Saturday, May 16, 2020

दोष हा कुणाचा?


"निनाद, अरे ऐकलंस का माझं? अरे पुढच्या आठवड्यात तरी वेळ काढ. वासंती काकूंनी खूप चांगलं स्थळ आणलंय.मुलगी हुशार आहे,कुटुंब चांगलं आहे. अरे एकदा मुलीला भेट तरी!" मंगला काकू म्हणजे निनादची आई निनादला विनवून सांगत होत्या.

"आई, काय परत तेच तेच? मला लग्न करायचं नाही,किती वेळा सांगू तुला?मला नाहीये लग्नाबिग्नात इंटरेस्ट! माझं सुखासुखी चाललेलं आयुष्य बघवत नाही का तुला? पुन्हा पुन्हा त्याच विषयावर किती वेळा चर्चा करायची?प्लिज माझा आणि तुझा आणि त्या मुलीचा कुणाचाही वेळ वाया घालवू नकोस. मी लग्न करणार नाही."निनादने नेहमीप्रमाणे वैतागून उत्तर दिले.

"अरे पण का? तुझं करियर तू लग्नानंतर सुद्धा करू शकतोच की!तुला कोण अडवणार आहे?तुला परदेशात जायचं तर जा ना! मी नाही अडवत तुला. लग्नानन्तर तिलाही घेऊन जा. अरे ३५ वर्षांचा झालास तू! हल्ली चांगल्या मुलांना मुली मिळत नाहीयेत. काही वर्षात तुलाही स्थळं येणार नाहीत.नंतर तुला वाटलं तरी मुलगी मिळणार नाही. मग काय एकट्याने आयुष्य काढणार आहेस का? एकदाचं लग्न कर आणि मला ह्या चिंतेतून मुक्त कर बाबा!"

"आई, प्लिज, कटकट करू नकोस. मला ऑफिसला जायचंय. उशीर होतोय. अमित माझी वाट बघत खाली उभा आहे, चार फोन आले त्याचे! परत ट्रॅफिक लागलं तर ऑफिसला उशीर होईल. प्लिज हा विषय आता बंद!"

"निनाद तू लग्नाला उभा राहिला नाहीस तर आम्ही दोघेही घरातून कायमचे निघून जाऊ. मग पुढे आम्ही काय करू मला बोलायला लावू नकोस. आजच्या दिवसात विचार करून मला शेवटचं काय ते सांग!नाहीतर उद्या आम्ही दोघेही तुला ह्या घरात दिसणार नाही, मग आमच्या पश्चात तुला आयुष्यभर काय गोंधळ घालायचा तो घाल.हे मी तुला शेवटचं सांगतेय!" आज मंगलाकाकूंनी निनादला निर्वाणीचा इशारा दिला.

हे ऐकून  निनादने आपली लॅपटॉप सॅक घेतली आणि चिडून धाडकन दार लावून तो निघून गेला. मंगलाकाकू चिंतातुर होऊन सोफ्यावर बसल्या. "कसं  होणार ह्या मुलाचं?आपण काय ह्याला जन्माला पुरणार आहोत का? काय करियर करियर करतोय? लग्नानंतर करियर होत नाही का?देवा कृपा कर माझ्यावर आणि ह्या मुलाला लग्नाला उभे राहण्याची बुद्धी दे रे बाबा! ही शेवटची इच्छा पूर्ण कर रे देवा माझी... मी पुन्हा तुझ्याकडे काहीही मागणार नाही."असं मंगलाकाकू स्वतःशीच बोलल्या.

इकडे पार्किंग मध्ये अमित गाडी घेऊन उभा होता. आणि घड्याळ बघत निनाद पळत पळत आला आणि दार उघडून गाडीत बसला."काय रे?, किती उशीर केलास? केव्हापासून तुला कॉल करतोय. साल्या तुझ्यामुळे लेटमार्क लागणार मलासुद्धा आज!" अमित वैतागून म्हणाला. "अरे यार,काय सांगू तुला? ही आई आज परत एक स्थळ घेऊन माझ्या मागे लागली आहे. तिची कटकट ऐकत बसलो म्हणून उशीर झाला. कितीवेळा तिला सांगितलं पण ऐकतंच नाही.. ते बाबा सुद्धा सतत लग्न कर म्हणून मागे लागलेले असतात.कसं  सांगू त्यांना म्हणजे परत हा विषयच काढणार नाहीत!" निनादने अमितला सांगितले.

'त्यांचंही चूक नाही निनाद. तुझं लग्नाचं वय उलटून चाललंय. केव्हा ना केव्हा ही वेळ येणारच होती. त्यात तू त्यांना पटेल असं कारण सांगत नाहीस. मग हेच होणार होतं."अमितने रस्त्यावर लक्ष ठेवत शांतपणे प्रतिक्रिया दिली. "तुझं बरंय राव! तुझ्यावर ही वेळ आणणारी माणसंच गेली बिचारी. पण मी काय करू आता?" निनादने परत वैतागून विचारलं.

"काय करणार? भेट त्या मुलीला. कर लग्न!आणि पुढचं पुढे काय होतंय ते बघ!"अमित शांतपणे म्हणाला.

"काय?वेड लागलंय का तुला?काहीही काय बोलतोस?"निनादने आश्चर्याने अमितला विचारले.

"ऐक माझं!तू भेट त्या मुलीला. हवं तर मी तुझ्या बरोबर येतो. तू लग्न कर, तुझे सगळे इश्युज सॉल्व्ह होतील आणि सगळ्यांची तोंडं सुद्धा कायमची बंद होतील. विचार कर." अमित म्हणाला.

अमितच्या बोलण्याचा निनादने दिवसभर विचार केला. आणि त्याला अमितचं बोलणं पटलं. संध्याकाळी घरी आल्यावर त्याने आईला सांगून टाकले. मी लग्नाला तयार आहे.वासंती काकूंना कळवून टाक आणि त्या मुलीला कधी भेटता येईल हे विचारून सगळं ठरवून घे. मी पुढच्या आठवड्यात तिला भेटायला तयार आहे." निनादचे हे बोलणे ऐकून मंगलाकाकूंचा आनंद गगनात मावेनासा झाला. त्यांनी मनोहररावांना हे सांगितले आणि त्यांनी सुद्धा ह्या सगळ्याला होकार देऊन सगळं ठरवून टाकायला सांगितले. मंगलाकाकूंनी लगेच वासंतीकाकूंना फोन केला आणि मुलीच्या घरी कळवायला सांगितले की मुलगा भेटण्यास तयार आहे. वासंतीकाकूंनी प्रज्ञाच्या घरी फोन करून हे कळवले.

प्रज्ञा ही उच्चशिक्षित,सुस्वभावी, चांगल्या घरातील मुलगी होती. स्वतःच्या पायावर उभी होती. एका मोठ्या फार्मा कंपनीत रिसर्च हेड म्हणून कार्यरत होती. फक्त तिच्या सावळ्या रंगामुळे आणि कमी उंचीमुळे तिला सगळीकडून नकार मिळत होते आणि जगाच्या दृष्टीने तिचे लग्नाचे वय उलटून गेले होते. आपल्या देशात "गोऱ्या" रंगाचे जरा जास्तच ऑब्सेशन असल्याने प्रज्ञासारख्या नाकी डोळी नीटस असलेल्या मुलीला देखील "जगाच्या दृष्टीने सुंदर" नसल्याने नकार मिळतात. तसेच प्रज्ञाच्या बाबतीत सुद्धा झाले होते. पण प्रज्ञाने कधी हे मनाला लावून घेतले नाही. तिने तिचे संपूर्ण लक्ष तिच्या अभ्यास आणि रिसर्चवर केंद्रित केले आणि स्वतःचे स्थान निर्माण केले होते. तिने तर लग्नाची आशाच सोडून दिली होती. पण आईवडिलांच्या वेड्या आशेसाठी  ती ते म्हणतील त्या मुलांना भेटत होती. आईवडिलांचेही म्हणणे चूक नव्हते. आपल्यानंतर आपली सुस्वभावी पोर जगात एकटी पडेल ह्याचीच चिंता त्यांना होती आणि म्हणूनच एका चांगल्या घरात चांगल्या मुलाशी  तिचे लग्न व्हावे इतकीच त्यांची इच्छा होती. वासंतीकाकूंनी हे निनादचे स्थळ आणल्यापासून प्रज्ञाच्या आईवडिलांना एक आशा होती की आपल्या मुलीला तिचा सोबती नक्की मिळेल. वासंतीकाकूंनी प्रज्ञाच्या आईला, शारदाकाकूंना हे कळवले आणि पुढच्या आठवड्यात मंगळवारी निनाद व प्रज्ञा भेटतील हे नक्की झाले.

ठरल्याप्रमाणे प्रज्ञा संध्याकाळी सहा वाजता कॅफे मध्ये पोहोचली. पण तिथे तिला निनाद दिसला नाही. त्याचा फोटो बघितल्यामुळे ती त्याला ओळखु शकत होती. एक कोपऱ्यातलं  रिकामं टेबल बघून ती वाट बघत बसली. पंधरा मिनिटांनी एक तरुण ऑफिसची बॅग सांभाळत आला आणि त्याने विचारलं "एक्सक्यूज मी! मिस प्रज्ञा?" प्रज्ञाने स्माईल करून ओळख दिली.

 "हो ! मीच प्रज्ञा!"

"हाय! मी निनाद.. आपलं आज भेटायचं ठरलं होतं! सॉरी ट्रॅफिकमुळे मला जरा उशीर झाला."

"हरकत नाही!तुम्ही बसा ना!"

निनाद बसला आणि तेवढ्यात अमित सुद्धा गाडी पार्क करून आला. "सॉरी, मी माझ्या मित्राला सुद्धा बरोबर आणलंय . काही प्रॉब्लेम नाही ना?"निनादने विचारले.

प्रज्ञाने मनात विचार केला, "आता प्रॉब्लेम असला तरी तो मी सांगणार आहे का?असो. आलिया भोगासी..नाहीतरी हा नकारच देणार आहे, त्यामुळे काय फरक पडतो.." उघडपणे ती म्हणाली,"नाही काहीच हरकत नाही. हॅलो मिस्टर अमित."

अमितने हसून उत्तर दिले, "हाय! मला अहो जाहो करण्याची गरज नाही मिस प्रज्ञा.आणि सॉरी मी कबाबमे  हड्डी म्हणून आलोय. पण निनाद आणि मी ,we  are  best  friends since  college . So ,we  are  almost inseparable.लग्नानंतर सुद्धा तुम्हाला माझी कंपनी बऱ्याच वेळा सहन करावी लागेल बरं का?"

प्रज्ञाने उत्तर दिले ,"you  are  most  welcome . I know what is the place of a best friend in our  lives ."

निनाद म्हणाला,"अरे काही मागवूया का आपण? मला तर फारच भूक लागलीये. मी आणि अमित सॅन्डविच आणि चहा घेऊ. तुम्ही काय घेणार मिस प्रज्ञा?"

त्यावर प्रज्ञाने उत्तर दिले ,"प्लिज कॉल मी प्रज्ञा. आणि प्लिज खरंच तू ही मला अहो जाहो करू नकोस. मला कंफर्टेबल नाही वाटत."

त्यावर निनाद हसून म्हणाला ,"ओके प्रज्ञा, काय घेणार तू?"

"मला एक फक्त एक Latte मागव" प्रज्ञाने सांगितले. प्रज्ञा आणि निनाद एकमेकांशी अगदी कंफर्टेबली बोलत होते. एकमेकांच्या अपेक्षा, आवडीनिवडी विचारून झाल्या. फ्युचर प्लॅन्स डिस्कस झाले आणि दोन तासांनी निनाद व अमितचा निरोप घेऊन प्रज्ञा घरी निघाली. वाटेत तिने विचार केला. मुलगा तर चांगला वाटला. पण मित्राला का घेऊन आला? ठीक आहे. बघूया. नुसतं मला आवडून काय उपयोग आहे म्हणा, त्यालाही मी आवडायला हवी ना?"

तासाभराने प्रज्ञा घरी पोहोचली. आणि आल्या आल्या आईने तिचे अभिनंदन केले. "अगं निनादच्या घरून फोन आला होता.. त्यांना तू पसंत आहेस. तुझा काय विचार आहे? बघ.. तुझ्यावर काहीही जबरदस्ती नाही. तुला आवडत नसेल तर आपण नकार कळवू शकतो बाळा!" बाबा म्हणाले. त्यावर आई सुद्धा म्हणाली.  "हे बघ बाळा, तू आमचा विचार करून निर्णय घेऊ नकोस. शेवटी तुझं आयुष्य आहे आणि तुला सगळं पसंत असणं महत्वाचं आहे. हवं तर दोन दिवस विचार कर आणि मग तुझा निर्णय सांग!"

प्रज्ञा तिच्या खोलीत गेली आणि तिच्या डोक्यात विचारचक्र सुरु झाले.  निनाद तर तिला आवडला होता. पण तिला अमितचे येणे थोडे खटकले होते. तीने दोन दिवस विचार केला आणि शेवटी होकार कळवला. दोन्ही आई बाबांनी लगेच भेटून लग्नाच्या तारखा बघणे सुरु केले. दोनच महिन्यानंतरचा मुहूर्त होता. दोन महिन्यात तयारी म्हणजे प्रज्ञाच्या आई वडिलांना टेन्शनच आले होते. पण निनादच्या घरच्यांनी त्यांना सांगितले, "आपण लग्न अगदी साधेपणाने करूया. तुम्ही कसलेही टेन्शन घेऊ नका."

साधेपणाने लग्न म्हटले तरी तयारी आलीच. ह्या दोन महिन्यात खरेदी आणि इतर कामांच्या बहाण्याने दोन तीन वेळेला निनाद आणि प्रज्ञाची भेट झाली. नियमित फोन वर बोलणे सुद्धा होत होते. त्यांच्यात प्रेम नाही पण चांगली मैत्री नक्कीच झाली. अगदी साधेपणाने पण सगळे विधी करून लग्न छान पार पडले आणि प्रज्ञा  निनादच्या घरी आली. गोंधळ ,पूजा सगळे यथासांग पार पडले. आणि त्यानंतर पहिल्यांदाच रात्री निनाद आणि प्रज्ञा "नवरा-बायको" म्हणून एकाच खोलीत होते.

प्रज्ञाचे टेन्शन बघता निनाद तिला म्हणाला ,"हे बघ! आपली ओळख होऊन जेमतेम अडीच महिने झालेत. अजून आपण एकमेकांना नीट ओळखत सुद्धा नाही. त्यामुळे जी तुझ्या मनाची अवस्था आहे तोच गोंधळ माझ्याही मनात आहे. आत्ता कुठे आपण एकमेकांचे मित्र झालोत. प्रेमाची पायरी चढल्याशिवाय आपल्यात काही होणं मला शक्य वाटत नाही. आणि तुलाही तेवढा वेळ देणे मला योग्य वाटते. त्यामुळे आपण कुठलीही घाई करायला नको."

निनादचे हे बोलणे ऐकून  प्रज्ञाला आश्चर्य वाटले पण एक दिलासाही मिळाला.

"थँक्स निनाद! मला अगदी माझ्या मित्राशी बोलल्याप्रमाणे हलकं वाटलं. मला ऍडजस्ट व्हायला थोडा वेळ लागेल. पण तोच विचार तुझाही आहे हे ऐकून मला फार बरं वाटलं.मलाही वाटते लग्न फार घाईघाईत झाले. आपल्याला एकमेकांची नीट ओळख करून घ्यायला वेळ देखील मिळाला नाही. आपण आपल्या नात्याला थोडा वेळ द्यावा असे मलाही वाटतेय. थँक्स फॉर अंडरस्टॅण्डिंग! चला मी आता निश्चिन्त मनाने झोपू शकते.फार दमणूक झाली ह्या सगळ्या लग्नाच्या धामधुमीत! पण प्रश्न हा आहे की मी झोपू कुठे? मला एखादी गादी देतोस का?मी खाली आरामात झोपेन!"प्रज्ञाने तिचे मन मोकळे केले. 

"अरे? तू कशाला खाली झोपतेस? अगं म्हणजे मी झोपतो खाली. तू आरामात बेडवर झोप. मला काही प्रॉब्लेम नाही.झोप आता.गुड नाईट!" निनाद म्हणाला.

दुसऱ्या दिवशी सकाळी निनादच्या आई बाबांनी निनाद आणि प्रज्ञाकडे हनिमूनचा विषय काढला. ते त्यांना हनिमून पॅकेज गिफ्ट देण्याचा विचार करत होते. पण निनादने आत्ताच इतक्या सुट्ट्या झाल्या. आता फिरायला जायला वेळ नाही. खूप वर्कलोड आहे. त्यामुळे नंतर तीन चार महिन्यांनी जाऊ असे म्हणत हा विषय तिथेच टाळला. आता त्यांचं त्यांना काय ते ठरवू देत म्हणत आईबाबांनीही विषय जास्त ताणला नाही. पण प्रज्ञाला मात्र आश्चर्य वाटले. "गेलो असतो फिरायला तर जरा एकमेकांना वेळ देता आला असता. तेवढंच एकमेकांना समजून घेता आलं असतं.पण ठीक आहे. निनादला खरंच वेळ नसेल म्हणून त्याने नाही म्हटले असेल" असा विचार करून प्रज्ञा गप्प बसली. नंतर खोलीत आल्यावर ती निनादला म्हणाली, "मला फिरायला जायला प्रॉब्लेम नाहीये. उगाच माझ्यामुळे कॅन्सल करत असशील तर करू नकोस. आपण जाऊ शकतो." "अगं मला खरंच आत्ता  सुट्टी घेणे शक्य होणार नाही. मी खरंच सांगतोय खूप वर्कलोड आहे सध्या! तुला वाटत असेल मी कारणं  देतोय तर तसं  नाही.हवं तर ऑफिसमध्ये येऊन बघ!" निनादने स्पष्टीकरण दिले.  "अरे नाही ठीक आहे, मी काही इन्सिस्ट करत नाहीये. मी आपलं क्लिअर केलं. ठीक आहे ना, नंतर जाऊ आपण.जेव्हा आपलं नातं घट्ट होईल तेव्हा गेलो तर एकमेकांची कंपनी जास्त चांगली एन्जॉय करू शकू!" प्रज्ञाने त्याला धीर देत म्हटले. हे ऐकून निनाद रिलॅक्स झाला.

नंतर दोन दिवसांनी दोघांचीही सुट्टी संपली. सकाळी दोघेही ऑफिसला जायला निघाले तेव्हा प्रज्ञा म्हणाली,"निनाद प्लिज मला आज स्टेशनपर्यंत सोडू शकशील का?मी माझी गाडी आईकडून आज संध्याकाळी घेऊन येईन. आय नो तुला उलटं पडेल पण प्लिज आजच्या दिवस..."

"अरे बस क्या!बायको आहेस तू माझी! तुला मी ऑफिसपर्यंत सुद्धा सोडेन.त्यात काय प्लिज वगैरे?चल पटकन, अमित आलाय खाली." निनादने तिला घाई केली. दोघेही पार्किंगमध्ये आले तेव्हा प्रज्ञाला पाहून अमितच्या कपाळावर पडलेली आठी प्रज्ञाच्या चाणाक्ष नजरेतून सुटली नाही. तो काही बोलणार इतक्यात निनाद म्हणाला ,"अरे आजच्या दिवस माझ्या बायकोला जरा स्टेशनला सोडायचंय! वैतागू नकोस,आज तसंही आपण लवकर निघालोय." "माझ्या बायकोला" ह्या शब्दावर निनादने जोर दिलेला प्रज्ञाच्याही लक्षात आले आणि अमितच्याही! "ठीक आहे. सोडू तुझ्या 'बायकोला'! बस प्रज्ञा..." असे म्हणत अमितने मागचे दार उघडले. त्यानेही "बायको"शब्दावर जोर दिल्याचे प्रज्ञाच्या लक्षात आले. पण काहीही प्रतिक्रिया न देता ती गाडीत बसली आणि स्टेशन आल्यावर दोघांनाही बाय करून उतरली.

संध्याकाळी ती घरी आली पण निनाद मात्र आला नव्हता. तिने त्याला फोन केला तर त्याने सांगितले ,"खूप काम आहे गं! आज उशीर होईल. मी ऑफिसमध्येच खाऊन घेईन. तू आणि आई बाबा जेवून घ्या आणि तू झोप. माझी वाट बघत बसू नकोस." आता काम आहे हे त्याने आधीही सांगितले होते त्यामुळे प्रज्ञा काहीच बोलू शकली नाही. रात्री निनाद उशिरा केव्हातरी आला. दिवसभराच्या थकव्याने प्रज्ञाला गाढ झोप लागली होती. पण निनाद आल्याचे तिला कळले. ती उठली. "जेवणार आहेस का? मी हवं तर वाढून देते." तिने सांगितले. "अगं  नको!ऑफिसमध्येच खाणं  झालंय माझं! खूप थकलोय. उद्या सकाळी बोलू. तू ही दमली असशील झोप तू सुद्धा!" असे म्हणून निनाद झोपला.

थोड्याफार फरकाने असेच रुटीन अनेक दिवस सुरु राहिले. निनाद त्याच्या कामात बिझी असायचा. तीन चार वेळा तो कामाच्या निमित्ताने तीन चार दिवस टूरला सुद्धा जाऊन आला. कधी लवकर आला की तो  प्रज्ञाशी गप्पा मारायचा. दोघे फिरायलाही जायचे. पण त्यांचे नाते मैत्रीपलीकडे गेलेच नाही. अर्थात प्रज्ञाला निनाद आवडू लागला होता. तिला वाटत होते की त्यानेही आता पुढाकार घ्यावा. पण निनाद तिच्याशी एखाद्या मित्रासारखाच वागायचा. मैत्रीत जी बंधने असतात ती ठेवूनच तो तिच्याशी वागायचा. अर्थात तो अलिप्त राहायचा नाही त्यामुळे प्रज्ञाच्या मनात आशा होती की आज ना उद्या त्यांचे नाते पुढे जाईल. पण ती वेळ येतच नव्हती. अखेर प्रज्ञानेच पुढाकार घ्यायचे ठरवले. शनिवारी रात्री निनाद ऑफिसमधून लवकर आला. जेवणानंतर दोघे सहज पायी शतपावली सुद्धा करून आले. नंतर खोलीत आल्यावर प्रज्ञाने हिंमत करून निनादचा हात हातात घेऊन त्याला तिच्या मनातले सांगितले. तिच्या भावना व्यक्त केल्या. आणि आता ती त्यांचे नाते पुढे न्यायला उत्सुक आहे हे ही तिने सांगितले. हे ऐकून निनाद चपापला. पण त्याने सावरून घेत प्रज्ञाला म्हटले ,"मी समजू शकतो प्रज्ञा! पण प्लिज मला समजून घे. मला अजून वेळ दे. मी ह्या सगळ्यासाठी मानसिकरीत्या तयार नाही.प्लिज चिडू नकोस. तू मला आवडत नाहीस असे नाही."

"मी तुला आवडत नाही असे नाही म्हणजे? मी तुला "बायको" म्हणून आवडत नाही का निनाद?"प्रज्ञाने डोळ्यातले पाणी अडवत संयतपणे विचारले.

"हे बघ प्रज्ञा.. प्लिज तू मनाला लावून घेऊ नकोस. मला तुझ्याशी काहीही प्रॉब्लेम नाहीये. तू खूप चांगली मुलगी आहेस. मला तू मैत्रीण म्हणून खूप आवडतेस.पण...."

"पुढे बोल निनाद.."

"पण मी अजून स्वतःला तयार करू शकलो नाहीये. हे नाते पुढे न्यायला मी तयार आहे असे मला वाटत नाही.प्लिज प्रज्ञा.. मला समजून घे.. प्लिज मला थोडा वेळ दे. मी तुला नाकारत नाहीये ,पण माझी मानसिक तयारी नाहीये हे समजून घे." निनादने तिला विनंती केली.

"ठीक आहे निनाद.. जशी तुझी इच्छा! फक्त इतकं लक्षात ठेव. तू मला आवडतोस आणि माझा तुझ्यावर विश्वास आहे. मला निराश करू नकोस. मी तुझी वाट बघेन पण प्लिज माझ्या पेशन्सचा अंत बघू नकोस." इतके म्हणून प्रज्ञा बाथरूममध्ये निघून गेली. चेहऱ्यावर पाणी मारून बाहेर आली आणि काहीही न बोलता झोपली. झोपली म्हणण्यापेक्षा आडवी पडली. पण तिला झोप मात्र आली नाही. इकडे निनाद सुद्धा जागाच होता. त्याला फार टेन्शन आले होते. ह्यातून कसा मार्ग काढायचा हे त्याला कळत नव्हते. विचार करून करून अखेर तो दमला आणि सकाळी अमितशी बोलून काहीतरी मार्ग शोधावा लागेल असा विचार करत केव्हातरी त्याला झोप लागली.

नेहमीप्रमाणे निनाद सकाळी ऑफिसला निघून गेला आणि इकडे सासूबाईंनी प्रज्ञावर बॉंब टाकला. "प्रज्ञा, तुमच्या लग्नाला सहा महिने झालेत आता. तुमची वयं सुद्धा जास्त आहेत. बघ वाईट वाटून घेऊ नकोस पण तुम्हाला चान्स घ्यायचा असेल तर लवकर घ्या. उशिरा राहिलेल्या प्रेग्नन्सीमध्ये काही कॉम्प्लिकेशन्स होऊ शकतात. म्हणून म्हणतेय, जास्त उशीर करू नका. आता मनावर घ्या." प्रज्ञा मनातल्या मनात म्हणाली ,"तुमचा मुलगा माझ्याकडे बघायलाही तयार नाही. मग तुमच्या मनातली इच्छा पूर्ण कशी होणार?" पण उघडपणे त्यांना काहीही उत्तर न देता फक्त मान डोलावून ऑफिसला निघाली.

पुढचे अनेक दिवस त्यांचे रुटीन नेहमीप्रमाणेच सुरु राहिले. निनादचे वर्कलोड वाढल्यामुळे त्याला ऑफिसमधून यायला रोज उशीर होत होता. असाच एक दिवस ऑफिसमधून आल्यावर निनादने प्रज्ञाला सांगितले, "गेले काही दिवस खूप वर्कलोड होते. आमचे ते प्रोजेक्ट पूर्ण झाले आणि रिलॅक्स व्हायला म्हणून आम्ही ऑफिसमधल्या मुलांनी दोन तीन दिवस पिकनिकला जायचे ठरवले आहे. आमच्या फिमेल कलिग्स येणार नाहीत नाहीतर तुलाही घेऊन गेलो असतो. आम्ही परत आलो की आपण सुद्धा जाऊ कुठेतरी जवळपास वीकेंडला फिरायला.."

प्रज्ञाला वाटले, "चला.. ह्याचे वर्कलोड कमी झाले,आपणही बाहेर फिरायला जाऊ म्हणतोय म्हणजे गाडी पुढे सरकतेय.." ती म्हणाली, "ठीक आहे. ये जाऊन तू! कुठे जाताय?" "कोकणात जातोय. एका कलिगचे फार्महाऊस आहे तिकडे.. पण कदाचित अगदी इंटर्नल भागात असल्याने मला कदाचित रेंज नसेल तिकडे... रेंज मिळाली की तुला करेन मी फोन.. ओके?" निनादने प्रज्ञाच्या खांद्यावर हात ठेवत सांगितले. निनादच्या ह्या कृतीने प्रज्ञाला आनंद झाला. तिच्या मनातली शंका दूर झाली.

दुसऱ्या दिवशी सकाळीच निनाद पिकनिकला निघून गेला. त्यानिमित्ताने प्रज्ञाने सुद्धा सासूबाईंना सांगितले की ,"आई,मी आईकडे जाऊन यायचं म्हणतेय.." "हो!जा की.. तुलाही तेवढाच चेंज!" मंगलाताई म्हणाल्या.

संध्याकाळी प्रज्ञा ऑफिसमधून डायरेक्ट आईकडेच गेली. तिथे रिलॅक्स मनाने तिने गप्पा मारल्या. आराम केला. दुसऱ्या दिवशी तिने मैत्रिणींसह फिरायला जायचे ठरवले. संध्याकाळी ती मैत्रिणींबरोबर मॉल मध्ये फिरताना तिला नितीनचा कलीग अरविंद भेटला.

"अरे हाय वहिनी! कश्या आहात ?"अरविंदने प्रज्ञाला म्हटले.  "हाय मिस्टर अरविंद! मी मजेत.. पण तुम्ही इथे काय करताय? ऑफिस पिकनिकला नाही गेलात?" प्रज्ञाने आश्चर्याने विचारले.

"ऑफिस पिकनिक? नाही हो वहिनी.. कुठे ऑफिस पिकनिक वगैरे?मी तर आपला राबतोय ऑफिसात.. आणि माझ्या बरोबर सगळेच.. पिकनिक वगैरे साठी सुट्टी कुठे देतात हे बॉस ? काही पिकनिक वगैरे जात नाही हो ऑफिसची... उलट गाढवासारखे राबवून घेतात आम्हाला.. पण निनादचं  बरंय  राव! मस्त सुट्टी घेऊन तुम्हाला वेळ देतोय.."

प्रज्ञाला हे ऐकून धक्काच बसला.. तरीही तिने स्वतःला सावरत म्हटले.. "ओह सॉरी.. मी चुकून ऑफिस पिकनिक ऐकलं असेल निनादकडून... तो ऑफिस टूर म्हणाला असेल..."

प्रज्ञाचे हे बोलणे ऐकून अरविंदला सुद्धा आश्चर्य वाटले.. तो म्हणाला, "टूर ?आणि निनादला? नाही वहिनी.. निनाद मार्केटिंगमध्ये नाही ना! त्याला कशाला टूरला जावे लागतेय?"

अरविंदचे बोलणे ऐकून प्रज्ञाच्या पायाखालची जमीनच सरकली... तरीही ती म्हणाली ,"अरविंदजी.. प्लिज.. मला खरंच सांगता का... निनादचा फोन सुद्धा लागत नाहीये.मला कळत नाहीये हे काय चाललंय!तो गावाला जातो सांगून गेलाय.."

प्रज्ञाची अवस्था बघून अरविंदलाही कळले की काहीतरी प्रॉब्लेम नक्कीच आहे.. त्याला प्रसंगाचे गांभीर्य कळले. त्याने विचारले ,"वहिनी ,तुम्ही खूप टेन्शनमध्ये दिसताय.काय प्रॉब्लेम असेल तो मला सांगा..आपण शोधू निनादला.. डोन्ट वरी.."

"अरविंदजी... आता मी जे काही विचारेन ते प्लिज मला खरं सांगा.. तुमची बहीण समजून सांगा.. निनाद ऑफिसमधल्या फिमेल कलिग्सशी कसा वागतो? त्याचं  लग्नाआधीपासून ऑफिसमध्ये कुणाशी अफेअर तर नाही ना?प्लिज मला सांगा.."

"वहिनी ,खरं तर हा तुमचा खाजगी प्रश्न आहे. पण मला माहित आहे तितकं मी तुम्हाला नक्की सांगेन.. निनाद ऑफिसमध्ये बायकांशी,मुलींशी अगदी व्यवस्थित वागतो.. जेवढ्यास तेवढं! जास्त बोलायला सुद्धा जात नाही.. मग अफेअर वगैरे तर लांबच राहिलं! तो आणि अमित मात्र इनसेपरेबल असतात. जिथे अमित तिथे निनाद.. त्यांची मैत्री अगदी कॉलेजपासून आहे. अमित आणि निनाद ही जोडीच आहे ऑफिसमध्ये! त्यामुळे मी एक सुचवू शकतो की आताही कदाचित अमित आणि निनाद एकत्रच असतील. तुम्ही अमितला फोन करून बघितला का? कारण तो सुद्धा सुट्टीवर आहे."

"अमितचा नंबर नाहीये माझ्याकडे.."

"ठीक आहे..थांबा मी फोन करून बघतो..

वहिनी ...अमितचा सुद्धा फोन लागत नाहीये. तुम्ही एक काम करा. अमितच्या घरी जाऊन बघा.. कदाचित तिथे तुम्हाला निनाद सापडू शकेल.."

"पण अरविंदजी...अमितचा पूर्ण पत्ता माझ्याकडे नाहीये..बांद्रयाला कुठेतरी राहतो इतकंच माहितीये.."

"ठीक आहे वहिनी.. मी आमच्या एचआर कडून पत्ता घेऊन तुम्हाला लगेच सांगतो.. एचआर माझा मित्रच आहे."अरविंदने प्रज्ञाला धीर देत सांगितले.

त्याने प्रज्ञाला अमितचा पत्ता दिला आणि प्रज्ञा लगेच निघाली. अमितच्या घरी पोहोचेपर्यंत तिच्या मनात असंख्य विचारांनी गर्दी केली होती. तिच्या मनात नको नको त्या शंका येत होत्या. डोकं गरगरायला लागलं होतं. भीतीने पोटात गोळा आला होता. विचारांच्या गर्दीत हरवलेली असतानाच ती कॅबने अमितच्या बिल्डिंगबाहेर पोहोचली. लिफ्टमधले ते काही सेकंदसुद्धा तिला काही वर्षांसारखे भासत होते. ती अमितच्या घराबाहेर पोहोचली आणि बेल दाबणार इतक्यात तिला घराबाहेरच्या शू रॅकमध्ये निनादचे शूज दिसले आणि ती काय समजायचं ते समजली. हताश मनाने ती घरी गेली. निनाद व तिची पहिली भेट, त्यात अमितचे येणे ,अमित आणि निनादचे एकत्र टूरला जाणे , ऑफिसचं खोटं  कारण देऊन उशिरापर्यंत घरी न येणे , तिला बघून अमितचे अनकंफर्टेबल होणे ह्यातून ती काय समजायचे ते समजली. घरी गेली तेव्हा शांत शांतच होती. जवळजवळ शॉकमध्येच होती. पण तिने स्वतःला सावरले. घरी पोहोचल्यावर तिच्या आई बाबांनी तिची अवस्था बघितली आणि त्यांनी तिला विचारले. तिने तिचे मन आईबाबांपुढे मोकळे केले. आई बाबांना हे ऐकून प्रचंड धक्का बसला. आईला तर खूप अपराध्यासारखे वाटू लागले. बीपी लो होऊन तिला भोवळ आली. तिने प्रज्ञाची माफी मागितली. "आम्हाला माफ कर बेटा.. आम्ही तुझ्या लग्नाच्या इतक्या मागे लागलो होतो, आमच्यानंतर तुला कोण ह्या चिंतेत आम्ही बाकी कसलाही विचार केला नाही. मुलाची चौकशी न करता तुझं घाईत लग्न करून टाकलं. माफ कर बेटा आम्हाला.."

"आई-बाबा तुम्ही मनाला लावून घेऊ नका. तुमची ह्यात काहीही चूक नाही. चौकशी केली असती तरी आपल्याला ह्याबद्दल काय कळणार होतं? पण आता मी ह्याला सोडणार नाही. सगळ्या जगापुढे ह्याला नाही नागडा केला तर नावाची प्रज्ञा नाही..शी! किळस येतेय मला त्याची... त्याच्यावर मी प्रेम केलं. त्याच्यावर विश्वास ठेवला..आणि त्याने ... माझा इतका मोठा विश्वासघात केला.. त्याला आता मी सोडणार नाही..." प्रज्ञा तावातावाने बोलत होती.

"हो बेटा! शांत हो.. आपण कायदेशीर मार्गाने जाऊ.. तुला नक्की न्याय मिळेल.मी तुझ्या पाठीशी आहे. आत्ताच तुझ्या गार्गीआत्याला फोन करतो आणि उद्या सकाळीच तिला इकडे बोलावून घेतो. तिच्याशी बोलून आपण पुढे काय करायचं ते ठरवू. काळजी नको करुस बेटा.. आपण ह्यातून नक्की मार्ग काढू.." बाबा प्रज्ञाला जवळ घेऊन तिच्या डोक्यावर हात फिरवत म्हणाले. खरं तर त्यांनाही खूप धक्का बसला होता. पण आत्ता पॅनिक होऊन आणखी प्रश्न उभे करण्यापेक्षा प्रज्ञाच्या पाठीशी ठामपणे उभे राहणे आवश्यक आहे हा विचार करून ते खंबीरपणे आपल्या मुलीच्या पाठीशी उभे राहिले.

बाबांनी लगेच गार्गीआत्याला फोन केला.. "हॅलो अक्का, तुझ्याशी जरा महत्वाचं बोलायचं आहे.... "अशी सुरुवात करून त्यांनी आत्याला सगळ्या गोष्टींची कल्पना दिली. गार्गीआत्या वकील होती. ती म्हणाली ,"तू काही काळजी करू नकोस दादा. मी उद्या सकाळीच घरी येते. आपण प्रज्ञाला नक्की न्याय मिळवून देऊ. उद्या सकाळी सविस्तर चर्चा करून प्लॅन ऑफ ऍक्शन ठरवू. तू प्रज्ञाची आणि तुम्हा दोघांचीही काळजी घे. डोन्ट वरी. सगळं ठीक होईल."

त्या रात्री कुणालाही झोप लागली नाही. तिघेही नुसते डोक्याला हात लावून विचार करत बसले होते.

दुसऱ्या दिवशी सकाळीच गार्गीआत्या आली. तिने आधी प्रज्ञाला जवळ घेऊन धीर दिला आणि सगळं समजावून सांगितलं. तिला डिवोर्स साठी अप्लाय करायला सांगितलं. सगळी प्रोसिजर समजाऊन सांगितली. प्रज्ञाला त्याच्याकडून काहीही नको होतं. फक्त त्याचं खरं रूप जगापुढे आणायचं होतं.

आत्याच्या येण्यामुळे प्रज्ञाला धीर आला. इकडे निनादला ह्या सगळ्याची काहीही कल्पना नव्हती. त्याने दुसऱ्या दिवशी त्याचा फोन सुरु केला आणि प्रज्ञाला फोन करून संध्याकाळपर्यंत घरी पोहोचत असल्याचे सांगितले. प्रज्ञा त्याच्याशी अगदी नॉर्मल बोलली. तिने त्याला जाणवू दिले नाही की तिला सगळे कळले आहे. संध्याकाळी जेव्हा निनाद घरी आला तेव्हा प्रज्ञा आधीच घरी पोहोचलेली होती. निनाद घरी आला आणि फ्रेश व्हायला म्हणून त्याच्या खोलीत गेला. त्याच्या मागोमाग प्रज्ञा सुद्धा खोलीत गेली.  आणि तिने दार लावून घेतले.

"काय झालं प्रज्ञा?काही बोलायचंय का?

"नाही.. But I missed you so much!" असे म्हणत त्याच्या जवळ गेली आणि त्याला मिठी मारली.

"हे काय करते आहेस प्रज्ञा?" असे म्हणत तो तिच्यापासून लांब झाला.

"का?काय झालं?मी बायको आहे तुझी.. तसे तर बरेच काही करायचा हक्क आहे मला..पण तूर्तास तुला मिठी नक्कीच मारू शकते.." ते म्हणत प्रज्ञा परत त्याच्या जवळ गेली. 

"प्रज्ञा प्लिज.. तुला मी सांगितलंय .. I am not ready yet..Give me some time.." निनाद तिचे हे रूप बघून म्हणाला.

"ओह रियली? सरळ सांग ना तुला माझ्यात इंटरेस्ट नाहीये.." प्रज्ञाने त्याला कडक शब्दांत विचारले..

तिचा हा पवित्रा बघून निनाद चपापला.. आणि स्वतःचा बचाव करत म्हणाला.. "हो.. नाहीये मला तुझ्यात इंटरेस्ट.. आरश्यात बघ जरा स्वतःला.. काय आहे तुझ्याकडे? ना रूप ना चांगली फिगर.. का बघावं मी तुझ्याकडे? का इंटरेस्ट घ्यावा?"

"अरे नालायका... तुझ्यासमोर विश्वसुंदरी आणून ठेवली ना तरीही तू काहीही करू शकणार नाहीस..." प्रज्ञा म्हणाली..

"म्हणजे? काय म्हणायचंय काय तुला?स्पष्ट बोल..." आता निनादला टेन्शन आले होते.

"म्हणजे तू म्हणतो आहेस की तुला फक्त माझ्यात इंटरेस्ट नाही...बरोबर?

"हो.. नाहीये मला तुझ्यात इंटरेस्ट..."

"माझ्यात काय....तुला कुठल्याच बाईत इंटरेस्ट नाहीये... तू गे आहेस... You are a bloody homosexual Mister Ninad and that Amit and you are not just friends...You are partners..Am I right?"प्रज्ञा त्याच्यावर ओरडली.

निनाद आता पुरता अडकला होता. त्याचे हे रूप बाहेर पडल्यामुळे त्याच्या पायाखालची जमीन सरकली होती..

पॅनिक होऊन तो ओरडला.. "हळू बोल प्रज्ञा..."

"का? मी का हळू बोलू? तुला हे करताना, मला फसवताना काहीच लाज वाटली नाही.. इतकी मोठी फसवणूक केलीस तू माझी.. मी का हळू बोलू?" प्रज्ञा ओरडून म्हणाली.

तिचा हा अवतार बघून निनाद तिच्या अंगावर धावून गेला.. पण प्रज्ञाने त्याला जोरात ढकलले आणि सणकन त्याच्या कानाखाली वाजवली आणि ओरडली ."खबरदार माझ्या अंगाला हात लावलास तर... " ह्या अनपेक्षित प्रसादाने तो आणखीनच पॅनिक झाला.

आणि त्याचं  सगळं उसनं  अवसान सुद्धा गळून पडलं. तो ओरडून बोलला "हो! आहे मी गे! काय करशील तू? काय पुरावा आहे तुझ्याकडे? कोण विश्वास ठेवेल तुझ्यावर? आज लग्नाला सात महिने झालेत आपल्या.. कुणी विश्वास ठेवेल का तुझ्यावर?"

प्रज्ञा हसून म्हणाली.. "त्यासाठी माझी आणि तुझी वैद्यकीय चाचणी करून घ्यायला माझी काहीही हरकत नाही..त्यात कळेलच की लग्नाला सात महिने होऊन सुद्धा मी व्हर्जिन आहे आणि तू..."

निनाद हे ऐकून आता मात्र सपशेल घाबरला.. चाचरत तो फक्त इतकंच बोलू शकला ,"काय हवंय काय तुला माझ्याकडून? किती पैसे पाहिजेत बोल..काय हवं तुला सांग!"

त्यावर प्रज्ञाने उत्तर दिले ,"तुझ्या पैश्यांची गरज नाही मला. आता तुला जगासमोर आणेन तेव्हाच मला समाधान मिळेल. उद्यापर्यंत तुला डिवोर्स नोटीस मिळेल. त्याला काय उत्तर द्यायचे आणि सगळ्यांच्या प्रश्नांना काय उत्तर द्यायचे हे तूच ठरव.." असे म्हणत प्रज्ञाने तिची आधीच भरून ठेवलेली बॅग उचलली आणि ती खोलीच्या बाहेर पडली.

त्यांचे मोठ्या आवाजातील भांडण ऐकून निनादचे आई बाबा आधीच घाबरले होते. त्यात प्रज्ञा बॅग उचलून जाताना दिसल्यावर सासूबाईंनी तिला विचारले.. "प्रज्ञा...थांब.. काय झालंय? का भांडलात ? आणि घर सोडून जाण्याइतकी काय वेळ आलीये? तू कुठेही जाणार नाहीस. इथे बस.. आपण बोलून प्रश्न सोडवू.."

"आई.. खरं तर मी तुमच्या प्रश्नांना उत्तर देऊ इच्छित नाही. पण तुमच्या मुलाला आता बोलायला तोंड राहिलं नाही त्यामुळे मीच सांगते.. तुमचा मुलगा गे आहे. तो समलिंगी आहे. त्याचा मित्र अमित आणि तो.... शी!मला बोलवत सुद्धा नाही.. तुमच्या मुलाने आजवर माझा साधा हात सुद्धा धरलेला नाही. तुमच्या मुलाने तुमची आणि माझीही  प्रचंड मोठी फसवणूक केली आहे. आता हा प्रश्न बोलून सुटणार नाही. मी जातेय इथून..उद्या माझ्या वकिलांची नोटीस येईल  त्या नोटीसला काय उत्तर द्यायचं ते तुम्ही ठरवा.." इतकंच बोलून ती निघाली.. आणि मागे वळून फक्त इतकंच म्हणाली ,"समलिंगी असणे हे चूक की बरोबर ह्या वादात मला पडायचे नाही .  माझा एक कलीग सुद्धा समलिंगी आहे.पण त्याने कुणाची फसवणूक केली नाही. जे आहे ते मोकळेपणाने मान्य करून आयुष्य जगण्याची हिम्मत आहे त्याच्यात..आणि मला त्याचं  खूप कौतुक आहे..

कुणाचं sexual  orientation  काय असावं हा ज्याचा त्याचा खाजगी प्रश्न आहे. आपला पार्टनर स्त्री असावी कि पुरुष हे ठरवण्याचा अधिकार तुमच्या मुलाला नक्कीच होता पण माझं आयुष्य बरबाद करण्याचा, मला फसवण्याचा अधिकार त्याला नाही.."

हे सगळे ऐकून निनादच्या आईवडिलांना खूप धक्का बसला. पण काही करायला आता खूप उशीर झाला होता. प्रज्ञाने डिवोर्स मिळवला.. आणि पुढच्या आयुष्यात फक्त रिसर्चवर लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतला. पुढे मागे एक मुलगी दत्तक घेण्याचा तिच्या निर्णयाचे आईबाबांनी स्वागत केले.

प्रज्ञा आणि निनादच्या निमित्ताने अनेक प्रश्न उभे राहतात.

प्रज्ञाला फसवणे ह्यात निनादचा दोष आहेच. तो शंभर टक्के अपराधी आहे.पण इमोशनल धमक्या देऊन त्याला जबरदस्तीने लग्नाला उभे राहण्यास भाग पाडणाऱ्या आई वडिलांचा ह्यात दोष नाही का? आपले समलिंगी असणे आईवडील व समाजाच्या भीतीने लपवून ठेवावे लागणाऱ्या निनादवर एखाद्या मुलीचे आयुष्य स्वतःच्या स्वार्थासाठी बरबाद करण्याची वेळ का आली?

समलिंगी लोकांना मोकळेपणाने आयुष्य जगू न देणारा समाज दोषी नाही का?

लग्न हीच जन्माची इतिकर्तव्यता असे मनावर ठसवून पिअर प्रेशर खाली उपवर मुलं आणि मुली व त्यांच्या आई वडिलांवर "लोकांची तोंडं  बंद करण्यासाठी" लग्न लादणारा समाज दोषी नाही का?


No comments:

Post a Comment