बाळ होणं ही संपूर्ण कुटुंबासाठीच एक आनंदाची
गोष्ट असते. पण जिला बाळ होतं तिच्यासाठी आई होणं ही कितीही आनंदाची गोष्ट असली
तरीही तो संपूर्ण अनुभव एखाद्या परीक्षेपेक्षा कमी नसतो. तो मॉर्निंग सिकनेस, पाठदुखी, कंबरदुखी
आणि तो बाळंतपणाचा अत्यंत कठीण अनुभव! उगाच म्हणत नाहीत की, "बाळन्तपण म्हणजे आईचा दुसरा जन्मच असतो"!
म्हणूनच सगळं सुरळीत होईपर्यंत कुटुंबातील सर्वांनाच टेंशन असतं! बाळंतपण एकदा सुरळीत पार पडलं की सगळीकडे बाळ जन्मल्याची गोड बातमी
मिठाईबरोबर सांगितली जाते. बरेच लोक मुलगी आहे की मुलगा हे कळल्यानंतर आईची तब्येत
कशी आहे हा प्रश्न न विचारता वेगळाच प्रश्न विचारतात ,"काय
मग? नॉर्मल झालं की सिझेरियन?" त्यात जर सुदैवाने नॉर्मल डिलिव्हरी झालेली
असेल तर सगळे अभिनंदन करतात पण चुकून जर सिझेरियन झाले असले तर मग लोक चक्क
डॉक्टरांच्या ज्ञानावरच शंका घेतात आणि सिझेरियन करणे कसे चूक आहे, आजकाल हा कसा बिझनेस झाला आहे , डॉक्टर कसे रिस्क घ्यायला तयार नसतात, पैसे उकळण्यासाठी सिझेरियन करतात वगैरे वगैरे
वर चर्चा होते.
पण लोकांनी हे समजून घेणे गरजेचे आहे की
सिझेरियन कि नॉर्मल डिलिव्हरी व्हावी ह्याचा निर्णय घेणे आईच्या हातात नसून
डॉक्टरांच्या हातात असते. जर डॉक्टर म्हणाले की इमर्जन्सी आहे व सिझेरियन करावे
लागेल तर आधीच वेदना सहन करत असलेली, टेन्शन
आलेली आई त्या अवस्थेत डॉक्टरांशी वाद घालू शकेलच असे नाही. पण लक्षात कोण घेतो? सिझेरियनने डिलिव्हरी झाली म्हटल्यावर लोक
डॉक्टरांबरोबरच आईलाही दोष देतात. असंच रागिणीबाबतीत सुद्धा झालं! ऐनवेळी काही
कॉम्प्लिकेशन्स आल्यामुळे रागिणीचे सी-सेक्शन करण्याचा निर्णय डॉक्टरांनी घेतला.
डिलिव्हरी सुखरूप झाली. बाळ आणि रागिणी दोघांचीही तब्येत व्यवस्थित होती आणि पाच ते
सहा दिवसांनी रागिणी व बाळ घरी आले. नेहमीप्रमाणे घरी भेटायला येणारी मंडळी सी
सेक्शन झाले म्हटल्यावर अरेरे म्हणत तिला नॉर्मल डिलिव्हरीचे फायदे सांगत होती.
त्यातील माहेरच्या मंडळींना तिने "आता डिलिव्हरी झाली आहे. त्यामुळे ह्या
सगळ्या चर्चेचा काही फायदा आहे का?" असे
गोड शब्दात सुनावून तो विषय तिथेच थांबवला. पण सासरच्या मंडळींशी बोलताना जपून
बोलावे लागत असल्याने ती त्यांच्याशी फार वाद
घालण्याच्या भानगडीतच पडत नव्हती. पण तेच तेच नॉर्मल डिलिव्हरीचे फायदे आणि सी
सेक्शनचे तोटेपुराण ऐकून तिचे कान किटले. एकदा अश्याच एक नातेवाईक काकू भेटायला
आल्या आणि "हल्ली काय बाई मुलींना कळा सहन करायला नकोत, आम्ही कश्या दोन दोन दिवस कळा सहन केल्या आणि
मग बाळाचा जन्म झाला. हल्ली डॉक्टर सुद्धा पैसेकाढू झालेत. नॉर्मल डिलिव्हरीची
वाटच बघत नाहीत, सिझेरियनने प्रसूती म्हणजे आयतेच काम
होते. बरंय बाई तुला कळा सहन कराव्या लागल्या नाहीत, आयतेच
बाळ हातात मिळाले" वगैरे वगैरे बोलत होत्या. हे सगळे ऐकून रागिणीच्या डोक्याचा प्रेशर कुकर झाला. कधीही
स्फोट होईल असे तिला वाटत होते पण तिने कण्ट्रोल केले. तिने शांतपणे काकूंचा
गैरसमज दूर करायचे ठरवले.
ती म्हणाली, "काकू!
तुम्ही माझ्या डिलिव्हरीच्या वेळेला यायला हवं होतं हो! तेव्हा बाळाचे हार्टबीट्स
कमी झाले म्हणून बाकी सगळे घाबरले होते आणि डॉक्टरांचं ऐकून सिझेरियन केलं!तेव्हा
तुम्ही आला असता तर डॉक्टरांना चांगलं ठणकावून सांगितलं असतं तर बरं झालं
असतं.म्हणजे माझी डिलिव्हरी नक्की नॉर्मल झाली असती."
"बाई गं !
डॉक्टरांशी कुणी वाद घालायचा? आणि काही कमी
जास्त झालं म्हणजे? सगळे मलाच
बोलायला मोकळे!" काकू लगेच सावरून घेत बोलल्या.
"Exactly.. डॉक्टरांना
आपल्यापेक्षा जास्त कळतं म्हणूनच त्यांचा निर्णय आपण ऐकायचा असतो. त्यांनी म्हटलं
सिझेरियन करावं लागेल तर माझ्या आणि बाळाचा जीव सुखरूप राहावा म्हणून केलं सी
सेक्शन! मला काय वाटतं डिलिव्हरी कशी झाली ह्यापेक्षा ती सुखरूप झाली आणि बाळ व मी
बरे आहोत हे जास्त महत्वाचं नाही का? उद्या
आपलीच मनमानी केल्याने काही बरं वाईट झालं तर कोण जबाबदार आहे? लोक तर डॉक्टरांचीच कॉलर धरून त्यांना मारहाण
करायलाही कमी करत नाहीत.आणि एवढं करून झालेलं नुकसान भरून निघतं का?", रागिणी म्हणाली. काकूंना किती आणि काय पटलं देव
जाणे आणि त्या रागिणीचा निरोप घेऊन निघाल्या. रागिणीच्या मनात मात्र विचारचक्र
सुरु झाले. बायकाच बायकांना समजून घेत नाही ही किती चुकीची गोष्ट आहे? सी सेक्शनद्वारे डिलिव्हरी होणे हा अपराध आहे
की काय असे लोक बोलत असतात.
सिझेरियन झाले की लोक आईला का दोष देतात? आणि दोष देणाऱ्या ह्या बायकाच असतात ही एक मोठी
दुर्दैवाची गोष्ट आहे. एका मैत्रिणीची जेव्हा सी सेक्शन द्वारे डिलिव्हरी झाली तेव्हा
दुसऱ्या मैत्रिणीने तिला "बरंय बाई तुझं! आयतीच डिलिव्हरी झाली. बाळंतपणाच्या
कळा सोसाव्या लागल्या नाहीत तुला.. लकी आहेस तू!" असे म्हणत आपले ज्ञान
पाजळले. पण त्या हुशार मैत्रिणीला ही कल्पना नव्हती की सी सेक्शनमध्ये पोट फाडून
"आयतेच" बाळाला बाहेर काढले असले तरी नंतर टाके असतात आणि ते प्रचंड
दुखतात. भूल द्यायला "एपिड्युरल" दिले जाते त्यामुळे बऱ्याच बायकांना
आयुष्यभर कंबरदुखी/पाठदुखी मागे लागते. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे जेव्हा काही
गुंतागुंत निर्माण होते तेव्हा आई व बाळाचा जीव सुरक्षित राहण्यासाठी सी सेक्शनचा
हा निर्णय घेण्यावाचून ना डॉक्टरांकडे पर्याय असतो ना त्या आईच्या कुटुंबीयांकडे! बोलणारे लोक हा विचार का करत
नाहीत?
दुसरी गोष्ट म्हणजे काही महान बायका जर बाळाला
आईचे दूध पुरत नसेल आणि चुकून जर का तिची सी सेक्शनद्वारे डिलिव्हरी झाली असेल तर ,"नाहीतरी हिने कुठे कळा सोसून बाळाला जन्माला
घातलंय!मग कसा पान्हा येणार हो हिला?" असा
जावईशोध लावून मोकळ्या होतात. कळा सोसल्या नाहीत म्हणून तिचे तिच्या बाळावरचे
प्रेम कमी असते किंवा ती टेक्निकली खरी आईच
नाही असा शोध लावणाऱ्या व्यक्तीचा सत्कारच केला पाहिजे. जिथे दुसऱ्याच्या
बाळाविषयी सुद्धा बायकांच्या मनात ममत्वाची भावना असते तिथे नऊ महिने ज्या बाळाला
पोटात वाढवलं त्या बाळाविषयी प्रेम केवळ कळा सोसल्या नाहीत म्हणून कमी होतं ह्या
लॉजिकला खरंच साष्टांग नमस्कार.. जरी तिने कळा सोसल्या नसतील, तरी बाळाला तर तिनेच नऊ महिने पोटात वाढवलेले
असते ना? आणि काही बायकांच्या बाबतीत तर कळा
सुद्धा येतात पण ऐनवेळी काहीतरी गुंतागुंत झाल्यामुळे सी -सेक्शन करावे लागते.
अनेक बायकांना वाटतं सी -सेक्शन म्हणजे शॉर्टकट
आहे. पण तसे नसते. सी -सेक्शन सोपे नाही. त्याचे आईच्या शरीरावर गंभीर परिणाम
होतात. आणि ते दूरगामी परिणाम असतात. पण त्याला काही इलाज नाही कारण त्यावेळी आईची
सुखरूप सुटका होणे आणि बाळाचा सुखरूप जन्म होणे हे सर्वात जास्त महत्वाचे असते.
आणि एकदा डिलिव्हरी झाल्यावर "काय करायला हवं होतं" हे बोलून काही उपयोग
नसतो. त्यामुळे सारखं सारखं सी -सेक्शन किती वाईट आहे हे सांगून त्या आईला मानसिक
त्रास देऊ नये. तिला आधीच शारीरिक त्रास झालेला असतो. हे सी-सेक्शन शेमिंग कुठेतरी
थांबायला हवं.
कारण नसताना
कुठली शहाणी बाई एखादं मेजर ऑपरेशन करायला तयार होईल? नॉर्मल
डिलिव्हरी पेक्षा सी सेक्शनमधून रिकव्हर व्हायला जास्त वेळ लागतो. त्यात
इन्फेक्शनची भीती असते. ब्लीडींग जास्त होतं, ऍनेस्थेशिया
मुळे काही रीऍक्शन होऊ शकते. ओटीपोटावर ज्या जागी जखम असते तिथे टाक्यांमध्ये
इन्फेक्शन होण्याची भीती असते. टाके प्रचंड दुखतात. आणि ती जागेवरची संवेदना
कायमस्वरूपासाठी कमी होते. सी सेक्शनमध्ये आपल्या शरीराच्या आतील अवयव म्हणजे आतडी
किंवा मूत्राशयाला जखम होण्याची शक्यता सुद्धा नाकारता येत नाही.
म्हणजेच सी-सेक्शन डिलिव्हरी सुद्धा लोकांना
वाटते तितकी सोपी नाही. नॉर्मल डिलिव्हरीच्या वेळेला बायकांना खूप त्रास सहन करावा
लागतो आणि सी सेक्शनच्या वेळी जरी भूल दिलेली असली तरी त्याचा त्रास नंतर सहन
करावा लागतो. म्हणजेच कुठल्याही प्रकारची डिलिव्हरी अजिबात सोपी वगैरे नसते. तो
खरोखर बायकांचा दुसरा जन्म असतो कारण दोन्ही प्रकारांत बायकांच्या शरीराची प्रचंड
झीज होते आणि त्यांना त्रास होतो. शेवटी सर्वात महत्वाचे काय, तर आईची सुटका सुखरूप होणे व बाळ सुखरूप जन्माला
येणे!
आई ती आईच असते मग बाळाच्या जन्माची पद्धत
कुठलीही असो. त्यामुळे केवळ तुमची सी-सेक्शन डिलिव्हरी झाली म्हणून तुम्हाला कुणी
आळशी म्हणत असेल, किंवा तुमच्या बाबतीत सगळं सोपं आहे
वगैरे म्हणत असेल किंवा तुमच्या आईपणावरच शंका घेत असेल तर त्या व्यक्तीशी वाद
घालण्याच्या भानगडीत अजिबात पडू नका आणि गिल्टी तर अजिबातच वाटून घेऊ नका. उलट असा
विचार करा की "Yes! I am a c-section mom and I am
proud of it. माझ्या व माझ्या बाळाच्या तब्येतीसाठी मी हे
केलं आणि मी व माझं बाळ सुखरूप असल्याचा मला आनंद आहे. "
एप्रिल महिना हा सी-सेक्शन अवेअरनेस मन्थ आहे, त्यानिमित्त सी-सेक्शनद्वारे प्रसूती झालेल्या
माझ्या सर्व मैत्रिणींना व सगळ्या मातांना हा लेख समर्पित!
No comments:
Post a Comment