Saturday, May 16, 2020

अपूर्ण नव्हे परिपूर्ण मी!


टीव्हीवर बातम्यांमध्ये आणि पेपरमध्ये बातमी आल्यापासून नारायणी आणि वीरेंद्रचे फोन अभिनंदनासाठी सतत खणखणत होते. लंडनला झालेल्या पॅरालिम्पिक स्पर्धेत स्विमिंगमध्ये गोल्ड मेडल मिळवणारा जय आज सगळ्यांच्या कौतुकाचा आणि अभिनंदनाचा विषय ठरला होता. त्याने परदेशात आपल्या देशाला गौरव मिळवून दिल्यामुळे वर्तमानपत्र, टीव्हीवरच्या बातम्या आणि सोशल मीडिया ह्या सगळीकडे त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत होता. नारायणी आणि वीरेंद्रचे अभिनंदन करताना लोक थकत नव्हते. इतके दिवस जयकडे विचित्रपणे बघणारे आणि त्याला होपलेस , मतिमंद ठरवून मोकळे झालेले नातेवाईक आणि मित्रमंडळी, सोशल मीडियावर जयशी कुठले ना कुठले नाते जोडू पाहत होते.  हे सगळे बघून नारायणीला एकीकडे जयला जन्म दिल्याबद्दल कृतकृत्य वाटत होते. पण सरड्याप्रमाणे रंग बदलणाऱ्या आणि वाहत्या गंगेत हात धुवू पाहणाऱ्या लोकांचा उबग येत होता. तिला तो दिवस आठवला जेव्हा जयचा जन्म झाला होता.

आई व बाबांचे सगळे छान छान फीचर्स घेतलेला जय जन्माला आला तेव्हाही लोकांनी असेच नारायणी ,वीरेंद्र व सर्व कुटुंबाचे अभिनंदन केले. गोड ,गोंडस रुपडं असलेले आपले बाळ बघून नारायणीला त्याला कुठे ठेवू आणि कुठे नको असे झाले होते. त्याच्यासाठी ती रोज एक नवे स्वप्न बघायची. वीरेंद्र आणि नारायणीने जयसाठी केवढे प्लॅनिंग केले होते! त्याला हे शिकवायचे, त्याला हा क्लास लावायचा!  त्याच्या भविष्यासाठी त्यांनी तो झाल्यापासूनच तरतूद करणे सुरु केले होते. त्याच्या शिक्षणासाठी काहीही कमी पडू नये, तो खूप मोठा व्हावा म्हणून त्यांनी सर्व प्रयत्न करायचे ठरवले होते. वीरेंद्र तर जय कधी मोठा होऊन "बाबा! बाबा!"करत त्याच्याशी क्रिकेट, फुटबॉल खेळण्याचा हट्ट करेलबाहेर फिरायला नेण्याचा हट्ट करेल. रोज नवी खेळणी ,खाऊ घेऊन मागेल ह्याचीच वाट बघत होता. नारायणी तर जय कधी मोठा होऊन बोलायला लागेल ह्यासाठी आतुर झाली होती. जयचे बोबडे बोल ऐकण्यासाठी ती आतुर होती. जय एक वर्षाचा झाला. पण तो काहीच बोलायला तयार नव्हता. आई बाबा त्याच्याशी खूप गप्पा मारायचा प्रयत्न करीत असत, त्याला विविध रंगेबेरंगी ,विविध आवाज करणारी खेळणी आणून दिली होती. पण तो फक्त गोल गोल फिरणाऱ्या भिंगरीकडे, पंख्याकडे, सायकलंच्या चाकाकडे बघतच रमत असे. त्याला इतर खेळण्यांमध्ये काही रसच नव्हता. कोणीही त्याच्याशी बोलले की तो लक्षच देत नसे.  बाहेर गर्दीत नेले तर अस्वस्थ होऊन रडून गोंधळ घालत असे.

नारायणीच्या बहिणीने जेव्हा पहिल्यांदा त्याला सॉफ्ट टॉय आणून दिले आणि गंमत म्हणून त्याच्या हातात दिले तर त्याने घाबरून ,रडून घर डोक्यावर घेतले होते. अनोळखी लोकांकडे तर तो बघायलाही तयार होत नसे. जय दीड वर्षांचा झाला तरी अजिबातच बोलत नव्हता म्हणून नारायणीने त्याची कानांची व श्रवणाची तपासणी करून घेतली. पण त्याला सगळे व्यवस्थित ऐकायला येत होते. पण मग नारायणी इतके प्रयत्न करूनही जय मात्र अजूनही बोलू शकत नव्हता. तसेच तो प्रचंड मूडी होता. त्यामुळे नारायणी व वीरेंद्र दोघेही खूप चिंतेत होते. अखेर दोघांनीही डॉक्टरांचा सल्ला घेण्याचे ठरवले. जयच्या बालरोगतज्ज्ञांनी जयची लक्षणे बघून त्यांना न्यूरॉलॉजिस्टकडे जाण्यास सांगितले. न्यूरॉलॉजिस्टकडे जाण्याची गरज आहे म्हटल्यावरच नारायणी आणि वीरेंद्र दोघांच्याही पोटात गोळा आला. पण कशीतरी हिम्मत ठेवून आणि जयच्या समस्येवर काहीतरी उपाय सापडेल म्हणून दोघे शहरातील ख्यातनाम चाईल्ड न्यूरॉलॉजिस्टकडे जयला घेऊन गेले. तेथे जयची तपासणी करून ,त्याची एकूण लक्षणे बघता जय हा स्वमग्न म्हणजेच ऑटिस्टिक स्पेक्ट्रममध्ये आहे हे कळल्यावर तर वीरेंद्र आणि नारायणीच्या पायाखालची जमीनच सरकली.

नारायणी तर हे मानायलाच तयार नव्हती, की तिचा गोंडस राजकुमार ऑटिस्टिक आहे. गरोदरपणात इतकी काळजी घेऊन, गर्भसंस्कार वगैरे सगळं करून सुद्धा जयच्या बाबतीत असे कसे झाले ह्याचे उत्तर कुणाकडेच नव्हते. 

ती हताश झाली. निराश झाली. चारचौघात गेले तर लोक आपल्या मुलाकडे विचित्र नजरेने बघतात, पाठीमागे काहीही बोलतात ह्यामुळे तिला आणखी दुःख वाटू लागले. अनेक नातेवाईकांनी तिला व वीरेंद्रला जय तर आता असाच राहणार, तुम्ही दुसरा चान्स घ्या. असाही सल्ला दिला. लोक त्याला मतिमंद समजून वाट्टेल ते सल्ले देऊ लागले. त्यामुळे जयला चारचौघात घेऊन जाणेच तिला नको वाटू लागले. समारंभ वगैरे असतील तर तिने व वीरेंद्रने तिथे न जाण्याचा निर्णय घेतला. कारण लोक तर "त्याच्यावर कुणीतरी करणी केली, बाहेरची बाधा आहे इथपासून तर बाबा बुवा, अंगारे -गंडे दोरे" इथपर्यंत अनाहूत सल्ले देऊ लागले. काही आगाऊ बायका तर "कुठल्या तरी जन्माची पापं भोगताहेत" असेही म्हणून मोकळ्या झाल्या. हे सगळे बघून ऐकून नारायणीला प्रचंड दुःख होत असे. सुरुवातीला तिला कुणी सल्ला द्यायला आले तर ती ,"ऑटिझम किंवा स्वमग्नता हा आजार नसून ती एक मानसिक अवस्था आहे. स्वमग्नता किंवा ऑटिझम ही एक जन्मस्थ अवस्था आहे,हा कुठलाही मानसिक आजार नव्हे.ऑस्टीटिक व्यक्ती आपल्याच विश्वात रममाण असतात. त्यांना संवेदनांचे अर्थ लावण्यात अडचण येते त्यामुळे त्या व्यक्तींना प्रतिक्रिया देताना त्रास होतो किंवा अडचणी येतात. स्वमग्न व्यक्तींना भाषा संप्रेषण आणि वैचारिक देवाणघेवाणीची समस्या असते. त्यामुळे त्यांचा प्रतिसाद देताना गोंधळ उडतो. म्हणूनच ही मुले भोवतालच्या जगाशी काहीही संपर्क नसल्यासारखे वागतात. आपले बोलणे त्यांच्या कानांवर पडून देखील ते नजरेला नजर देऊ शकत नाहीत. शाब्दिक प्रतिसाद देत नाहीत. त्यामुळे दुर्दैवाने त्यांच्यावर मतिमंदत्वाचा शिक्का बसतो. पण अनेक ऑटिस्टिक मुले हे मतिमंद नसतात" असे सांगून त्यांच्या शंका दूर करण्याचा प्रयत्न करत असे. पण बहुतांश लोकांना शंकानिरसन नको असते,फक्त चर्चेला विषय हवा असतो हे तिच्या लक्षात आल्यावर तिने असल्या लोकांशी वाद घालणेच बंद करून टाकले.

आता जय तीन वर्षांचा झाला होता तरीही त्याचा भाषेचा विकास झाला नव्हता. आपल्याच दुनियेत मग्न असलेल्या आपल्या निरागस निष्पाप बाळाकडे बघून नारायणी आणि वीरेंद्रचा जीव कासावीस होत असे. नारायणी तिला जमेल तसे जयला शिकवण्याचा प्रयत्न करीत असे. नेटवरून माहिती शोधून ती तिला जमेल तसे प्रयत्न करत असे. अशीच शोधाशोध करताना तिला स्वमग्न मुलांसाठी असलेल्या स्पेशल सेंटरविषयी माहिती मिळाली. दुसऱ्याच दिवशी वीरेंद्र व ती जयला घेऊन तिकडे गेले.  तिथे त्यांना समजावून सांगण्यात आले की स्वमग्न मुलांना नुसतेच स्पेशल शाळेत घालून उपयोग होत नाही तर प्रत्येक मुलाच्या  क्षमतेप्रमाणे संयुक्त उपचारपद्धती व शिक्षणपद्धतींचा अवलंब करून त्यावर काम करावे लागते. स्पेशल शिक्षण,ऑक्युपेशनल थेरपी, फिझियोथेरपी, स्पीच थेरपी, डान्स थेरपीड्रामा थेरपी, म्युझिक थेरपी अश्या विविध पद्धतींचा अवलंब करून मुलांना त्यांच्या क्षमतेनुसार शिकवले जाते. त्यांना व्होकेशनल शिक्षण देऊन स्वतःच्या पायावर उभे करण्याचा प्रयत्न केला जातो.

त्या सेंटरला गेल्यावर नारायणी व वीरेंद्रच्या मनात आशा निर्माण झाली आणि आपल्या बाळाचे भविष्य घडवण्याचा त्यांनी ध्यास घेतला. आता प्रश्न होता जयला नेमका कशात रस वाटतो हे शोधून काढणे! पण हे सोपे नव्हते. नारायणीने त्या सेंटरमधील इतर पालकांशी मैत्री केली. आपल्यासारखेच समदुःखी आईवडील किती पेशन्स ठेवून ,आपल्या बाळाला समजून घेऊन आपापल्या बाळाच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवू पाहत आहेत हे बघून तिनेही हार न मानता जयसाठी लढण्याचे ठरवले.

दिवस भराभरा जात होते आणि जय पाच वर्षांचा झाला. पण त्याला नेमका कशात रस आहे ,त्याला काय आवडते हे कुणालाही कळत नव्हते. अशातच रोजच्या रुटीनला कंटाळून थोडा ब्रेक म्हणून वीरेंद्रने चार दिवस कुठेतरी फिरायला जायचे ठरवले. निवांत,लांब एखाद्या रिसॉर्टला जाऊन आराम करायचे ठरवले, जिथे फार गर्दी नसेल आणि आणि जिथे लोकांच्या नजरा असणार नाहीत. म्हणून तो नारायणी व जयला घेऊन कोकणातल्या एका लहानश्या गावातल्या रिसॉर्टला गेला. तिथे गेल्यावर थोडं सेटल झाल्यावर वीरेंद्र रिलॅक्स व्हायला म्हणून स्विमिंग पूल मध्ये उतरला. नारायणी जयला घेऊन स्विमिंग पूलच्या काठावर बसलेली होती. जय एकटक स्विमिंग पूल कडे आणि त्यात पोहणाऱ्या त्याच्या बाबांकडे बघत होता आणि अचानक नारायणीच्या मांडीवरून उतरून तो स्विमिंग पूल कडे पळाला. वीरेंद्रने पटकन त्याला झेलले आणि उथळ पाण्यात ठेवले. तो एखाद्या सराईतासारखे पाण्यात हात पाय मारू लागला. वीरेंद्रने त्याला दोन्ही हातांवर धरून ठेवले आणि तो आत पाय मारून पोहण्याचा प्रयत्न करू लागला. त्याला पाण्यात खेळणे खूप आवडले. दोन तास झाले तरी तो पाण्यातून  बाहेर यायला तयारच नव्हता.अखेर कसेबसे वीरेंद्रने त्याला बाहेर आणले.  त्या रिसॉर्टला चार दिवस सकाळ संध्याकाळ जयचा मुक्काम स्विमिंग पूल मध्येच होता. आणि अशा रीतीने नारायणी व वीरेंद्रला जयची आवड  कळली. पण जयसारख्या स्पेशल मुलाला स्विमिंग शिकवायला कोण तयार होणार? त्यात सार्वजनिक स्विमिंग पूल वर गर्दी असणार, तिथे जयला नेले तर तो परत अस्वस्थ होणार ह्या सगळ्या अडचणी नारायणी आणि वीरेंद्रच्या पुढ्यात उभ्या होत्या. ह्यावर मार्ग म्हणून वीरेंद्रनेच सोसायटीच्या स्विमिंग पूल मध्ये सकाळी जयला स्विमिंग शिकवण्याचा निर्णय घेतला. सकाळी पूलवर फारशी गर्दी नसल्यामुळे  जयला सुद्धा काही प्रॉब्लेम नव्हता. उलट स्विमिंग त्याच्या अत्यंत आवडीची गोष्ट झाली होती. तो लवकरच चांगल्याप्रकारे पोहू लागला. एक दिवस सकाळी जय आणि वीरेंद्र स्विमिंगचा सर्व करत असताना तिथे प्रकाश सर आले. प्रकाश सर हे स्विमिंग कोच होते आणि योगायोगाने  वीरेंद्रच्याच सोसायटीत राहत होते. त्यांनी जयचे स्विमिंग बघितले आणि त्यांनी वीरेंद्रकडे    जयला स्विमिंग शिकवण्याची परवानगी मागितली. त्यांच्या मते जय हा बॉर्न स्वीमर आहे आणि योग्य कोचिंग मिळाल्यास स्विमिंगमध्ये त्याचे भविष्य उज्ज्वल आहे.

प्रकाश सर म्हणाले की ,"आपले मूल स्वमग्न आहे हे पालकांना स्वीकारणे कठीण जाते. पण ते स्वीकारून त्या मुलांचे आयुष्य शक्य तितके सुकर करण्यासाठी प्रयत्न हे पालकांनाच करावे लागतात. ह्या मुलांचे आयुष्य सुकर करण्यासाठी प्रचंड पेशन्स ठेवून त्यांना प्रेमाने समजून घेण्याची आवश्यकता असते. आपले मूल ऑटिस्टिक आहे म्हणजे सगळे संपले असे मानू नये.  कित्येक ऑटिस्टिक मुले उत्तम कलाकार असतात. त्यांच्या भावना ते विविध कलेतून व्यक्त करतात. मोठ-मोठी आकडेमोड काही सेकंदात करतात.काहींची स्मरणशक्ती अगदी चमत्कारिक असते. कित्येक जागतिक दर्जाचे यशस्वी खेळाडू सुद्धा ऑटिस्टिक स्पेक्ट्रममध्ये आहेत. कधी कधी ऑटिझम स्पेक्ट्रममध्ये असलेल्या मुलांना ADHD  म्हणजेच अटेन्शन डिफिसिट / हायपरऍक्टिव्हिटी डिसऑर्डर असू शकतात. ह्या दोन्हींची लक्षणे एकमेकांच्या जवळ जाणारी आहेत. बरेचसे खेळाडू हे ADHD वर मात करून आज यशस्वी झालेले आहेत.  ऑस्ट्रेलियन जलतरणपटू मायकल फेल्प्स, अमेरिकन बास्केटबॉल खेळाडू मायकल जॉर्डन, अमेरिकन खेळाडू ब्रूस जेनर, मॅजिक जॉन्सन,जॅकी स्टीवर्ट, टेरी ब्रॅडशॉ ब्रूस जेनर, जेसन कीड, चार्ली हसल (पीट रोझ) ,द रायन एक्सप्रेस म्हणजेच नॉलन रायन,स्कॉट एयर अश्या अनेक खेळाडूंमध्ये ADHD चे निदान झाले आहे.तरीही त्यांनी प्रचंड संघर्ष करीत आपल्या मानसिक अवस्थेवर मात करीत आपापल्या खेळात प्राविण्य मिळवून यश संपादन करत अनेकांना प्रेरणा दिली. ऑस्टीटिक मुलांच्या आईवडिलांनी असे खचून न जाता आपल्या अपत्याचा रस कशात आहे हे शोधून काढून आपल्या पाल्याला संधी आणि योग्य ते प्रशिक्षण मिळवून दिले तर ही मुले नक्कीच त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात खूप पुढे जाऊ शकतात. त्यांच्यात ती क्षमता नक्कीच असते. त्यामुळे तुम्ही जयला प्रोफेशनल कोचिंग देण्याची संधी मला दिलीत तर मला खूप आनंद होईल".

हे ऐकून नारायणीला आणि वीरेंद्रला तर खूप आनंद झाला. पण प्रश्न हा होता की जय तर अनोळखी व्यक्तींकडे बघत सुद्धा नसे,मग प्रकाश सर कसे त्याला शिकवणारत्यावरही प्रकाश सरांनी उपाय शोधून काढला. ते रोज सकाळी जयच्या स्विमिंगच्या वेळेला सोसायटीच्या स्विमिंग पूल वर येत असत. हळूहळू जयची त्यांच्याशी ओळख झाली. आणि आता प्रकाश सरांनी नारायणीला जयला त्यांच्या स्विमिंग पूलवर घेऊन येण्यास सांगितले. 

साशंक मनाने नारायणी जयला घेऊन प्रकाश सरांच्या स्विमिंग पूल वर घेऊन गेली खरी,पण तिथले अनोळखी लोक बघून ,खूप सारी मुले बघून जय घाबरला,गोंधळला. अस्वस्थ झाला. नारायणीने त्याला कसेबसे शांत केले. इकडे जयला बघून इतर मुलांना त्याच्यात काहीतरी विचित्र वाटले. अनेक पालकांनी व प्रकाश सरांच्या सहाय्यकांनी प्रकाश सरांना वेड्यात काढले.  जो मुलगा बोलण्याला प्रतिसादच देऊ शकत नाही, त्याला प्रोफेशनल स्विमिंगचे कोचिंग देणे म्हणजे वेळेचा अपव्यय आहे असे अनेकांचे मत होते. पण काही जागरूक पालकांनी मात्र ह्या गोष्टीला पाठिंबा दिला आणि जयविषयी कौतुक व्यक्त केले. प्रकाश सरांनी सुद्धा जयविषयी त्यांच्या बॅच मधील मुलांना जयविषयी समजावून सांगितले. लहान मुले जात्याच प्रेमळ असतात, त्यामुळे त्यांनीही आपल्या ह्या नव्या "खास" मित्राला मदत करण्याचे ठरवले. नारायणी रोज जयला पूलवर घेऊन यायची. हळूहळू जयची त्या जागेशी ओळख झाली आणि त्याचे प्रकाश सरांकडे कोचिंग सुरु झाले. दरम्यान इकडे त्याची थेरपी सुद्धा सुरुच होती.

हळूहळू जय प्रगती करू लागला. आणि प्रकाश सरांनी त्याला विविध स्पर्धांमध्ये उतरवण्यास सुरुवात केली. लहान लहान स्पर्धांपासून सुरुवात करत जयने जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय ,राष्ट्रीय स्पर्धांमध्ये आपली चमक दाखवली आणि त्याची पॅरालिम्पिक स्पर्धेसाठी निवड झाली. त्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सुद्धा त्याने घवघवीत यश मिळवून प्रकाश सरांचा विश्वास सार्थ करून दाखवला. नारायणी आणि वीरेंद्रला तर आकाशच ठेंगणे झाले होते. पण सगळ्या प्रसिद्धी आणि गोंगाटापासून लांब असलेला जय मात्र शांतपणे आपला स्विमिंगचा सराव करण्यात मग्न होता.

ऑटिस्टिक मुलांच्या सेंटरवरील जयचे मित्र सुद्धा एव्हाना आपली चमक दाखवू लागले होते. जयच्याच बरोबर असलेला पार्थ एक उत्तम चित्रकार झाला होता. रंगांमधून तो आपल्या भावना व्यक्त होता, तर ह्या दोघांची मैत्रीण असलेली सिया , मोती व मण्यांशी खेळत उत्तम ज्वेलरी डिझायनर झाली होती.  आईच्या मदतीने ती आर्टिफिशियल ज्वेलरीचा बिझनेस करत होती. तिच्या ज्वेलरीला परदेशातून सुद्धा मागणी येत होती.

ही लेकरं कुठेही अपूर्ण नाहीत, तर परिपूर्ण आहेत. देवाने जरी ह्या लेकरांना भावना बोलून दाखवण्याची शक्ती दिली नसली तरी ही मुलं कुठेही कमी नाहीत. त्यांना योग्य ती संधी मिळाल्यास,त्यांना समजून घेऊन हळुवारपणे त्यांना शिक्षण दिल्यास ही मुले खरोखर काहीतरी ग्रेट करून दाखवतात हे जयने आज दाखवून दिले होते. जयचे हे यश बघून एरवी त्याला नावे ठेवणारी, टोमणे मारणारी , त्याला नको ती लेबलं लावणारी माणसे आज लगेच रंग बदलून त्याचे अभिनंदन करीत होती. पण लोक असेच असतात हे एव्हाना चांगलेच कळून चुकलेल्या नारायणीने ह्या सर्व लोकांना मोठ्या मनाने माफ करून टाकले होते.

नारायणी व वीरेंद्रसारखे अनेक पालक आपल्या खास मुलांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडावेत म्हणून सतत झटत आहेत. जय सारखी मानसिक अवस्था असणारे हे स्वमग्न सैनिक रोज असंख्य अडचणींना तोंड देत नव्याने काहीतरी शिकण्याचा ,काहीतरी करण्याचा प्रयत्न करीत आहेत. आयुष्यातल्या अडचणींशी लढत आहेत. त्यांना शक्य तितका प्रतिसाद देत आईवडिलांची आशा जागृत ठेवत आहेत. पण समाज म्हणून आपलीही काही जबाबदारी आहे.  अश्या स्पेशल मुलांना आपण कमी न लेखता त्यांच्यातल्या कलागुणांना वाव दिला पाहिजे, त्यांना समजून घेऊन त्यांना सुरक्षित वाटेल असे वातावरण दिले पाहिजे. त्यांची हेटाळणी न करता ,त्यांची खिल्ली न उडवता त्यांच्या सर्वांगीण वाढीसाठी पोषक वातावरण निर्माण केले पाहिजे. आणि हे करण्यासाठी समाजात ऑटिझम आणि त्या अवस्थेशी निगडित समस्यांबद्दल जनजागृती होणे आवश्यक आहे. ह्या सर्व फायटर्सना व त्यांच्या धीरोदात्त व प्रेमळ आईवडिलांना माझा सलाम!

तुम्हाला जयची कथा कशी वाटली हे नक्की कमेंट्समधून सांगा! 

No comments:

Post a Comment