Wednesday, October 18, 2017

फिरंगी तडका -१० (हॉलंड)

नमस्कार खवैय्यांनो. फिरंगी तडकामध्ये तुमचे परत एकदा स्वागत आहे. मंडळी मागच्या भागात आपण नेदरलँड्स म्हणजेच हॉलंडची भटकंती करता करता तिकडच्या पारंपारिक ब्रेकफास्ट आणि लंचबद्दल माहिती घेतली. आज आपण डच लोक डिनर मध्ये काय काय खातात आणि त्यांना डेझर्ट म्हणून काय खाया आवडते हे बघणार आहोत. मंडळी, डच लोकांना इंग्रजांसारखेच लवकर डिनर करायला आवडते. स्पॅनिश व इटालियन लोकांप्रमाणे यांना रात्रीच्या जेवणाला फार उशीर करायला त्यांना आवडत नाही. अनेक डच परिवार त्यांच्या कुटुंबीयांसोबत जास्तीत जास्त संध्याकाळी सहा वाजता डिनर करणे पसंत करतात. पारंपारिक डच डिनर मध्ये ‘boerenkoolstamppot’ हा पदार्थ असतो. उकडलेला बटाटा बारीक करून त्यात cale म्हणजेच हिंदीत ज्याला आपण करम साग म्हणून ओळखतो ती भाजी घालतात आणि सोबत रुकवर्स्ट म्हणजेच स्मोक्ड सॉसेजेस घालतात. कधी कधी हिवाळ्यात त्यांच्या आवडीचे ‘erwtensoep’ म्हणजेच मटारचे सूप सुद्धा घेतात. डिनर नंतर डेझर्टमध्ये बऱ्याच वेळा व्ला (vla)हे थंड कस्टर्ड डच लोकांचे अत्यंत आवडीचे आहे. हे व्ला डेझर्ट चॉकलेट ,स्ट्रॉबेरी , व्हॅनिला, बनाना , कॅरॅमल अशा अनेक फ्लेवर्समध्ये मिळते. डच लोकांना दुधाच्या पदार्थांबरोबरच गोड पदार्थ सुद्धा फार आवडतात. dropjes’ (Dutch liquorice) आणि ‘koekjes’ (डच बिस्किट्स) हे गोड पदार्थ हॉलंड मध्ये लोकप्रिय आहेत. लहान मुलांना pannenkoeken’ म्हणजेच पॅनकेक आणि ‘poffertjes' (मिनी पॅनकेक) खायला आवडतात. ह्या पॅनकेक ‘stroop’ म्हणजेच घट्ट डच सिरप बरोबर सर्व केल्या जातात आणि त्यावर भरपूर आयसिंग शुगर भुरभुरवलेली असते. इतर देशात पॅनकेक हा ब्रेकफास्टचा मेन्यू समजला जातो परंतु डच लोक लंच किंवा डिनर मध्ये पॅनकेक खाणे पसंत करतात. डच लोक हे गोड पदार्थ खात असले तरी त्यांचा खाण्यावर कंट्रोल असल्यामुळे आणि भरपूर सायकलिंग केल्यामुळे त्यांच्या देशात लठ्ठपणाची समस्या अजिबात नाही. हॉलंडच्या लोकांमध्ये फास्ट फूड सुद्धा खूप लोकप्रिय आहे. त्यांच्याकडे कॉईन ऑपरेटेड मशीन्स असतात. त्यात पैसे टाकले कि आवडीचे पदार्थ येतात. हॉलंड मध्ये FEBO फूड जॉइंट्स फेमस आहेत. FEBO हे नाव ऍमस्टरडॅम जवळच्या Ferdinand Bolstraat ह्या रस्त्यावरून घेतले आहे. कारण त्यांचे पहिले आउटलेट ह्याच रस्त्यावर सुरु झाले होते. जगात जसे Mcdonalds प्रसिद्ध आहे तसे हॉलंड मध्ये FEBO प्रसिद्ध आहे. तिकडे बर्गर, फ्रेंच फ्राईज तर मिळतातच शिवाय ‘kroketten’, frikadel’ , ‘Vlaamse Friet’ , ‘patatje oorlog’, ‘Surinaamse broodje’ असे पदार्थ सुद्धा मिळतात. हे ऑथेंटिक डच पदार्थ आहेत. तुम्ही जर कधी ऍमस्टरडॅमला गेलात तर तिकडचे Poffertjes, Appetaart, Bitterbalen , Rookworst, Stroopwafels, Koffie Verkeerd, Hollandse Nieuwe Herring, Goudse Kaas, Chocoladetters, Drop, Stamppot, Hagelslag, Rijsttafel , Ossenworst, Oliebollen, Lekkerbejke/ kibbeling हे पदार्थ नक्की ट्राय करा. ह्यातील काही पदार्थ नॉनव्हेज आहेत. पण गोड पदार्थ खूप छान असतात. हॉलंड मध्ये पाच प्रकारातून शेतमाल व पदार्थांचे उत्पादन केले जाते. शेती, ग्रीनहाउस, फळांच्या बागा, पशुपालन आणि मासेमारी. शेतीतून बटाटे, बीटरूट, हिरव्या शेंगा, गाजर, सेलेरी, कांदा, कोबी, ब्रुसेल्स स्प्राऊट, फुलकोबी, पालक, शतावरी, लेट्युस अशा भाज्या , ग्रीनहाउस मधून टोमॅटो, लेट्युस, काकडी, स्वीट पेपर असे उत्पादन होते. आणि फळांमध्ये सफरचंद , पियर, चेरी बेरीज, प्लम अशी फळे तिकडे तयार होतात आणि गायी, कोंबड्या, डुकरे, मेंढ्या हे प्राणी तिकडे विविध प्राणीजन्य उत्पादनांसाठी पाळले जातात. तसेच मासेमारीतून विविध प्रकारचे मासे मिळवले जातात. स्मोक्ड ईल आणि सॉस्ड हेरिंग हे डच क्विझीन मधील फेमस प्रकार आहेत. आज आपण बघणार आहोत डच क्विझीन पैकी अत्यंत लोकप्रिय डिश जि तुम्हाला सुद्धा नक्की आवडेल.आपण भेटूच पुढील भागात एका नव्या देशाच्या नव्या माहितीसह. तोवर खाते राहो और खिलाते रहो. रेसिपी- ‘erwtensoep’ डच पीज सूप साहित्य- ६ कप व्हेजिटेबल स्टॉक, २ कप सोललेले मटार दाणे किंवा हिरवा वाटाणा , १ मध्यम आकाराचा कांदा , १ कप बारीक चिरलेले गाजर , २ सेलेरीच्या काड्या चिरलेल्या , २ लसूण पाकळ्या बारीक चिरलेल्या, अर्धा टीस्पून ओरेगॅनो, अर्धा टीस्पून ड्राय बेसिल , पाव टीस्पून जीरा पावडर, अर्धा टीस्पून मीठ, पाव टीस्पून काळीमिरी , ५ टेबलस्पून किसलेले गाजर, २ पातीचे कांदे बारीक चिरलेले कृती- एका मोठ्या भांड्यात ६ कप व्हेजिटेबल स्टॉक, २ कप सोललेले मटार दाणे किंवा हिरवा वाटाणा , १ मध्यम आकाराचा कांदा , १ कप बारीक चिरलेले गाजर , २ सेलेरीच्या काड्या चिरलेल्या , २ लसूण पाकळ्या बारीक चिरलेल्या, अर्धा टीस्पून ओरेगॅनो, अर्धा टीस्पून ड्राय बेसिल , पाव टीस्पून जीरा पावडर हे सर्व एकत्र करा. आणि एक उकळी येईपर्यंत गॅसची फ्लेम हाय ठेवा आणि नंतर गॅसची आच कमी करून मटार/ वाटणे चांगले शिजवून घ्या. मधून मधून मिश्रण ढवळून घ्या. नंतर मीठ आणि काळीमिरी घालून गॅस कमी करून अजून १० मिनिट शिजवून घ्या. हे मिश्रण थंड झाले कि सर्व मिश्रणाची प्युरी करून परत पाच मिनिटांसाठी गरम करून घ्या. सर्व्ह करताना किसलेले गाजर आणि पातीचा कांदा घालून गरमागरम सर्व्ह करा. - वैदेही राजे- जोशी

फिरंगी तडका -९ (नेदरलँड्स /हॉलंड)

Hallo mensen फिरंगी तडका मध्ये तुमचं परत एकदा स्वागत आहे. आज आपण ज्या देशात फिरस्ती करणार आहोत तो युरोपातील देश क्षेत्रफळाने छोटासा असला तरी खूप सुंदर आणि प्रगत आहे. तिथले ट्युलिप गार्डन अतिशय प्रसिद्ध आहेत शिवाय तिथले चीज सुद्धा जगप्रसिद्ध आहे. बरोबर ओळखलंत...आज आपण नेदरलँड्स म्हणजेच हॉलंडच्या खाद्यसंस्कृतीची माहिती करून घेणार आहोत. नेदरलँड्स किंवा ज्याला आपण हॉलंड म्हणून ओळखतो तो देश लहान असला तरी अनेक गोष्टींसाठी जगात प्रसिद्ध आहे. हॉलंडचे बल्ब फिल्ड्स म्हणजेच फुलांची बाग,पवनचक्क्या, चीजचे मार्केट, लाकडी शूज, ऍमस्टरडॅमचे कालवे , अत्यंत प्रगत वॉटर मॅनेजमेंट टेक्निक हे अत्यंत प्रसिद्ध आहेत. तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल पण हॉलंडचा बराचसा भूभाग हा समुद्रसपाटीच्या खाली आहे. ह्या देशाची राजधानी ऍमस्टरडॅम असून येथील राष्ट्रीय भाषा डच आहे. डच लोकांचे जेवण हे मुख्यत्वेकरून मासेमारी,पशुपालन आणि शेतीवर आधारित आहे. डच क्विझीन अत्यंत साधे आणि सरळ आहे. हॉलंड मध्ये दुग्धजन्य पदार्थ लोकांना अतिशय प्रिय आहेत म्हणूनच ह्या दुग्धजन्य पदार्थांचा कुठलाही पदार्थ तयार करताना मुक्त हस्ते वापर केला जातो. ह्यांच्या ब्रेकफास्ट आणि दुपारच्या जेवणात बऱ्याचवेळी वेगवेगळ्या प्रकारचे ब्रेड आणि त्यावर टॉपिंग असे असते किंवा हे लोक नाश्त्याला विविध धान्यांपासून बनवलेल्या सिरियल्सचे सेवन करतात. पारंपारिक डच डिनरच्या मेन्यू मध्ये बटाटे, मांस, आणि सिझनल भाज्या ह्यांचा समावेश असतो. पूर्वी डच डाएट मध्ये कर्बोदके आणि स्निग्ध पदार्थ ह्यांचा जास्त समावेश असे . ह्या कर्बोदक व स्निग्ध पदार्थांची गरज ते दुग्धजन्य पदार्थ ह्यांतून भागवत असत. कारण ज्यांनी ह्या देशाच्या प्रगतीमध्ये मोठा हातभार लावला ते कष्टकरी लोक होते आणि त्यांना शारीरिक कष्ट करण्यासाठी आहारात कर्बोदके व स्निग्ध पदार्थांची आवश्यकता असे. आता मात्र डच क्विझीन सुद्धा ग्लोबलाईज झाले आहे. टिपिकल डच ब्रेकफास्ट मध्ये ब्रेड बटर, किंवा ब्रेड जॅम किंवा ब्रेड वर Hageslag नावाचे चॉकलेट स्प्रीन्कल्स टाकून खाल्ले जाते. किंवा उकडलेले अंडे आणि डच चीज सुद्धा खाल्ले जाते. इतर युरोपियन देशांपेक्षा डच लोकांचा सकाळचा नाश्ता अगदी साधा सोपा असतो. जर नाष्ट्यानंतर भूक लागलीच तर मिड मॉर्निंग खाणे म्हणून ते घरी बनवलेले ऍपल टार्ट किंवा ऍपल पायचा आस्वाद घेतात. त्याची चव आणखी छान लागावी म्हणून ते त्यावर फ्रेश व्हीप केलेले क्रीम घालून खातात. डच लोक दुपारचे जेवण लवकर म्हणजे दुपारी बारा वाजता घेणे पसंत करतात. त्यांना दुपारच्या जेवणात सुद्धा हलका आहार घेणे आवडते. डच चीज घालून केलेले सँडविच म्हणजेच ‘boterham met kaas’ हा पदार्थ दुपारच्या जेवणातील एक पदार्थ आहे.गंमत म्हणजे सगळी दुनिया जेव्हा सँडविच हाताने खाणे पसंत करते तेव्हा डच लोकांना त्यांचे सँडविच काटा आणि सुरीने खायला आवडते. ह्या सँडविच बरोबर त्यांना karnemelk म्हणजेच ताक किंवा Chocomelk म्हणजेच दुध आणि चॉकलेट पासून तयार केलेले गार पेय घ्यायला आवडते. हॉलंड मध्ये गाईंचे प्रमाण माणशी एक गाय असे आहे म्हणूनच तिथे दुध दुभते तुडुंब भरून वाहत असते आणि लोक दुग्धजन्य पदार्थ अगदी आवडीने खातात.आणि दुपारच्या जेवणात ते सफरचंद किंवा संत्र अशी फळे सुद्धा खातात. थोडक्यात त्यांचे जेवण हे साधे, सुटसुटीत आणि एकदम हेल्दी असते. कधी मूड असला तर डच लोक uitsmijter’ हा पदार्थ खातात.Uitsmijter म्हणजे टोस्टबरोबर हॅम आणि दोन ते तीन अंडी वितळलेल्या डच चीज मध्ये कोट करून सर्व केली जातात. आता डच डिनर कसे असते आणि डच लोक डेझर्ट म्हणून काय काय टेस्टी पदार्थ बनवतात हे आपण पुढील भागात बघणारच आहोत. तोवर आज दिलेली रेसिपी करून बघा आणि घर बसल्या हॉलंडचा फील घ्या. Vaarwel!! Rijstebrij (राईस पुडिंग /डच तांदळाची खीर) साहित्य- १ लिटर गाईचे दूध, १५० ग्राम तांदूळ, ५० ग्राम साखर,जायफळ पावडर चवीनुसार, दालचिनी पावडर चवीनुसार, स्ट्रॉबेरी जॅम आवश्यकतेनुसार , वॅनिला इसेन्स आवश्यकतेनुसार कृती – एका भांड्यात दूध गरम करायला ठेवा. दूध उकळल्यावर त्यात धुवून घेतलेले तांदूळ घाला . नंतर साखर घालून चांगले ढवळून घ्या. त्यात चिमुटभर मीठ, आणि वॅनिला इसेन्सचे काही थेंब घाला. वॅनिला इसेन्स नको असल्यास जायफळ आणि दालचिनीपावडर थोडी घालू शकता. नंतर मंद आचेवर पदार्थ शिजवून घ्या. तांदूळ पूर्णपणे शिजवून घेणे आवश्यक आहे. पदार्थ लहान लहान बाउल्स मध्ये सर्व्ह करताना त्यावर ब्राऊन शुगर किंवा स्ट्रॉबेरी जॅम घालून दिल्यास पदार्थाची चव वाढते. -वैदेही राजे- जोशी

फिरंगी तडका -८ (फ्रान्स)

नमस्कार मंडळी. फिरंगी तडका मध्ये तुमचं परत एकदा स्वागत आहे. मागच्या आठवड्यात आपण फ्रेंच क्विझीनची माहिती घेत होतो. ह्या भागात सुद्धा आपण फ्रान्सच्या खाद्यसंस्कृतीची अधिक माहिती घेणार आहोत. १४व्या शतकात Guilaume Tirel ह्या फ्रेंच राजदरबारी असलेल्या खानसाम्याने मध्ययुगीन फ्रेंच रेसिपीजचे Le Viandier नामक एक पुस्तक लिहिले. त्या काळी फ्रेंच खाद्यसंस्कृतीवर इटालियन खाद्यसंस्कृतीचा मोठा प्रभाव होता. पण सतराव्या शतकात François Pierre La Varenne आणि Marie-Antoine Carême ह्या दोन फ्रेंच शेफ लोकांनी खास फ्रेंच शैली विकसित केली आणि फ्रेंच खाद्यसंस्कृतीवर असलेला इतर देशांच्या खाद्यसंस्कृतीचा प्रभाव दूर केला. चीज आणि वाईन ह्या दोन गोष्टी फ्रेंच जेवणात अतिशय महत्वाच्या आहेत. फ्रेंच जेवणाच्या थ्री कोर्स मील मध्ये Hors d'œuvre म्हणजेच पहिल्या कोर्समध्ये Basil Salmon Terrine, Bisque , Foie gras with mustard seeds and green onions in duck jus आणि Croque Monsieur असे पदार्थ खाल्ले जातात. Plat Principal म्हणजेच दुसऱ्या कोर्स मध्ये Pot au feu , Steak fites, Baguette आणि French cheese अशा पदार्थांचा आस्वाद घेतला जातो. Pâtisserie ह्या कोर्स मध्ये पेस्ट्रीज , Mille-fueille, Macaron ,Éclair हे टेस्टी पदार्थ असतात आणि शेवटचा कोर्स म्हणजेच डेझर्ट मध्ये Crème Brulee ,Mousse au chocolat , Crepe , Café liegeosis हे गोड पदार्थ सर्व्ह केले जातात. फ्रेंच फूड कल्चर मध्ये चार प्रकार आहे. पहिला म्हणजे क्लासिकल फ्रेंच क्विझीन ,दुसरा Haute cuisine, तिसरा Nouvelle Cuisine आणि चौथा Cuisine du terroir. क्लासिकल फ्रेंच क्विझीन मध्ये पदार्थ हे क्रीम बेस्ड सॉस मध्ये रिच फ्लेवर देऊन बनवले जातात. Haute cuisine मध्ये पदार्थाचा प्रेझेन्टेशनला फार महत्व दिले जाते. ह्यात उत्तम प्रतीचे पदार्थ वापरले जातात. म्हणूनच हे जेवण जरा महाग असते.Nouvelle Cuisine हे १९७० च्या दशकात तयार करण्यात आले. Haute Cuisine ला पर्याय म्हणून हे पदार्थ तयार करण्यात आले. हे जेवण साधे आणि हलके असते. ह्या पदार्थांमध्ये हेवी क्रीम बेस्ड सॉस वापरणे टाळले जाते. ह्या प्रकारातील पदार्थ तुलनेने कमी वेळात तयार होतात आणि ह्यात सिझनल पदार्थ वापरले जातात. Cuisine du terroir मध्ये वेगवेगळ्या प्रदेशांचे खास पदार्थ असतात. ह्यात स्थानिक पदार्थ आणि पारंपारिक पदार्थ ह्यांच्यावर फोकस केले जाते. काही प्रादेशिक फ्रेच पदार्थ सुद्धा प्रसिद्ध आहेत. जसे लॉरेन मध्ये क्विश लॉरेन ,ब्रिटनी मध्ये crepes आणि galattes ,बर्गंडी मध्ये boeuf bourguignon , Rhone- Alpes चे gratin dauphinois आणि provence मध्ये Bouillabaisse, Ratatouille, Salade Nicoise आणि Pissaladiere हे पदार्थ प्रसिद्ध आहेत. फ्रान्स ची सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे अन्नाची नासाडी रोखण्यासाठी सुपर मार्केटना विक्री न झालेले अन्न फेकून देण्यास बंदी करणारे फ्रान्स हे पहिले राष्ट्र आहे. सुपरमार्केट्सना विक्री न झालेले अन्न फेकून देण्या ऐवजी ते गरजू संस्थांना दान देण्याची सूचना करण्यात आली आहे. आपल्याकडेही असेच झाले तर कितीतरी उपाशी लोक पोटभर जेवू शकतील आणि अन्नाची नासाडी वाचेल. असो. हे होईल तेव्हा होईल. तूर्तास आपण स्वतःपासून सुरुवात करून अन्नाची नासाडी थांबवण्याचा प्रयत्न करूया. बहोत हो गया ग्यान.मूड फ्रेश करण्यासाठी वाचा आजची रेसिपी जी कॉफीप्रेमी लोकांना नक्कीच आवडेल. आपण भेटूच पुढील भागात एका नव्या देशाच्या माहितीसह À bientôt! Café Liegeois साहित्य- ३०० मिली कडक कॉफी किंवा एस्प्रेसो, ५०० मिली थंड व्हिपिंग क्रीम, २५ ग्राम आयसिंग शुगर, १ टेबलस्पून वॅनिला शुगर किंवा चवीप्रमाणे वॅनिला इसेन्स , ५०० मिली वॅनिला आईस्क्रीम किंवा कॉफी आईस्क्रीम कृती- सर्वप्रथम कडक कॉफी किंवा एस्प्रेसो तयार करून घ्या. आणि एक तास फ्रीज मध्ये थंड करून घ्या. ६ डेझर्ट ग्लासेस फ्रीजर मध्ये ठेवून गार करून घ्या. ह्या साठी ३० मिनिटे लागतील. हे ग्लासेस अतिशय थंड असले पाहिजेत. ज्या भांड्यात क्रीम व्हीप करणार आहात ते भांडं सुद्धा फ्रीजर मध्ये ठेवून चिल्ड करून घेणे आवश्यक आहे. भांडे गार झाले कि ते फ्रीजर बाहेर काढून त्यात व्हिपिंग क्रीम नीट घट्ट होईपर्यंत व्हीप करून घ्या, त्यात नंतर आयसिंग शुगर , वॅनिला शुगर किंवा वॅनिला इसेन्स घालून परत नीट फेटून घ्या. हे मिश्रण पातळ असता कामा नये. ते घट्ट होणे आवश्यक आहे. तुमच्याकडे वॅनिला शुगर नसल्यास आयसिंग शुगर एक टेबलस्पून जास्त घाला आणि नंतर वॅनिला इसेन्स घाला. आता फ्रीजर मधील डेझर्ट ग्लासेस बाहेर काढून त्यात आधी गार झालेली कॉफी घाला, त्यावर कॉफी आईस्क्रीम घाला आणि वर व्हीप केलेले क्रीम घातले कि झाले तुमचे फ्रेंच डेझर्ट खाण्यासाठी तयार! -वैदेही राजे – जोशी

फिरंगी तडका -७ (फ्रान्स)

Bonjour मंडळी .. फिरंगी तडका मध्ये तुमचं परत एकदा स्वागत आहे. मागच्या आठवड्यात आपण स्पेनच्या खाद्यसंस्कृतीबद्दल माहिती घेतली. आज आपण स्पेन जवळच्याच एका देशात हॉल्ट घेणार आहोत. तुम्ही बरोबर ओळखलंत. आज आपण फिरणार आहोत फ्रान्समध्ये. फ्रान्स रिपब्लिक हा देश पश्चिम युरोपात वसलेला आहे. फ्रान्स हा देश भूमध्य समुद्रापासून ते इंग्लिश खाडी पर्यंत पसरलेला आहे. ह्या देशाची राजधानी पॅरिस असून इथली राष्ट्रभाषा फ्रेंच आहेत. फ्रेंच क्विझीन हे जगातील सर्वात सर्वोत्कृष्ट क्विझीन पैकी एक समजले जाते. फ्रेच राज्यक्रांती, फ्रेंच परफ्युम्स , आयफेल टॉवर ह्या गोष्टींसोबतच फ्रान्स त्यांचे स्पेशल पदार्थ, त्यांची समृद्ध संस्कृती,अत्यंत प्रगत पायाभूत सुविधा (इन्फ्रास्ट्रक्चर), प्रेमळ व अगत्यशील फ्रेंच लोक, सुखद वातावरण, खेळ व क्रीडा, सुंदर फ्रेंच भाषा, फॅशन जगत, इतिहास, कला, (अनेक जगप्रसिद्ध चित्रकार आणि शिल्पकार हे फ्रेंच होते ), ऐतिहासिक स्मारके, louvre म्युझियम, वाईन ह्या सर्व गोष्टींसाठी फ्रान्स जगात प्रसिद्ध आहे. फ्रान्स मध्ये जेवण म्हणजे थ्री कोर्स मील असतं. , hors d'œuvre or entrée म्हणजे जेवणाची सुरुवात होय. ह्यात बऱ्याच वेळी सूप वाढले जाते . नंतर plat principal म्हणजेच मुख्य जेवण (मेन कोर्स) ,त्यानंतर fromage म्हणजेच चीज कोर्स आणि नंतर कधी कधी डेझर्ट. कधी कधी चीज आणि डेझर्ट च्या आधी सलाड्स सुद्धा वाढले जातात. Hors d'œuvres मध्ये वाढल्या जाणारे पदार्थ पुढील प्रमाणे असतात. फ्रेंच ओनियन सूप किंवा a croque monsieur, lobster bisque ,terrine de saumon au basilic, आणि foie gras. नंतर plat principal दरम्यान a pot au feu or steak frites हे आणि ह्या प्रकारचे पदार्थ वाढले जातात. आणि डेझर्ट मध्ये crème brûlée, a macaron, mille-feuille pastry , an éclair, चॉकलेट मूस आणि Café liégeois हे टेस्टी गोड पदार्थ असतात. येथे प्रत्येक ठिकाणची स्वैपाक करण्याची वेगळी पद्धत आहे आणि त्या त्या ठिकाणचे वेगळे वैशिष्ट्य आहे. उत्तरेकडे पदार्थ करण्यासाठी बटर वापरतात तर दक्षिणेकडे ऑलिव्ह ऑइलचा वापर केला जातो. प्रत्येक भागात पारंपारिक वैशिष्ट्यपूर्ण पदार्थ आहेत. नैऋत्य भागात Cassoulet, Alsace मध्ये Chocroute, लॉरेन भागात Quiche , Bourgogne आणि Provencal Tapenade भागात Beef bourguignon असे पदार्थ लोकांच्या अतिशय आवडीचे आहेत. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे फ्रान्स हे वाईन्स साठी जगप्रसिद्ध आहे. शॅम्पेन , बॉरडॉक्स, Bourgogne आणि Beaujolais ह्या वाईन्स पसिद्ध आहेत आणि Camembert , Roquefort, Brie हे चीजचे प्रकार प्रसिद्ध आहेत. जवळजवळ ४०० प्रकारचे चीज इथे मिळतात. आज आपण chickpea ratatouille हि एक सोपी फ्रेंच रेसिपी कशी बनवतात हे बघूया. हि रेसिपी नक्की करून बघा. आपण भेटूच पुढील भागात फ्रेंच खाद्यसंस्कृतीच्या अधिक माहितीसह. तोवर खाते रहो और खिलाते रहो. Chickpea ratatouille (सौजन्य- allrecipes.com) साहित्य – ३ टेबलस्पून एक्स्ट्रा वर्जिन ऑलिव्ह ऑइल, २ झुकीनी बारीक तुकडे करून, ३ लसूण पाकळ्या बारीक चिरून, दीड कप भिजवलेले काबुली चणे, १ मोठा कांदा बारीक चिरून , पाव कप पार्स्ले बारीक चिरून, २ लाल सिमला मिरच्या बारीक चिरून, पाव कप बेसिल बारीक चिरून, ३ टमाटे चिरून, थाईमच्या ४ काड्या, १ जार टोमॅटो ऑलिव्ह पास्ता सॉस, चवीनुसार मीठ व काळीमिरी पावडर , २ उभ्या आकाराची वांगी तुकडे करून कृती- एका जाड बुडाच्या भांड्यात ऑलिव्ह ऑइल मध्यम आचेवर गरम करा. त्यात बारीक चिरलेला लसूण घालून सुगंध येईस्तोवर एक मिनिट परतून घ्या. आता मंद आचेवर कांद्याचे व सिमला मिरचीचे तुकडे त्यात घालून व्यवस्थित परतून घ्या. झाकण ठेवून शिजवून घ्या. मध्ये मध्ये नीट ढवळत राहा. साधारण पाच मिनिटांत कांदा गुलाबीसर रंगाचा होऊ लागेल. मिश्रणाला सुटलेले पाणी पूर्ण आटू द्या व कांदा ब्राऊन रंगावर परतून घ्या. आता ह्यात चिरलेले टोमॅटोचे तुकडे घालून मिश्रण ढवळून घ्या व भांड्यावर झाकण ठेवून टोमॅटोला पाणी सुटेपर्यंत शिजवून घ्या. पाच मिनिटांत टोमॅटोला पाणी सुटेल.आता ह्यात टोमॅटो ऑलिव्ह पास्ता सॉस, वांग्याचे तुकडे, झुकीनीचे तुकडे, काबुली चणे, पार्स्ले, बेसिल आणि थाइम घाला . त्यात चवीनुसार मीठ व काळीमिरी पूड घालून मिश्रण नीट ढवळून घ्या. आता भांड्यावर झाकण ठेवून मंद आचेवर सर्व भाज्या व काबुली चणे व्यवस्थित शिजवून घ्या. ह्यासाठी साधारण ४० मिनिटे लागतील. सर्व भाज्या व चणे शिजल्यावर झाकण काढून पाणी आटवून घ्या. पाच मिनिटांत मिश्रण घट्ट झाले कि तुमचे Chickpea ratatouille आस्वाद घेण्यासाठी तयार ! -वैदेही राजे- जोशी

फिरंगी तडका भाग - (स्पेन)

नमस्कार मंडळी, फिरंगी तडका मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मागच्या आठवड्यात आपण स्पेनच्या खाद्यसंस्कृती बद्दल माहिती घेतली. आजही आपण स्पेनच्याच आणखी काही पदार्थांबद्दल माहिती करून घेणार आहोत. फुटबॉल , फ्लामेंको , सुंदर समुद्रकिनारा, हॅपनिंग नाईटलाईफ, ला टोमॅटिना फेस्टिवल , बुल फाईट ,सिएस्ता ह्या सर्व गोष्टींसाठी स्पेन जगभरात प्रसिद्ध आहे.लज्जतदार तसेच स्पॅनिश फूड साठी सुद्धा स्पेनचे जगभरात नाव आहे. “आमचं स्पॅनिश फूड जगात सर्वात हेल्दी जेवण आहे”, असं स्पॅनिश लोक मोठ्या अभिमानाने सांगतात. स्पॅनिश जेवण म्हणजे वेगवेगळ्या रंगांचे,पद्धतींचे आणि चवींचे फ्युजन असते. स्पॅनिश लोक आहे खवय्ये असतात आणि त्याचा त्यांना अभिमान आहे. सकाळच्या नाश्त्यापासून तर रात्रीच्या जेवणापर्यंत त्यांच्या जेवणात खूप विविधता असते.सकाळचा नाश्ता ते हलका घेतात. स्ट्रॉंग कॉफी आणि त्याबरोबर जॅम सह बोलोज (स्वीट रोल्स),किंवा टोस्ट जॅम किंवा माईल्ड चीज बरोबर टोस्ट किंवा गरम दुधाबरोबर “मारिया” क्रॅकर्स किंवा Magdalenas (कपकेक सारख्या छोटा .मऊ आणि हलका केक) खातात. त्यानंतर Tapas म्हणजे नाश्ता आणि जेवणाच्या मधल्या वेळात खायचे पदार्थ काही लोक खातात. टॉर्टिला एस्पानोला म्हणजेच स्पॅनिश ऑम्लेट ह्यालाच Tortilla de patata, असेही म्हणतात. स्पॅनिश ऑम्लेट म्हणजेच बटाट्यापासून बनवलेले ऑम्लेट , Patatas Bravas म्हणजेच बटाट्यासह तिखट मसालेदार ब्रावा सॉस , Gambas al Ajillo म्हणजेच लसूण घातलेली कोलंबी माश्यापासून बनवलेला पदार्थ.. हे आणि असे पदार्थ tapas दरम्यान खातात. स्पॅनिश लोक त्यांच्या दुपारच्या जेवणाला La Comida असं म्हणतात. त्याचं दुपारचं जेवण हे भरगच्च असतं. आणि त्यानंतर ते दुपारची वामकुक्षी म्हणजेच सिएस्ता एन्जॉय करतात. दुपारच्या जेवणाबरोबर स्पॅनिश लोक वाईनचा आस्वाद घेतात. तुम्ही जर कुठल्या स्पॅनिश व्यक्तीकडे लंचला गेलात तर तुम्हाला व्हेजेटेबल , बीन्स किंवा सीफूड चे सूप (ह्यात बऱ्याच वेळा भात, पास्ता किंवा बटाटा घातलेला असतो), ताजे मासे, भाजलेले चिकन किंवा मटण, फ्राईड बटाटे, मांसापासून बनवलेले स्ट्यू, हिरवे सलाड किंवा मिक्स भाज्या , अनेक प्रकारचे ब्रेड, पेस्ट्री, फळे किंवा आईस्क्रीम हे डेझर्ट म्हणून आणि कॉफी किंवा वाईन किंवा ब्रँडी असे भरगच्च जेवण तुम्हाला खायला मिळेल. स्पॅनिश लोकांना अंडी तसेच दुधाचे पदार्थ विशेष प्रिय आहेत. म्हणूनच त्यांचे बरेचसे गोड पदार्थ हे फ्रेश क्रीम आणि दुधापासून बनवलेले असतात. तसेच अनेक प्रकारची फळे सुद्धा त्यात घालतात आणि ह्या डेझर्ट बरोबर सॉफ्ट चीज सुद्धा वाढले जाते. दुपारच्या जेवणानंतर भूक लागली तर रात्रीच्या जेवणाआधी La Merienda म्हणजेच स्नॅक्स ची वेळ असते. ह्या वेळी फ्रेंच स्टाईल ब्रेड चॉकलेटसह खातात किंवा सलामी किंवा हॅम सोबत ब्रेड खातात. ह्यानंतर रात्रीच्या जेवणाला la cena असे म्हणतात. स्पॅनिश लोक रात्रीचा आहार लंच पेक्षा हलका ठेवण्यावर भर देतात. रात्रीच्या जेवणात ते ताजे मासे किंवा रोस्टेड चिकन किंवा मटण ह्यासोबत फ्राईड बटाटे किंवा भात ह्यांचा आस्वाद घेतात. सोबत ग्रीन सलाड सुद्धा घेतात. स्पॅनिश डिनर मधील एक प्रसिद्ध पदार्थ म्हणजे arroz cubano. हा पदार्थ म्हणजे भाताच्या मुदीवर त्यांचा स्पेशल टोमॅटो सॉस आणि फ्राईड अंड होय. डेझर्ट मध्ये ते ताजे सिझनल फळ किंवा flan म्हणजे स्पॅनिश व्हॅनिला कस्टर्ड खातात. कधी कधी रात्री जेवणानंतर ते Churros ह्या स्पेशल पदार्थाचा आस्वाद घेतात. हयासह ते हॉट चॉकलेट घेणे पसंत करतात. आज आपण टिपिकल स्पॅनिश फ्लॅन कसे बनवतात हे बघू. भेटू पुढील भागात तोवर खाते रहो और खिलाते रहो. बेसिक स्पॅनिश फ्लॅन साहित्य- ३/४कप साखर, ३५० मिली आटवलेले दूध, दीड कप फुल क्रीम दूध, ४ अंडी, १ टीस्पून व्हॅनिला इसेन्स , साखर किंवा मध अजून गोड हवे असल्यास कृती- सॉसपॅनमध्ये साखर घेऊन ती मध्यम आचेवर ठेवा. साखर हळू हळू वितळू लागेल आणि तिचा रंग पालटून ब्राऊन होऊ लागेल. ती सतत ढवळत राहा. साखर वितळली कि ती फ्लॅन च्या साच्यात काढून घ्या, आता ती घट्ट होऊ लागली तरी काळजी करू नका कारण बेक करायला घेतल्यावर ती परत वितळेल. आता एका भांड्यात आटवलेले दूध( तुम्ही कंडेन्स्ड मिल्क सुद्धा वापरू शकता), साधे दूध , अंडी आणि व्हॅनिला इसेन्स एकत्र करून घ्या. ते चांगले फेटून घ्या.तुम्हाला पदार्थ जास्त गोड हवा असल्यास हे मिश्रण फेटत असतानाच त्यात साखर किंवा मध घालू शकता. आता हे मिश्रण साच्यात ओतून घ्या. एका मोठ्या भांड्यात एक इंच इतके पाणी घाला आणि त्यात हा साचा ठेवा. पण साच्याच्या वर पाणी जाईल इतके पाणी घालू नका. आणि साचा ठेवलेले भांडे ओव्हन मध्ये ठेवा आणि ओव्हन ३५० डिग्री फॅरेनहाईट वर सेट करा. ओवनला प्रीहीट करून ठेवू नका. हे मिश्रण एक तास बेक करून घ्या. एका तासाने सुरी घालून मिश्रण नीट बेक झाले आहे ह्याची खात्री करून घ्या. फ्लॅन चांगले बेक झाल्यावर साचा थंड होऊ द्या. आता कॅरामेल वर आणि फ्लॅन खाली अशा पद्धतीने त्यातून फ्लॅन काढून घ्या. आणि फ्रीज मध्ये चिल्ड करून फ्लॅनची मजा अनुभवा. वैदेही राजे- जोशी

फिरंगी तडका –स्पेन

नमस्कार मंडळी, मागच्या आठवड्यात आपण युरोपच्या सफरीवर निघालो होतो आणि बेलारुसच्या खाद्यसंस्कृतीबद्दल जाणून घेतलं! आजही आपण युरोपातीलच आणखी एका देशाच्या खाद्यसंस्कृतीबद्दल माहिती घेणार आहोत. Reino De Espana म्हणजेच किंग्डम ऑफ स्पेन हे युरोपातील दक्षिण-पश्चिम भागात वसलेले स्वतंत्र राष्ट्र आहे. ह्या देशाची राजधानी माद्रिद असून बार्सेलोना, व्हेलेन्शिया, Seville, Malaga आणि Bilbao हि ह्या देशातील प्रमुख शहरे आहेत. ह्या देशात लोकशाही व राजेशाही दोन्ही अस्तित्वात आहेत. स्पेनचे सध्याचे राजे हे फिलीप सहावे आहेत व स्पॅनिश हि ह्या देशाची प्रमुख भाषा आहे.ह्याशिवाय कॅटलन, Galician , Basque व Occitan ह्या भाषा सुद्धा येथे बोलल्या जातात. स्पॅनिश खाद्यसंस्कृतीमध्ये अनेक प्रकारच्या पदार्थांचा समावेश होतो. इथे बरेचसे पदार्थ हे सीफूड पासून बनवले जातात. कारण ह्या देशाच्या पूर्वेला व दक्षिणेला भूमध्य समुद्र आहे. आणि पश्चिमेला अटलांटिक महासागर आहे. मोठा सागरकिनारा लाभल्यामुळे स्पेन मध्ये मोठ्या प्रमाणावर सीफूड खाल्ले जाते. ह्या देशात तीन प्रकारची खाद्यसंस्कृती आढळून येते. ती म्हणजे भूमध्य स्पेन, अंतर्गत स्पेन, आणि अटलांटिक स्पेन. भूमध्य स्पॅनिश खाद्यसंस्कृतीत प्रामुख्याने सीफूड (pescaíto frito म्हणजे तळलेला मासा), gazpacho सारखे कोल्ड सुप्स आणि तांदळापासून बनवेले पदार्थ म्हणजे paella, आणि arros negre (black rice) खाल्ले जातात. अंतर्गत स्पेन मध्ये घट्टसर आणि गरम सुप्स प्यायले जातात. कॅस्तिलियन सूप हे ब्रेड आणि लसूण ह्यापासून बनवले जाते. तसेच Cocido Madrileno ह्या प्रकारचे स्ट्यू बनवले जातात. स्पॅनिश हॅम, manchego चीज सारखे पदार्थ खारवून किंवा ऑलिव्ह ऑईल मध्ये साठवले जातात. अटलांटिक स्पॅनिश खाद्यसंस्कृती मध्ये भाज्या आणि फिश ह्यांच्यापासून caldo gallego किंवा marmitako हे स्ट्यू बनवतात. तसेच lacon ham चा वापर केला जातो. समुद्रकिनारा असल्याने येथे मासे हा इथल्या खाद्यसंस्कृती मधील अविभाज्य घटक आहे. Basque-style cod, albacore किंवा anchovy किंवा ऑक्टोपस पासून बनवलेले polbo á feira व शेलफिश पासून अनेक पदार्थ बनवले जातात. आज आपण बघणार आहोत एका साधी सोपी सूप ची रेसिपी जिचा आस्वाद आपण सध्याच्या पावसाळ्याच्या सिझन मध्ये घेऊ शकतो. तुम्ही हि रेसिपी जरुर करून बघा. भेटू पुढील भागात अजून एका स्पॅनिश रेसिपीसह. तोवर खाते रहो और खिलाते रहो! स्पॅनिश गार्लिक व व्हेजिटेबल सूप (सौजन्य- allrecipes.com) साहित्य – १ टेबलस्पून ऑलिव्ह ऑईल , ३ मोठे गाजर तुकडे करून, १ मध्यम आकाराची पानकोबी चिरून, एका छोट्या फुलकोबीचे तुकडे , २ हिरवे कांदे चिरून, ६ लसणाच्या पाकळ्या , २-३ टोमॅटो बारीक चिरून , ४ टेबलस्पून टोमॅटो पेस्ट, गरजेपुरते पाणी, पाव कप दूध किंवा लाईट क्रीम, १ टेबलस्पून बटर,मीठ व मिरीपूड चवीनुसार कृती – एका मोठ्या भांड्यात तेल घालून ते तापत ठेवा. त्यात गाजर, हिरवा कांदा,पानकोबी व फुलकोबीचे तुकडे घाला.जोवर कोबीचा रंग पालटत नाही तोवर सर्व भाज्या सतत ढवळत राहा. नंतर त्यात लसूण व टोमॅटोची पेस्ट घाला व एक ते दोन मिनिट शिजू द्या. मिश्रण सतत ढवळणे आवश्यक आहे.नाहीतर लसूण करपण्याची शक्यता आहे. ह्यानंतर ह्यात २ कप पाणी घाला व झाकण ठेवून गॅसची फ्लेम कमी करा. हे मिश्रण दहा मिनिट शिजू द्या. नंतर ह्यात चिरलेले टोमॅटो घाला आणि अजून २ कप पाणी घाला व गॅसची फ्लेम वाढवून एक उकळी येऊ द्या. परत गॅसची फ्लेम कमी करून झकण ठेवा व हे मिश्रण २० मिनिट शिजू द्या. आता फूड प्रोसेसर मध्ये ह्या मिश्रणाची प्युरी करून घ्या पण त्या आधी ह्यातील २ कप पाणी बाजूला काढून ठेवा. आता त्या प्युरी मध्ये काढून ठेवलेले २ कप पाणी , क्रीम/ दूध आणि बटर घालून उकळायला ठेवा. १ मिनिट शिजल्यावर त्यात मीठ व मिरीपूड घाला आणि गरमागरम सूपचा आस्वाद घ्या.

फिरंगी तडका मोमोज स्पेशल

नमस्कार मंडळी!फिरंगी तडका मध्ये तुमचं परत एकदा स्वागत आहे. तर आज अनेकांच्या घरी वाजतगाजतआपल्या लाडक्या मंगलमुर्ती मोरयाचे आगमन होणार.गणपतीबाप्पा तुम्हा सर्वांना सुख ,समाधान, यश, उत्तम आरोग्याचा आशीर्वाद देवो! तुमची सगळी विघ्ने दूर करो. आज बाप्पाला सगळे वेगवेगळ्या प्रकारच्या मोदकांचा नैवेद्य दाखवणार. उकडीचे मोदक, तळलेले मोदक, काजू मोदक,ड्रायफ्रुट चे मोदक तसेच चॉकलेट मोदक आणि खवैय्यांच्या सुपीक डोक्यातून निघालेल्या अनेक रेसिपीज वापरून तयार झालेले विविध प्रकारचे मोदक आपण तयार करतो. मोदकांवरून आठवले कि फक्त भारतातच नव्हे तर परदेशात सुध्दा गणेश चतुर्थी साजरी केली जाते. मौरीशस, कॅनडा , अमेरिका तसेच युके मध्ये सुद्धा उत्साही भक्त गणेशचतुर्थी साजरी करतात. इंडोनेशियात तर श्रीगणेशाची अनेक मंदिरे आहेत आणि त्यांच्या करन्सीवर सुद्धाविद्येची देवता म्हणून श्रीगणेशाचे चित्र आहे. आपले शेजारी म्हणजेच नेपाळ आणि श्रीलंकेत सुद्धा हिंदू लोक श्रीगणेशाची पूजा करून गणेशचतुर्थी साजरी करतात. आणि नैवेद्य म्हणून त्यांच्याकडचे स्पेशल पदार्थ असतात. ह्यावरून एक जोक आठवला. मोमो म्हणजे काय तर मोदकाचा फॉरेनचा भाऊ! जोक्स अपार्ट मोमोज म्हणजे खरंच उकडीच्या मोदकांचेच एक व्हेरीयेशन आहे. ह्याचा आकार एकत्र आपल्या मोदाकांसारखा किंवा करंजीसारखा असतो. ह्या मोमोजचा उगम हिमालयाच्या परिसरात झाला. मुळचा नेपाळचा असलेला हा पदार्थ नंतर चीन, तिबेट, भूतान, मंगोलिया, कोरिया आणि जपान मध्ये जाऊन स्थिरावला. चीन मध्ये ह्या मोमोजना पिनयीन किंवा बओझी किंवा जियोझी म्हणतात तर मंगोलियात ह्या पदार्थाचं बारसं buzz असं झालं. जपानमध्ये मोमोजना ग्योझा तर कोरिया मध्ये मंडू असे म्हणतात. पूर्वी मोमोज पारंपारिक पद्धतीने करायचे झाले तर मैद्याच्या पारी मध्ये तिबेटीयन लोक मांसाचे सारण भरत असत. ह्या पारीमध्ये चांगले टेक्स्चर येण्यासाठी हे लोक थोडे यीस्ट किंवा बेकिंग सोडा घालत असत. आता मात्र मोमोज मध्ये अनेक प्रकारची व्हरायटी आली आहे. ज्यांना मांस नको असेल त्यांच्या साठी भाज्या , टोफू , पनीर, चीज किंवा मउ छुर्पी(तिकडचे लोकल हार्ड चीज) ह्या पदार्थांपासून अनेक परम्युटेशन आणि कॉम्बिनेशन करत अनेक प्रकारचे मोमोज जगभरात बनवले जातात. मांसाहारी लोकांसाठी नेपाळ, भूतान, चीन ,जपान,कोरिया ह्या ठिकाणी चिकन, मटण, बीफ, मेंढीचे मांस, याक मीट वापरतात. ह्या सारणात ते कांदा, लसूण, आलं, कोथिंबीर, सोया सॉस आणि क्वचित कधीतरी tomato ची प्युरी सुद्धा वापरतात. शाकाहारी लोक मोमोज मध्ये बारीक चिरलेल्या भाज्या जसे कोबी, बटाटा, गाजर, मश्रूम आणि आपापल्या आवडीच्या भाज्या घालतात. भारतात आणि नेपाल मध्ये भाज्या ,पनीर आणि चीज घालून केलेले मोमोज सर्वात जास्त लोकप्रिय आहेत. काठमांडू मध्ये खवा आणि साखर घालून केलेले गोड मोमोज अत्यंत प्रसिद्ध आहेत. (आपल्या गूळ खोबऱ्याचे सारण घालून केलेल्या उकडीच्या मोदकांचा हाच तो विदेशी भाऊ). हे मोमोज मुक्तु नावाच्या भांड्यात वाफवले जातात. काही ठिकाणी ज्यांना फक्त वाफवलेले मोमोज आवडत नाहीत ते लोक मोमोजना डीप फ्राय करतात किंवा अगदीच तेल नको असेल तर शॅलो फ्राय करतात . हे मोमोज एकतर सोया सॉस किंवा चिली सॉस बरोबर खाल्ले जातात. आपल्याकडे भारतात हे चटणी बरोबर सर्व केले जातात. तर काय मंडळी मोमोजचे वर्णन वाचून तोंडाला पाणी सुटले असेल ना? चला तर मग पुढे दिलेली रेसिपी वाचा आणि पटकन मोमो बनवून त्यांचा आस्वाद घ्या!आपण भेटूच पुढील भागात! गणपती बाप्पा मोरया! व्हेजिटेबल मोमोज साहित्य- पारीसाठी : मैदा -२ कप, तेल- १ टीस्पून, मीठ चवीनुसार, कोमट पाणी आवश्यकते नुसार सारणासाठी – मध्यम आकाराचा कांदा -१ बारीक चिरून, हिरव्या मिरच्या- १-२ बारीक चिरून, आलं – अर्धा इंच बारीक चिरून, लसूण-२ ते ३ पाकळ्या बारीक चिरून, गाजर- पाउण कप बारीक चिरून, पानकोबी -१ कप बारीक चिरून, सोया सॉस – १ टीस्पून, साखर –पाव चमचा, मीठ चवीनुसार, काळीमिरी पूड- पाव चमचा कृती- मोमोजची पारी बनण्यासाठी एका भांड्यात मैदा, तेल व मीठ एकत्र करून घ्या आणि हळूहळू कोमट पाणी घालून मऊ गोळा मळून घ्या. हा गोळा झाकून ठेवा. आता सारण बनवण्यासाठी एका कढईत थोडे तेल घालून त्यात लसूण घाला, एक मिनिट परतून घ्या. त्यात बारीक चिरलेली हिरवी मिरची, आलं घाला आणि व्यवस्थित ढवळा. ह्यात चिरलेला कांदा घालून कांदा गुलाबीसर होई पर्यंत तीन ते चार मिनिट परतून घ्या. नंतर ह्यात चिरलेले गाजर घालून तीन ते चार मिनिटे चांगले शिजवून घ्या व नंतर कोबी घालून चांगले आठ ते दहा मिनिटे शिजवून घ्या.(ह्याच वेळी तुम्ही ह्यात तुमच्या आवडीच्या आणखी भाज्या जसे मक्याचे दाणे, फुलकोबी, सिमला मिरची, ब्रोकोली, मटार, मश्रूम किंवा पनीर, टोफू घालू शकता). ह्यानंतर ह्यात सोया सॉस ,काळीमिरी पावडर, साखर,मीठ हे सर्व घालून नीट ढवळून घ्या. हे मिश्रण ओले चिकट किंवा पातळ असता कामा नये. आता हे मिश्रण थंड होऊ द्या. आता मोमोज साठी भिजवलेला मैद्याचा गोळा परत दोन ते तीन मिनिटांसाठी नीट मळून घ्या. ह्या गोळ्याचे लहान लहान गोळे करून घ्या. आणि त्यावर थोडा कोरडा मैदा भुरभुरावा.आता मोदाकांसारखी पारी करून त्यात एक चमचा भरून वरील सारण घाला आणि मोदकांचा आकार देऊन मोमोज नीट बंद करून घ्या. सर्व मोमोज तयार होईपर्यंत आधी तयार झालेले मोमोज ओल्या फडक्या खाली झाकून ठेवा म्हणजे ते कोरडे पडणार नाहीत. आता हे तयार झालेले मोमोज मोदक पात्रातकिंवा कुकर मध्ये मोदक जसे वाफवून घेतो तसेच १० मिनिटांसाठी वाफवून घ्या. गरमागरम मोमोजचा सॉस किंवा चटणी बरोबर आनंद लुटा. वैदेही राजे –जोशी

फिरंगी तडका -2

नमस्कार मंडळी . फिरंगी तडका मध्ये तुमचं परत एकदा स्वागत आहे. मागच्या भागात आपण पूर्व युरोपातील एक देश बेलारूस बद्दल बोलत होतो. आपण तिथे स्वैपाकात कुठल्या पदार्थांचा वापर करतात ह्याविषयी माहिती घेत होतो. ह्या भागात सुद्धा आपण बेलारूसच्या खाद्यसंस्कृतीबद्दलच आणखी माहिती करून घेणार आहोत. तर बेलारूस मध्ये पानकोबी, बीट, सलगम,गाजर, swedes, parsnip , लाल भोपळा, बटाटा, काकडी, कांदा, लसूण , सॉरेल , क्विनोआ, मशरूम ह्या भाज्या कच्च्या किंवा स्ट्यू बनवून खाण्याची पद्धत आहे. बीट आणि धान्यांमध्ये बिन्स, मटार, ओट्स, डाळी आणि राजमा ह्याचा वापर त्यांच्या स्वैपाकात केला जातो. तसेच काळे जिरे, धणे, मोहरी,चेरी , ओक लीव्हज,अळशीच्या बिया, वेखंड, हॉर्सरैडिश ह्या मसाल्यांचा वापर केला जातो. पानकोबी पासून बनवलेले borscht हे घट्ट सूप बेलारूस मधील लोकांचे अत्यंत आवडीचे आहे. ह्यात ते धान्य, बटाटे आणि काही ठिकाणी मांस घालून borscht बनवतात. ह्यातही गरम व थंड असे दोन प्रकार आहेत. बेलारुशियन chaladnik म्हणजेच cold borscht हे बीट, बीटची पाने ह्यापासून बनवतात आणि क्रीम, उकडलेली अंडी , व उकडलेला बटाटा ह्यासोबत सर्व करतात. बेलारुशियन लोकांचे जेवण म्हणजे पोर्क पासून बनवलेला स्ट्यू (machanka), vereshchaka, घरी तयार केलेले सॉसेजेस, draniki म्हणजेच बटाट्यापासून तयार केलेल्या पॅनकेक (ज्याची कृती आपण मागील भागात बघितली) , kolduny , डम्प्लिंग म्हणजेच kletski, बाबका म्हणजे बटाट्यापासून तयार केलेले एक प्रकारचे पाय, थंड सॉरेल सूप किंवा मशरूम सूप , पोटॅटो पंच केक असे असते. तसेच दही, क्रीम , चीज, गाईचे किंवा बकरीचे दुध ह्याचा सुद्धा बेलारुशियन डाएट मध्ये समावेश असतो. आज आपण बाबका ह्या बेलारुशियन डेझर्टची कृती बघणार आहोत. हा पदार्थ अत्यंत चविष्ट आहे आणि म्हणूनच त्या देशात लोकांच्या अतिशय आवडीचा आहे. चॉकलेट बाबका साहित्य- ३/४ कप कोमट दूध, अर्धा कप आणि वर २ टीस्पून साखर, ३ टीस्पून ड्राय यीस्ट, ३-१/४ कप मैदा, २ मोठी अंडी, १ मोठ्या अंड्याचा पिवळा बलक, १ टीस्पून वॅनिला इसेन्स, १० टेबलस्पून बटर (मीठ विरहित ) एग वॉश साठी साहित्य- १ मोठ्या अंड्याचा पिवळा बलक, १ टेबलस्पून हेवी क्रीम,किंवा फुल क्रीम दूध चॉकलेटफिलिंग साठी साहित्य- ५ टेबलस्पून मीठविरहित बटर, बिटरस्वीट चॉकलेट (६०% कोको) चे २ बार लहान तुकडे करून घेतलेले ,१/४ कप साखर कृती- कणिक तयार करून घेण्याची कृती मिक्सर मध्ये कोमट दूध आणि २ टीस्पून साखर एकत्र करून घ्या. त्यात यीस्ट मिसळ आणि मिश्रण ५ मिनिटासाठी बाजूला ठेवा. ह्या यीस्ट च्या मिश्रणात अर्धा कप मैदा घाला आणि मिडीयम स्पीड वर संपूर्ण मिश्रण एकजीव होईपर्यंत फेटून घ्या. त्यात अंडी, अंड्याचा पिवळा बलक, वॅनिला इसेन्स आणि उरलेली अर्धा कप साखर एकत्र करा आणि मिश्रण एकजीव होई पर्यंत फेटून घ्या. आता उरलेला मैदा हळू हळू मिश्रणात मिसळा आणि एकजीव होई पर्यंत हळू हळू फेटून घ्या. त्यात बटर घालून मिडीयम स्पीड ने फेटा. तुमचे मिश्रण चिकट आणि मऊ असे तयार व्हायला हवे. आता हा गोळा एका तेल लावलेल्या भांड्यात काढून झाकून ठेवा. उबदार जागेत हे भांडे ठेवा म्हणजे तो गोळा नीट फुलेल. हा गोळा दीड ते दोन तास ठेवा. आता केक/ ब्रेड च्या साच्यात पार्चमेंट पेपर एक उभा व एक आडवा अशा पद्धतीने लावून घ्या. आता मैद्याच्या गोळ्याचे दोन भाग करा आणि एक भाग खाली चिकटणार नाही अशा पद्धतीने आयताकृती लाटून घ्या. आता अंड्याचा पिवळा बलक आणि क्रीम एकत्र फेटून घ्या मैद्याच्या आयताकृती तुकड्यावर अडीच टेबलस्पून बटर पसरवून घ्या. आणि बोर्डर ला ब्रश ने एग वॉश लावा. आता त्यावर अर्धे चॉकलेट एकसंध पसरवून घ्या आणि त्यावर २ टेबलस्पून साखर घाला. तो ह्या केक च्या साच्यावर लावा आणि एग वॉशच्या मदतीने सगळ्या बाजूंनी नीट सीलबंद करा. आणि ह्या गोळ्याला आठचा आकार द्या. आणि हा गोळा आता केकच्या साच्यात लावून घ्या. ह्याच पद्धतीने मैद्याचा दुसरा गोळा तयार करा आणि दुसऱ्या साच्यात ठेवा. आता हे दोन्ही साचे उबदार जागेत एक ते दोन तासांसाठी झाकून ठेवा. हे दोन्ही आठ च्या आकारातील मैद्याचे गोळे व्यवस्थित फुलले आहेत अशी खात्री झाल्यावर बेकिंग ची तयारी करा. अवन ३५० डिग्री Fahrenheit ला प्रीहिट करा. दोन्ही मैद्याच्या गोळ्यांना एग वॉश लावून घ्या. आणि गोल्डन ब्राऊन रंग येईस्तोवर ते बेक करून घ्या. बेक झाल्यानंतर बाबका साच्यातून काढून रूम टेम्परेचरवर येईपर्यंत ठेवा. तुमचा चॉकोलेट बाबका केक तयार आहे. हि अतिशय टेस्टी डिश आहे. नक्की करून बघा. भेटू पुढील भागात नव्या देशातील रुचकर पदार्थांसह! तोवर खाते रहो और खिलाते रहो. वैदेही राजे- जोशी

फिरंगी तडका-1

नमस्कार मंडळी, फिरंगी तडका मध्ये तुमचं परत एकदा स्वागत आहे. तर मग तयार आहात ना आजच्या सफरीसाठी? आज आपण जाणार आहोत युरोप टूरला. आज आपण ज्या देशात फेरफटका मारणार आहोत त्या देशाचं नाव आहे बेलारूस. हा देश पूर्व युरोप मध्ये वसलेला आहे.ह्या देशाच्या एका बाजूला रशिया तर दुसऱ्या सीमेजवळ युक्रेन, पोलंड हे देश आहात. ह्या देशात सर्वात जास्त लोकसंख्या आहे ह्या देशाच्या राजधानीची म्हणजेच मिन्स्क ह्या शहराची. ह्या देशाच्या एकूण क्षेत्रफळापैकी ४० टक्क्के भाग जंगलाने व्यापला आहे. बेलारूस वर अनेक देशांनी राज्य केले पण १९१७ सालच्या रशियन राज्यक्रांती नंतर बेलारूस वर सोव्हिएत रशियाचे राज्य होते. पण १९९१ साली रशियाचे विभाजन झाल्यानंतर बेलारुसला स्वातंत्र्य मिळाले. बेलारूसची खाद्य संस्कृती बरीचशी पूर्व आणि उत्तर युरोपातील देशांच्या खाद्यसंस्कृतीशी मिळती जुळती आहे. ह्यांच्या रोजच्या जेवणात मांस आणि भाज्यांचा समावेश असतो. त्यांचे पारंपारिक जेवण सूप आणि मेन कोर्स हे दोनच पदार्थ असतात. ते जेवतात त्या स्पेशल पॉटला sparysh असे नाव आहे. ह्या भांड्याला दोन खण असतात. पूर्वी ह्या भांड्याचा वापर शेतकरी करत असत. ह्या देशात दुसऱ्या महायुद्धापूर्वी सलाड आणि इतर snacks कॉमन नव्हते. रशियन पदार्थ ह्या देशात दुसऱ्या महायुद्धानंतर प्रचलित झाले. ताजे व्हाईट चीज आणि अनेक प्रकारचे मांस सणासुदीला मिळत असे. ह्या देशात अतिथंड वातावरणात गहू फारसा पिकत नसल्याने राई ब्रेड ह्या लोकांच्या जेवणाचा अविभाज्य घटक आहे. ह्यासोबतच लोकल व्होडका किंवा harelka हे पेय सुद्धा rye malt पासून तयार करण्यात येते. बेलारूस मध्ये पॅनकेकचे म्हणजेच ब्लिनीचे असंख्य प्रकार तुम्हाला चाखायला मिळतील. हे पॅनकेक बकव्हीट , ओटमील किंवा गव्हाच्या पिठापासून बनवले जातात. तसेच बार्ली, ओटमील , बकव्हीट ह्या पासून बनवलेल्या फ्लेक्स (cereal) बेलारुसमध्ये लोकप्रिय आहेत. बटाटा ह्या एका भाजी पासून बेलारूस मध्ये अनेक पदार्थ केले जातात. आज आपण त्यापैकीच एक पदार्थ draniki कसा बनवायचा हे जाणून घेणार आहोत. पारंपारिक Draniki साहित्य- १२ बटाटे, १ कांदा, तेल, चवीपुरते मीठ कृती- प्रथम सर्व बटाटे धुवून त्यांची साले काढून घ्या. आणि नंतर ते किसून घ्या. ह्यात कांदा सुद्धा किसून घाला म्हणजे बटाट्याचा कीस काळा पडणार नाही. बटाटे व कांदा दोन्ही एकदम बारीक किसणे आवश्यक आहे. ह्या किसात तेल आणि चवीपुरते मीठ घाला आणि एकत्र करून घ्या.हे मिश्रण एकजीव मउ पेस्ट सारखे व्हायला हवे. आता फ्राईंग पॅन गॅस वर ठेवून त्यात थोडे तेल घाला. आणि एक टेबलस्पून इतके मिश्रण फ्राईंग पॅन मध्ये घाला व ते धिरडे करतो तसे पसरवून घ्या. एका बाजूने ते शिजले कि उलटून दुसऱ्याही बाजूने ते कुरकुरीत भाजून घ्या. प्रत्येक बाजू शिजून कुरकुरीत व्हायला किमान २ ते ३ मिनिटे लागतील. हे drankini , sour क्रीम बरोबर सर्व करतात. अगदी सोपी पण एकदम टेस्टी कृती आहे. हा पदार्थ नक्की करून बघा. बेलारूस च्या पदार्थांबद्दल अधिक पुढील भागात जाणून घेऊया. भेटू पुढील भागात.. तोवर खाते रहो और खिलाते रहो.. वैदेही राजे- जोशी