Wednesday, October 18, 2017
फिरंगी तडका -७ (फ्रान्स)
Bonjour मंडळी .. फिरंगी तडका मध्ये तुमचं परत एकदा स्वागत आहे. मागच्या आठवड्यात आपण स्पेनच्या खाद्यसंस्कृतीबद्दल माहिती घेतली. आज आपण स्पेन जवळच्याच एका देशात हॉल्ट घेणार आहोत. तुम्ही बरोबर ओळखलंत. आज आपण फिरणार आहोत फ्रान्समध्ये. फ्रान्स रिपब्लिक हा देश पश्चिम युरोपात वसलेला आहे. फ्रान्स हा देश भूमध्य समुद्रापासून ते इंग्लिश खाडी पर्यंत पसरलेला आहे. ह्या देशाची राजधानी पॅरिस असून इथली राष्ट्रभाषा फ्रेंच आहेत. फ्रेंच क्विझीन हे जगातील सर्वात सर्वोत्कृष्ट क्विझीन पैकी एक समजले जाते. फ्रेच राज्यक्रांती, फ्रेंच परफ्युम्स , आयफेल टॉवर ह्या गोष्टींसोबतच फ्रान्स त्यांचे स्पेशल पदार्थ, त्यांची समृद्ध संस्कृती,अत्यंत प्रगत पायाभूत सुविधा (इन्फ्रास्ट्रक्चर), प्रेमळ व अगत्यशील फ्रेंच लोक, सुखद वातावरण, खेळ व क्रीडा, सुंदर फ्रेंच भाषा, फॅशन जगत, इतिहास, कला, (अनेक जगप्रसिद्ध चित्रकार आणि शिल्पकार हे फ्रेंच होते ), ऐतिहासिक स्मारके, louvre म्युझियम, वाईन ह्या सर्व गोष्टींसाठी फ्रान्स जगात प्रसिद्ध आहे.
फ्रान्स मध्ये जेवण म्हणजे थ्री कोर्स मील असतं. , hors d'œuvre or entrée म्हणजे जेवणाची सुरुवात होय. ह्यात बऱ्याच वेळी सूप वाढले जाते . नंतर plat principal म्हणजेच मुख्य जेवण (मेन कोर्स) ,त्यानंतर fromage म्हणजेच चीज कोर्स आणि नंतर कधी कधी डेझर्ट. कधी कधी चीज आणि डेझर्ट च्या आधी सलाड्स सुद्धा वाढले जातात. Hors d'œuvres मध्ये वाढल्या जाणारे पदार्थ पुढील प्रमाणे असतात. फ्रेंच ओनियन सूप किंवा a croque monsieur, lobster bisque ,terrine de saumon au basilic, आणि foie gras. नंतर plat principal दरम्यान a pot au feu or steak frites हे आणि ह्या प्रकारचे पदार्थ वाढले जातात. आणि डेझर्ट मध्ये crème brûlée, a macaron, mille-feuille pastry , an éclair, चॉकलेट मूस आणि Café liégeois हे टेस्टी गोड पदार्थ असतात.
येथे प्रत्येक ठिकाणची स्वैपाक करण्याची वेगळी पद्धत आहे आणि त्या त्या ठिकाणचे वेगळे वैशिष्ट्य आहे. उत्तरेकडे पदार्थ करण्यासाठी बटर वापरतात तर दक्षिणेकडे ऑलिव्ह ऑइलचा वापर केला जातो. प्रत्येक भागात पारंपारिक वैशिष्ट्यपूर्ण पदार्थ आहेत. नैऋत्य भागात Cassoulet, Alsace मध्ये Chocroute, लॉरेन भागात Quiche , Bourgogne आणि Provencal Tapenade भागात Beef bourguignon असे पदार्थ लोकांच्या अतिशय आवडीचे आहेत. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे फ्रान्स हे वाईन्स साठी जगप्रसिद्ध आहे. शॅम्पेन , बॉरडॉक्स, Bourgogne आणि Beaujolais ह्या वाईन्स पसिद्ध आहेत आणि Camembert , Roquefort, Brie हे चीजचे प्रकार प्रसिद्ध आहेत. जवळजवळ ४०० प्रकारचे चीज इथे मिळतात. आज आपण chickpea ratatouille हि एक सोपी फ्रेंच रेसिपी कशी बनवतात हे बघूया. हि रेसिपी नक्की करून बघा. आपण भेटूच पुढील भागात फ्रेंच खाद्यसंस्कृतीच्या अधिक माहितीसह. तोवर खाते रहो और खिलाते रहो.
Chickpea ratatouille (सौजन्य- allrecipes.com)
साहित्य – ३ टेबलस्पून एक्स्ट्रा वर्जिन ऑलिव्ह ऑइल, २ झुकीनी बारीक तुकडे करून, ३ लसूण पाकळ्या बारीक चिरून, दीड कप भिजवलेले काबुली चणे, १ मोठा कांदा बारीक चिरून , पाव कप पार्स्ले बारीक चिरून, २ लाल सिमला मिरच्या बारीक चिरून, पाव कप बेसिल बारीक चिरून, ३ टमाटे चिरून, थाईमच्या ४ काड्या, १ जार टोमॅटो ऑलिव्ह पास्ता सॉस, चवीनुसार मीठ व काळीमिरी पावडर , २ उभ्या आकाराची वांगी तुकडे करून
कृती-
एका जाड बुडाच्या भांड्यात ऑलिव्ह ऑइल मध्यम आचेवर गरम करा. त्यात बारीक चिरलेला लसूण घालून सुगंध येईस्तोवर एक मिनिट परतून घ्या. आता मंद आचेवर कांद्याचे व सिमला मिरचीचे तुकडे त्यात घालून व्यवस्थित परतून घ्या. झाकण ठेवून शिजवून घ्या. मध्ये मध्ये नीट ढवळत राहा. साधारण पाच मिनिटांत कांदा गुलाबीसर रंगाचा होऊ लागेल. मिश्रणाला सुटलेले पाणी पूर्ण आटू द्या व कांदा ब्राऊन रंगावर परतून घ्या.
आता ह्यात चिरलेले टोमॅटोचे तुकडे घालून मिश्रण ढवळून घ्या व भांड्यावर झाकण ठेवून टोमॅटोला पाणी सुटेपर्यंत शिजवून घ्या. पाच मिनिटांत टोमॅटोला पाणी सुटेल.आता ह्यात टोमॅटो ऑलिव्ह पास्ता सॉस, वांग्याचे तुकडे, झुकीनीचे तुकडे, काबुली चणे, पार्स्ले, बेसिल आणि थाइम घाला . त्यात चवीनुसार मीठ व काळीमिरी पूड घालून मिश्रण नीट ढवळून घ्या.
आता भांड्यावर झाकण ठेवून मंद आचेवर सर्व भाज्या व काबुली चणे व्यवस्थित शिजवून घ्या. ह्यासाठी साधारण ४० मिनिटे लागतील. सर्व भाज्या व चणे शिजल्यावर झाकण काढून पाणी आटवून घ्या. पाच मिनिटांत मिश्रण घट्ट झाले कि तुमचे Chickpea ratatouille आस्वाद घेण्यासाठी तयार !
-वैदेही राजे- जोशी
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment