Thursday, June 16, 2016

आणि नर्मदा बोलावत होती.

रात्रीचे दोन वाजले आणि कावेरी आजींना जाग आली. परत डोळा लागेना म्हणून पाणी प्यायला उठल्या. बघतात तर काय नरेश , त्यांचा नातू , त्याच्या बिछान्या वर नव्हता. आजींच्या काळजात धस्स झाले. घरात सगळीकडे त्यांनी शोधले पण नरेश कुठेही दिसत नव्हता. त्यांनी घाई घाईने त्यांच्या नवर्याला म्हणजेच सुधाकर रावांना उठवले. "अहो.. अहो उठा ना.. बघा ना आपला नरेश परत दिसत नाहीये. कुठे गेला बघा ना.. अहो झोपलात काय? उठा आणि शोधा त्याला." आजी जिवाच्या आकांताने आजोबांना उठवत होत्या. आजोबा ताडकन उठून बसले. "काय गं काय झाले? इतकी का घाबरलियेस तू? " आजोबांनी आजीला विचारले. "अहो घाबरू नको तर काय करू! आपला नरेश कुठेतरी निघून गेलाय रात्रीचा! बघा ना.. शोधून आणा ना त्याला. अहो तिकडे नदीवर तर गेला नसेल ना? काय करायचे आपण आता? अहो बोलावा ना कुणालातरी.. आणा ना त्याला शोधून.." आजी आता रडायला लागल्या होत्या. " अगं पण आपण इतकी काळजी घेऊन परत असं कसं झालं? आता त्याच्या बापाला काय तोंड दाखवणार आपण?" आजोबा कपाळावर हात मारून मटकन खाली बसले. "अहो बसलात काय? उठा ना.. आणा त्याला शोधून. तुम्हाला मेलं वेळेवर काही करायच सुचत नाही. मीच बघायला हवं आता." अस म्हणून पदर खोचून ओसरीवर येऊन आजींनी त्यांच्या नोकराला गणूला हाक मारली. वयाच्या ऐंशिव्या वर्षी सुद्धा आजी खमक्या होत्या. पण आजोबा मात्र आता थकले होते. "गणू ए गण्या .. अरे ए गणू.." आजींनी गणूला आवाज दिला तसा गणू धावत पळत ओसरीवर आला. "काय झाल वैनीबाई? कशापाई रातीचा आवाज देतया? मालक बरे हाइती नं वं? " "अरे गणू नरेश घरात नाहीए. रात्री झोपताना नीट होता. रात्रीचा कुठे जाउ नकोस म्हणून त्याला बजावले देखील होते. सगळी दारं खिडक्या कुलुपबंद करून त्याला झोपवले होते रे..पण आता बघ ना अचानक कुठे नाहीसा झाला कळतच नाहीए. जा जरा बघून ये परत नदिपाशी नाही ना गेलं माझं लेकरू!! जा आणि त्याला घेतल्याविना परत येऊ नकोस." आजींनी फर्मान सोडले. "व्हय वैनिबाई..आत्ता आणतो बघा धाकल्या मालकास्नी हुडकून..तुमि कायबी काळजी करू नगसा..” अस म्हणत गणू नरेश ला शोधायला गेला. इकडे कावेरी बाईंनी दारात भांडं उपड घालू ठेवल आणि त्या देवाचा धावा करत बसल्या. पण त्याचं लक्ष लागतय कुठे! “काय गं.. इथे काय दाराशी बसलीयेस? गणू ला सांगितलस ना नरेश ला शोधायला? येईल बघ तो.. तू आत चाल बरं!” आजोबांच्या ह्या बोलण्याने आजी भानावर आल्या. “ हं! हो! येते!” असं म्हणून आजी आत आल्या खर्या पण मनातून त्या खूप अस्वस्थ व घाबरलेल्या होत्या. “अहो! गिरीजा नसेल ना घेऊन गेली त्याला?” असं हळू आवाजात आजोबांना म्हणाल्या. गिरीजाचं नाव काढल्याबरोबर आजोबा सुद्धा घाबरले. पण उसनं अवसान आणून म्हणाले. “नाही गं! असं कुठे असतं का? ती गेली त्याला २५ वर्ष झालीत आता. इतक्या वर्षांनी कशाला असं काही होईल? असं काही नसतं ! तू उगाच नसत्या शंका काढून जीवाला घोर लावू नकोस.” आजोबा असं म्हणाले खरे पण त्यांनाही तीच भीती वाटत होती जी आजींना वाटत होती. गिरीजा म्हणजे कावेरीबाई व सुधाकर राव ह्यांच्या एकुलत्या एक मुलाची म्हणजेच राजेंद्रची बायको. एकदम शांत , गुणी व सालस मुलगी. एखाद्याला सून म्हणून व बायको म्हणून हवी असे तशीच होती गिरीजा. लग्न करून सासरी येताच तिने तिच्या स्वभावाने व गुणांमुळे सर्वांचे मन जिंकले. पण कुणाची तरी दृष्ट लागली आणि गिरीजाचे आयुष्य उध्वस्त झाले.लग्नाला ५ वर्ष झाली तरी गिरीजाकडे गोड बातमी नव्हती. छोट्या गावात राहणार्या ह्या कुटुंबाला हि गोष्ट म्हणजे गिरीजाचा घोर अपराध वाटू लागला. सर्वांचे गिरीजाशी वागणे बदलले. अगदी राजेंद्रचे सुद्धा! त्यालाही ती डोळ्यापुढे नको असायची. पण गिरीजा मात्र शांतपणे नशिबाचे भोग म्हणून हे सगळं सहन करत होती. टोमणे ऐकून घेणं, कुजकट बोलणी ऐकणं , शुभ कार्यात तिला न बोलवणे हे तिच्यासाठी नित्याचेच झाले होते. पण जेव्हा तिला कळले कि तिच्या सासरचे राजेंद्रचे फक्त वंशाच्या दिव्याच्या अट्टाहासापायी दुसरे लग्न लावून देत आहेत तेव्हा तिच्या सहनशक्तीचा कडेलोट झाला आणि तिने सर्व शक्तीनिशी ह्याचा विरोध केला. पण तिचे प्रयत्न तोकडे पडले आणि राजेन्द्र्चा दुसरा विवाह लावून देण्यात आला. ज्या दिवशी गिरीजाची सवत घरात आली त्याच दिवशी सासरच्यांनी गिरिजाला कायमचे माहेरी निघून जाण्यास सांगितले. गिरीजा मानी होती. ती माहेरी गेली नाही. घरातून तर ती बाहेर पडली. पण जाता जाता संध्याकाळच्या वेळी ती म्हणाली. “ज्या वंश्याच्या दिव्याखातर तुम्ही घराच्या लक्ष्मी ला बाहेर काढत आहात, त्याच वंशाच्या दिव्याला एक दिवस मी घेऊन जाईन. हा माझा शब्द आहे. “ ती घराबाहेर पडली आणि नंतर कुणाला सापडलीच नाही. गावातल्या काही लोकांनी तिला गावाबाहेर जो नर्मदेचा प्रवाह वाहत होता तिकडे जाताना पाहिले ते शेवटचेच. नंतर तिचे प्रेतही सापडले नाही. इकडे राजेंद्र आणि त्याचे घरचे ब्याद गेली म्हणून निश्चिंत होते. पण कावेरीआजी मात्र धास्तावलेल्या असायच्या. उगाच बोला फुलाला गाठ नको म्हणून त्यांनी राजेंद्र ला नोकरीसाठी शहरात पाठवून दिले व नरेश च्या जन्मानंतर त्याला बजावले कि चुकून सुद्धा गावात यायचे नाही. उलट आम्हाला आठवण आली कि आम्हीच शहरात येऊन तुमची भेट घेऊ. आणि आज तब्बल २५ वर्षांनंतर नरेश एकटाच गावाला आला होता. त्याने त्याचे शिक्षण पूर्ण झाल्याच्या निमित्ताने बाबांकडे हट्ट केला होता कि मला एकदाच गावाला जाऊन येऊ द्या. फक्त दोन दिवस! मुलाचे मन बापाच्याने मोडवेना म्हणून राजेंद्र ने नरेश ला आजी आजोबांकडे पाठवले ,पण बाजावूनच कि आजी आजोबा सांगतील तसच वागायचं , उगाच गावात इकडे तिकडे अनोळखी ठिकाणी भटकायला जायचे नाही. नरेश ने बाबांना वचन दिले कि तो त्यांना काळजी वाटेल असे काहीही करणार नाही. आणि तो बस ने गावाला यायला निघाला. गावाला पोचल्यावर रिक्षा वगैरे च्या भानगडीत न पडता त्याने गाव बघायला मिळेल म्हणून सरळ चालत घरी जायचा निर्णय घेतला. घराकडे जात असताना का कुणास ठाऊक पण कुठल्याश्या अनामिक ओढीने तो नदीच्या प्रवाहाकडे चालत जाऊ लागला. नदीच्या पात्रामध्ये पाय ठेवणार इतक्यात त्याला कुणीतरी हटकले. “ओ पाव्हनं ! तिकडं कुठं जाताय? भोवरा आहे पाण्यात! पोहायला येतं का तुम्हास्नी? उगा जीव जायचा! अन कुणाकड आलं म्हणायचं तुमी?” रामाचे बोलणे ऐकून नरेश भानावर आला आणि म्हणाला अहो मी नरेश , सुधाकर पाटलांचा नातू! आजच आलो आजी आजोबांना भेटायला!” हे ऐकून रामा म्हणाला ,”पाटलांचा व्हय रे तू! चल तुला सोडतो घरी! म्या बी तिकडच चाल्लूया !” नरेश ला घेऊन रामा पाटलांच्या घरी गेला आणि त्याने सांगितले कि नरेश कसा एकटाच नदीकडे जाताना त्याला दिसला आणि त्याने नरेश ला घरी आणून सोडले. पाटलांनी रामाचे आभार मानले आणि नरेश ला बजावले कि परत नदीच्या रस्त्याला सुद्धा जायचे नाही. त्यांना गिरीजाच्या सूडप्रतिज्ञेची आठवण झाली आणि काळजी वाटू लागली. रात्री झोपताना नरेशने परत कुठे जाऊ नये म्हणून त्यांनी कडेकोट बंदोबस्त केला तरी नरेश अचानक नाहीसा झाला होता. “देवा आमच्या पापाची शिक्षा आमच्या पोराला देऊ नकोस”. असं म्हणत दोघेही देवाचा धावा करत बसले होते तेवढ्यात गणू नरेश ला घेऊन आला. गणू ने सांगितले कि नरेश त्याला नदीच्या रस्त्यावरून परत येताना दिसला. आजी आजोबा दोघांनीही नरेश ला चांगलेच फैलावर घेतले . पण नरेशने त्यांना सांगितले कि त्याला कळलेच नाही कि तो झोपेतून उठून चालत नदीपाशी कसा पोचला.नरेश ला काहीही आठवत नव्हते. त्याला इतकेच आठवत होते कि पायाला नदीच्या पाण्याचा स्पर्श झाल्याबरोबर त्याला एका अनोळखी स्त्री ने हटकले आणि परत घरी जाण्यास सांगितले. आजीने त्याला त्या स्त्रीचे वर्णन विचारले तर त्याने सांगितले कि तिने हिरव्या रंगाची साडी नेसली होती , कपाळावर मोठे कुंकू होते व चांगल्या घरची वाटत होती. त्यालाही आश्चर्य वाटत होते कि रात्रीच्या वेळी एक चागल्या घरची बाई नदीपाशी काय करत होती. तो तिला विचारणार इतक्यात ती बाई झपझप चालत नाहीशी झाली आणि हा घरी यायला निघाला इतक्यात याला गणू भेटला. चला देव पावला व नरेश सुखरूप घरी आला, संकट टळले असे म्हणत सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला. दुसर्या दिवशी सकाळीच आजोबांनी हि घटना राजेंद्र ला कळवली व कसलाही विचार न करता राजेंद्र एकटाच परस्पर नरेश ला परत घेऊन जायला म्हणून गावाकडे निघाला. गावी पोचल्यावर त्याने त्याच्या आई वडिलांना सांगितले कि तो नरेशला परत घेऊन जायला आला आहे.व ती दोघं उद्या सकाळी निघणार आहेत. आजी आजोबांना घडल्या प्रकारची पुनरावृत्ती व्हायला नको असेच वाटत असल्याने त्यांनीही परवानगी दिली. बर्याच वर्षांनी गावाकडे आल्याने राजेंद्र जरा निवांत होता. जरा जुन्या मित्रांना भेटून येतो असे सांगून तो घराबाहेर पडला पण मित्राच्या घराच्या दिशेने न जाता ओ कुठल्याश्या अनामिक ओढीने नदीकडे जायला निघाला. त्याला जणू नर्मदा बोलवत होती. चालत चालत नदीच्या पात्रात शिरल्यावर तो भानावर आला पण तोवर उशीर झाला होता. पट्टीच्या पोहणाऱ्या राजेंद्रला नदीत कोणी खेचतय असे वाटू लागले.त्याने बाहेर पडण्याचा आटोकाट प्रयत्न केला पण त्याचे प्रयत्न विफल ठरले. अखेर त्याने धडपड थांबवली आणि शेवटचे डोळे उघडून पहिले तेव्हा त्याला गिरीजा दिसली, सूडाच्या भावनेनी हसत असलेली.. त्याला ऐकू आले, आज मी मुक्त झाले.. आज मी माझा शब्द खरा ठरवला.. पाटलांच्या वंशाचा दिवा मी नेतेय! निष्पाप नरेशला जीवनदान देऊन तिने राजेंद्रला त्याच्या पापाची शिक्षा दिली होती. गिरीजा मुक्त झाली होती. राजेंद्रला नर्मदेच्या स्वाधीन करून गिरीजा मुक्त झाली होती!.. वैदेही राजे- जोशी..

2 comments: