मध्ये कामात असतो , दमतो तरी रात्रीहि मी जागावं अशी कशी अपेक्षा करू शकते हि? दोघांच्याही एकमेकांबद्दलच्या अपेक्षा पूर्ण होत नसल्यामुळे हळू हळू दोघातला दुरावा वाढत गेला. घरी आल्यावर हि सारखी कम्प्लेंटच सांगते असा विचार करून सारंग स्पृहाशी घरात संवाद साधेनासा झाला. घरी आल्यावर स्वत:च्या सोयीने सानिकाशी खेळायचं, जेवायचं, झोपायचं आणि दुसऱ्या दिवशी परत उठून स्वतःचं आवरून ऑफिस ला जायचं. सुट्टीच्या दिवशी आराम करायचा आणि बाहेरची काही कामं करायची. हे इतकच सारंगच आयुष्य होतं. त्याच्या आयुष्यात त्याने स्पृहाला कुठल्याही प्रकारे जागा ठेवली नव्हती. सानिकासाठी जीव सुद्धा काढून देईल असं त्याच बापाचं प्रेम होतं. पण बाप होण्यासोबतच तो एक नवराही आहे हे तो विसरत चालला होता. सारंग आपल्याशी पूर्वीसारखा वागत नाही, आपल्याला टाळतो, कामापुरतच बोलतो. आपल्याशी बोलत नाही ,आपल्याला साध कशी आहेस हे हि विचारत नाही , त्याला आपल्या कुठल्याही कामाची किंमत नाही, सतत चुकाच दिसतात. सतत मी कशी वाईट आहे हेच सांगत असतो ह्या विचारांनी स्पृहाला आणखी डिप्रेशन येऊ लागलं. तिची छोट्या छोट्या कारणावरून चिडचिड होऊ लागली आणि राग कधी कधी बिचार्या छोट्या सानिकावर निघू लागला. कुणाशी शेअर करावं म्हटल तर नवीन शहरात आणि काही महिन्यांच्या नोकरीत अशी जवळची मैत्रीसुद्धा कुणाशी झाली नव्हती. घरी आई बाबांना टेन्शन नको म्हणून ती त्यांनाही काही सांगत नव्हती. तिला कळत होतं कि सानिकावर राग काढणं चुकीचं आहे. आपण हे सगळं सारंगशीच नीट बोलायला हवं. तस तिने त्याचा मूड बघून बोलायचा प्रयत्न केलासुद्धा. पण सारंगच म्हणणं “ स्पृहा , तुझ्या स्वभावातच प्रॉब्लेम आहे. तू तुझा स्वभाव बदल. म्हणजे सगळ नीट होईल. आणि घरातल करतेस म्हणजे माझ्यावर उपकार करत नाहीस. माझ्या आईनेसुद्धा हेच केलं आणि जगातल्या सगळ्या बायकासुद्धा हेच करतात. त्यात काय एवढं विशेष?” हे ऐकून स्पृहा रात्रभर रडत राहिली आणि सारंगला गाढ झोपलेलं पाहून तिच्या मनात त्याच्याविषयी चीड उत्पन्न झाली. सारंगला आपल्याविषयी काहीच वाटत नाही आणि ह्या घरात आपली काहीच किंमत नाही ह्या विचारांनी स्पृहाला घेरलं. तिच्या मनात नको नको ते नकारात्मक विचार यायला लागले. पण सानिकामध्ये तिचा जीव अडकलेला असल्यामुळे तीच मन टोकाची भूमिका घ्याला धजावत नव्ह्तं. एकदा अशीच उदास बसलेली असताना सानिकाला तिच्या जुन्या मैत्रिणीचा नेत्राचा फोन आला. आणि स्पृहाच्या बोलण्यावरून, तिच्या आवाजावरून नेत्रा ला जाणवलं कि काही तरी प्रॉब्लेम आहे. म्हणून तिने स्पृहा ला खोदून खोदून विचारला आणि स्पृहाचा बांध फुटला. एक तास भर ती हमसून हमसून रडत होती आणि मनात इतक्या दिवसाचं साठलेल्या दुःखाचा निचरा करत होती. शेवटी शांत होऊन तिने फोन ठेवला. त्या दिवशी स्पृहा जरा शांतपणे झोपली. पण इकडे नेत्राला तिची खूप काळजी वाटू लागली. रागाच्या भरात आणि डिप्रेशन मध्ये हिने काही वेडं वाकडं पाउल उचललं तर? ह्या कल्पनेनीच नेत्रा अस्वस्थ झाली. दुसऱ्या दिवशी परत तिने स्पृहाला फोन केला आणि बजावलं कि काहीही झालं तरी ती टोकाचं पाउल उचलणार नाही. तिने स्पृहाला सल्ला दिला कि तिने एखाद्या कौन्सिलर कडे जावं. ते नक्की काहीतरी मदत करू शकतील. स्पृहाला तिचं म्हणणं पटलं. तिने लगेच एका चांगल्या कौन्सिलर चा नंबर शोधून appointment घेतली. प्रश्न हा होता कि सारंग ला कसे पटवून द्यायचे. तिने सारंग घरी आल्यावर मनाचा हिय्या करून त्याच्यापुढे हा विषय अतिशय शांतपणे मांडला. त्याने तिचे बोलणे काही सिरीयसली घेतले नाही. उलट तिच्याच स्वभावाला दोष देऊन तिच्याच चुका दाखवून त्यावर , “तिसरा माणूस तुझी काय मदत करणार आहे जोवर तू सुधारत नाहीस तोवर काही होऊ शकत नाही” असं बोलला. आता मात्र स्पृहा चा संयम संपला. तिने त्याला शांतपणे विचारले, “तुझा माझ्यातला इंटरेस्ट संपलाय का? बाहेर कोणी दुसरी मुलगी आवडायला लागलीये का? तसं असेल तर स्पष्ट सांग. मी माझ्या मुलीला घेऊन निघून जाईन. पण माझं आयुष्य असं बरबाद करण्याचा तुला काहीही हक्क नाहीये. हे असं आयुष्य मी जगू शकत नाही. मी कुठलाही गुन्हा केलेला नाहीये कि तू मला त्याची इतकी मोठी शिक्षा द्यावी. तुला जर हे नातं टिकवायची इच्छा असेल तर तू उद्या माझ्यासोबत कौन्सिलर कडे येशील. नाही आलास तर मी इथून निघून जाईन. कुठे जाईन ते तुला काय कोणालाही सांगणार नाही. तुझं माझ्यावर प्रेम आहे म्हणाला होतास म्हणून तुझ्याशी लग्न केलं मी! ह्याला जर प्रेम म्हणत असतील तर जगात कोणीही कोणावर प्रेम करू नये. तू रात्रभर विचार कर. सकाळी काय ते मला सांग.” असं म्हणून स्पृहा सानिका ला घेऊन झोपली. सारंगला ने विचार केला, “हि नेहमीसारखी बडबड करून झोपलीये , सकाळी होईल सगळ नॉर्मल. कशाचा इतका प्रॉब्लेम झालाय हिला काही कळत नाहीये. उगाच इश्यू क्रीएट करतेय. रिकाम्या डोक्याला काही काम नाही म्हणून विचित्र विचार करत बसलीये. काय नवीन खूळ काढलय कौन्सिलरचं काय माहित!” असा विचार करून स्पृहाचं बोलणं अजिबात सिरीयसली न घेता सारंगही झोपला. दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर स्पृहाने परत त्याला थंड स्वरात विचारले. “काय ठरलं तुझं?” सारंग ने तिला म्हटल ,” काय एक एक खूळ डोक्यात घेऊन बसली आहेस? सोड ना आता! काय इतका इश्यू करतेयस?” स्पृहाला हे नवीन नव्हत. खरं तर तिला माहित होतच कि सारंगची हीच reaction असेल. म्हणून तिने परत क्लीअर केलं. “ सारंग , तुला जर माझी आणि आपली नात्याची पर्वा असेल तर विचार कर. हवं तर आज संध्याकाळपर्यंत वेळ घे. आणि संध्याकाळपर्यंत मला निर्णय सांग. इतके दिवस थांबलेय तर आज संध्याकाळपर्यंत थांबणं जड नाही मला. पण आज मला तुझा निर्णय नक्की हवाय कारण ह्यापुढे माझ्या आयुष्यातला एकही दिवस मला असा घालवायचा नाहीये. पूर्ण आयुष्य रडत आणि मन मारत जगणं आता मला जमणार नाही.” स्पृहाने शांतपणे सारंग ला सांगितलं. स्पृहाचं हे रूप सारंग साठी नवीन होतं. त्याला लक्षात आलं कि स्पृहाने नक्की काहीतरी मनाशी पक्क ठरवलंय. तो स्वत:च्या वागण्याचा विचार करू लागला. खरच काही चुकतंय का आपलं? ह्याच विचारात तो ऑफिस ला गेला. ऑफिस मध्ये सुद्धा त्याचं आज कामात लक्ष नव्हत. ऑफिस मधील बाकी लोक आज चॉकलेटडे साजरा करत होते . पण ह्याच कशातच लक्ष नव्हत. अचानक त्याला ऑफिस मधल्या त्याच्या मित्राने आरवने चॉकलेटदिलं व म्हणाला ,”क्या सारंग भाई.. आज कुछ खोये खोये लाग रहे हो! काही भाभी के साथ valentine’s day कहि जाने का प्लान तो नहि बना रहे? चलो कोई नही. Happy chocolate day.. आप लगे रहो अपनी खयालो कि दुनिया में! हम चलते है ! “ आरव ने दिलेलं चॉकलेटपाहून सारंग ला अचानक आठवलं कि स्पृहाला सुद्धा चॉकलेटकिती आवडतं! कित्येक वर्षात आपण तिला चॉकलेटसुद्धा दिलं नाही. आपण खरंच तिच्या आवडी निवडी विसरत चाललोय का? खरंच आपण ती म्हणतेय तस तिला गृहीत धरून इग्नोर करतोय का? आज चॉकलेटडे.. पाच वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी तिला मी प्रपोज केलं होतं आणि आयुष्य एकत्र घालवायच वचन दिलं होतं. आणि आज काय परिस्थिती आहे?” सारंग च्या डोक्यात विचारांचा नुसता गुंता झाला होता. काय करावं काय करू नये ह्याचं त्याला प्रचंड टेन्शन आलं. आणि तेवढ्यात त्याच्या मित्राने लंच साठी त्याला हाक मारली आणि सारंग ची तंद्री भंगली. डबा उघडल्यावर त्याला लक्षात आलं आज स्पृहाने वांग्याची भाजी दिलीये. त्याला आवडते तशी. सारंग ला गिल्टी वाटू लागलं. त्याचं जेवणात सुद्धा लक्ष लागेना! त्याने स्पृहाला फोन केला. त्याला काय बोलावं ते सुचत नव्हतं. त्याने फक्त “सानू शाळेतून आली का आणि काय करतेय हे विचारलं.” स्पृहाने एका वाक्यात उत्तर दिलं. “हो. आलीये. जेवून झोपलीये. अजून काही? “ आणि सारंगने शेवटी विचारलं ,” आज संध्याकाळी किती वाजता जायचंय ?” स्पृहाला तिच्या कानांवर विश्वास बसला नाही. पण तरी तिने “सात वाजता बोलावलंय!” सारंग म्हणाला, “ठीक आहे. मी सहा पर्यंत घरी पोचतो. तयार राहा.” ह्यावर कंठ दाटून आलेली स्पृहा इतकाच म्हणू शकली ,” थॅंक यू वेरी मच सारंग”.. फोन ठेवून सारंग कधी घरी येतो ह्याची स्पृहा वाट बघू लागली. इकडे सारंगचाही ऑफिस मध्ये वेळ जात नव्हता. त्याने काहीतरी विचार केला आणि चार दिवस सुट्टीसाठी अप्लाय केले. बॉस कडून लगेच सुट्टी मंजूरदेखील करून घेतली व आपल्या ट्रॅवेल एजंट मित्राकडून इमर्जन्सी मध्ये काही बुकिंग्स करून घेतली. ऑफिस मधून घरी येताना तो नाक्यावरच्या दुकानात थांबायला विसरला नाही. तिकडून स्पृहाच्या आवडीच्या चॉकलेटस चा बॉक्स घेतला. आणि घरी गेल्या गेल्या त्याने तो बॉक्स तिला दिला आणि म्हणाला, “हॅपी चॉकलेटस डे डियर”.. तिने हि तो बॉक्स स्वीकारून त्याला गोड अशी स्माईल दिली. तिला दुसरं काय हवं होतं म्हणा? आपल्या नवर्याकडून, आपल्या जवळच्या मित्राकडून थोडं प्रेम , थोडी काळजी, थोडं अटेन्शन.. इतकच हवं होतं तिला. ठरल्याप्रमाणे दोघेही कौन्सिलर कडे गेले. जो प्रॉब्लेम होता तो कौन्सिलरच्या मदतीने सोडवायचा प्रयत्न करायचे ठरवले. कौन्सिलर कडून आल्यावर सारंगने स्पृहाला चार दिवस गोवा ट्रीपचं सरप्राईज दिलं. दोघांनीही ह्या ट्रीप मध्ये फक्त एकमेकांना वेळ देऊन मागच सगळ विसरून नव्याने पुढचं आयुष्य सुरु करण्याचा निर्णय घेतला. आणि आई बाप झालो असलो तरी आपण नवरा बायकोही आहोत हे न विसरण्याचा दोघांनीही धडा घेतला.