परक्याचे धन
हॉस्पिटल मधून फोन आला आणि घाबरलेल्या नर्मदाकाकूंनी देव्हार्यातले देव ताम्हणातील पाण्यात ठेवून महाराजांच्या पोथीचे पठण चालू केले. पोथीचे पठण यंत्रवत सुरु होते. आणि नर्मदा काकूंच्या मनात सारखे हेच विचार येत होते. “देवा सगळ नीट सुखरूप पार पडू दे रे.. या वेळेला तरी मागच्यासारखं करू नकोस. तुझी काय कमी सेवा केली म्हणून आम्हाला ह्या सुखापासून वंचित ठेवतो आहेस? लक्षं असू दे रे बाबा! सगळं नीट होऊ देत!”
“अरे देवा ! दिव्यातले तेल संपत आले आहे. तेल घालायला हवे” असे म्हणत त्यांनी पोथी बाजूला ठेवली, दिव्यातील वात नीट केली व दिव्यात तेल घालून देवापुढे हात जोडून नर्मदाकाकू देवाची करुणा भाकत बसल्या. मनात विचारांची गर्दी असतानाच रश्मीच्या आवाजाने त्यांची तंद्री भंगली. “आई , आता देवांना पाण्यात ठेवून काय उपयोग आहे? आधीच विवेकाने वागला असतात तर आज देवांना पाण्यात ठेवण्याची वेळ तुमच्यावर आली नसती.” रश्मी पोटतिडकीने बोलत होती. “रश्मी, अगं प्रसंग काय अन तू काय बोलतेस? आणि मुलींनी असं उद्धट स्वरात बोलू नये गं ! चांगलं दिसत नाही ते!” “नर्मदा!नशीब तरी तूच बोलतेस हे..मी बोलले तर माझ्या अंगावर धावून येईल हि.. माहेरी होती तेव्हा अगदी गरीब गायी सारखी होती, निमूट सगळं ऐकायची! आता सासरी गेल्यावर मोठे शिंगच फुटलेत महाराणीला. समजाव बाई नर्मदा आता तूच तुझ्या पोरीला..नाहीतर उद्या सासरचे येतील हिच्या कागाळ्या करायला !” पार्वती आजी, नर्मदाकाकूंच्या सासूबाई म्हणजेच रश्मीच्या आजी बोलल्या!
“ आजी माझी चिंता करू नकोस. माझ्या सासरचे तुमच्या सारखे कुजकट आणि बुरसटलेल्या विचारांचे नाहीत. सुदैवाने मी सुटले तुमच्या कचाट्यातून आणि माझी बिचारी मीरा वाहिनी सापडली तुमच्या तावडीत. तुमच्या ह्या घरात लग्न करायची काय दुर्बुद्धी झाली तिला कोण जाणे! दादाच्या प्रेमाखातर तिने ह्या घरात गृहप्रवेश केला आणि तिच्यावर हि वेळ ओढवली ..केवळ तुमच्यामुळे!” रश्मीने थंडपणे आजीला उत्तर दिलं! त्यावर आजी उसळून बोलल्या ,”काय अशी वेळ ओढवली गं? बाळंतपणात असं व्हायचच! त्यात काय एवढं? आमची नाही झाली बाळंतपणे? आमच्या वेळी तर ना असे डॉक्टर होते ना अशी औषधं! आणि रश्मी, आता तुझं हे घर नाही. हे आमचं घर आहे आणि आमच्या घरात काय होतं ते आमचं आम्ही बघून घेऊ. तू आता परकी आहेस. तू तुझ्या घरचं बघायचस. आम्हाला इकडे अक्कल शिकवायला येऊ नको. तुझी काय ती थेरं तुझ्या घरी कर! इकडे मी आणि तुझा बाप जिवंत असेपर्यंत तुमची थेरं चालवून घेणार नाही मी! तू परक्याचं धन होतीस ते आम्ही त्याचं त्यांना दिलय. आता ह्या घरात तू तुझ्या नवीन पद्धती चालवायच्या नाहीस! हे मी शेवटच सांगतेय. नाहीतर आजची हि गोष्ट मला नाईलाजाने तुझ्या बापाच्या कानावर घालावी लागेल. मग तो काय करील ना ह्याच्या भरवसा नाही!” आजी चिडून बोलल्या. आजींच हे बोलणं ऐकून नर्मदाकाकू म्हणाल्या ,”माई ,नका हो असं करू. मी समजावते हिला. ती परत नाही असं बोलणार. तुम्ही ह्यांना काही सांगू नका. लहान समजून माफ करा तुमच्या नातीला. तिच्या वतीने मी माफी मागते तुमची.”
देवघरात चाललेला हा संवाद आणि आजीचा मोठा आवाज बाहेर हॉलमध्ये ऐकायला आला तेव्हा लक्ष्मणरावांच्या डोक्यात तिडीक गेली. “काय कटकट आहे ह्या बायकांची? मला घरात असले वाद चालत नाहीत हे माहित असूनही कोण मोठमोठ्यानी बोलतय? घरंदाज बायकांना हे असं बोलण शोभतं का?” अशी बडबड करत लक्ष्मणराव आत देवघराच्या दिशेने चालू लागले. तेव्हा त्यांच्या कानावर रश्मीचे बोलणे पडले. “आई, तुझ्या अश्याच स्वभावामुळे ह्या दोघांचे फावते. आणि आजी, माझ्या सासरच मी बघून घेईन. पण हे ही माझंच घर आहे. बाकी कुठल्या विषयात मी काही बोलत नाही. बोलणारही नाही. पण आज तुमच्या विचित्र वागण्याचा आणि दुसर्याला त्रास देण्याचा कडेलोट झालाय. मला परक्याचं धन म्हणता अन मग जे धन तुम्हाला मिळालय, मीरा वहिनीच्या आई- वडिलांनी तुम्हाला कन्यादान दिलंय ते तरी नीट सांभाळायचं होतं ना? तुला कळतंय का आजी, आज तुमच्या एका फालतू हट्टापायी मीरा वाहिनीचा जीव धोक्यात घातलाय तुम्ही.. आज तिला जर काही झालं तर काय उत्तर देणार आहात तिच्या आई वडिलांना? काय सांगणार त्या छोट्या आर्या ला? काय उत्तरं देणार तिच्या प्रश्नांची? बोल न आजी.. आता का गप्प बसलीस?”
रश्मीचे हे बोलणे ऐकून लक्ष्मणरावांच्या तळपायाची आग मस्तकात गेली. देवघरात येत ते रागावून म्हणाले, “रश्मी, भरल्या घरात काय आरडाओरड चाललीये? काय बोलतेस तू? शुद्धीत आहेस का?” लक्ष्मणरावांना अचानक असे देवघरात आलेले पाहून नर्मदाकाकू घाबरून सावरून उभ्या राहिल्या. येणाऱ्या प्रसंगाला आता कसे तोंड द्यायचे याचं त्यांना टेन्शन आलं. “अहो..अहो.. शांत व्हा ..तुम्हाला त्रास होईल. नका मनावर घेऊ पोरीचं बोलणं. लहान आहे हो अजून ती. माफ करा तिला. बसता का तुम्ही? पाणी देऊ का तुम्हाला?” नर्मदा काकू लक्ष्मणरावांना शांत करायचा प्रयत्न करत होत्या. लक्ष्मणराव त्यांचा काहीही न ऐकता म्हणाले, “रश्मी, वाटेल ती थेरं ह्या घरात चालणार नाहीत. तुझं डोकं चालवायची वेळ आली नाहीये! आम्ही मोठे जिवंत आहोत अजून!”
“बाबा आजवर तुमचं सगळं खरं केलंत तुम्ही ! लहानपणी तुमच्या धाकापायी आम्ही तुमचं ऐकत होतो आणि आता तुम्हाला वाईट वाटू नये म्हणून आणि तुमच्या तब्येतीकडे पाहून सगळे तुमचं ऐकतात. पण तुम्ही मात्र फक्त स्वतःचं खरं करत आलात. कधी आमचा विचार केलात का हो? आमचा जाऊदे ..कधीतरी आईचा तरी विचार केलात? आज मला तुमचा अपमान करण्याची मुळीच इच्छा नाही. किंवा तुम्हाला त्रास व्हावा असेही मला वाटत नाही. पण तुमच्या भ्रमातून तुम्हाला कोणीतरी जागं करणं आवश्यक झालय कारण आता तुम्ही दुसर्याच्या मुलीच्या आयुष्याशी खेळत आहात. “ रश्मी पोटतिडकीने बोलत होती. “काय केलं गं मी असं? काय नुकसान झालं तुझं?” लक्ष्मणराव चिडून बोलले.
“रश्मी तू घरी जा. आमचं आम्ही बघून घेऊ. आज तुझ्यामुळे माझ्या मुलाला काही झालं तर तुझं तोंड कधी बघणार नाही मी.” पार्वती आजी ओरडल्या. “आजी, ते माझे वडील आहेत. आणि तू आज आमच्यात पडू नकोस. फार तर काय होईल? हे मला इकडून हाकलून देतील, कधी माझं तोंड बघणार नाहीत इतकाच ना? करू देत त्यांना काय करायचं ते. पण ह्यांना त्याच्या वागण्याची जाणीव कोणीतरी करून देणं अतिशय आवश्यक आहे. आणि आज मी तुझं काहीही ऐकणार नाही. तू प्लीज आमच्या मध्ये पडू नकोस नाहीतर माझ्याकडून माझी इच्छा नसताना तुलाही काहीतरी वेडंवाकडं बोलल्या जाईल आणि तुला वाईट वाटेल.” रश्मीने आजीला स्पष्टपणे सांगितले.
“बाबा मला आठवतं तेव्हापासून अरविंद दादा आणि माझ्यात तुम्ही फरक करायचात. आजी तर अगदी खाऊ सुद्धा त्याला जास्त आणि मला कमी असा द्यायची. पण दादाचं माझ्यावर खूप प्रेम असल्यामुळे दादाने कधीही माझ्यावर अन्याय होऊ दिला नाही. स्वतः त्रास सहन करून मला प्रेम दिलं. पण नंतर मोहित झाला आणि तुम्ही आणि आजीने सतत माझ्यावर अन्याय केला. मला आठवतं मोहित झाला आणि आईचं सगळं लक्षं त्याच्यावरच केंद्रित झालं. ती जणू विसरलीच कि तिला अजून दोन मुलं देखील आहेत ज्यांना तिनेच जन्म दिलाय. मी कौतुकाने मोहितशी खेळायला गेले कि आजी खस्स्कन मला मागे ओढायची. मी आईच्या मांडीत बसायला गेले कि आजी धपाटा घालायची पाठीत. आईने सुद्धा कधी आजीच्या ह्या वागण्याला विरोध केला नाही. आजीला तर कधी माझ्याविषयी काही वाटलेच नाही, पण मी तर तुमचीच मुलगी होते ना? मग तुम्ही का असे अंतर दिलेत मला नेहेमी? तुमचं असं वागण पाहून मोहित सुद्धा माझ्याशी नीट वागत नाही. म्हणूनच माझ्या मनात त्याच्याविषयी अढी निर्माण झाली. मला सांगा ज्या मोहित साठी तुम्ही माझ्यावर सतत अन्याय केलात तो कसा वागला? सांग ना आजी, कुठे गेला होता तो देवाला सोडलेला वळू जेव्हा बाबांना त्याची खरी गरज होती?” रश्मी बोलत होती. मोहित विषयी असं बोललेलं आजी ला सहन झालं नाही. ती ओरडली, ”रश्मी! अगं तो लहान भाऊ आहे तुझा. ह्या घराण्याच्या वंशाचा दिवा आहे तो! त्याच्याविषयी असं बोललेलं मी खपवून घ्यायची नाही.” “हो? वंशाचा दिवा? काय दिवे लावलेत गं त्याने? माझं शिक्षण डावलून त्याच्यासाठी कॉलेजमध्ये लाखो रुपयांचं डोनेशन भरून त्याला घातला ना इंजिनिअर व्हायला? काय दिवे लावलेत त्याने? २ वर्ष कॉलेजमध्येच गेला नाही. कुठे उकिरडे फुंकत होता कोण जाणे! बाबांनी विचारल्यावर खोटी मार्कलिस्ट दाखवली त्याने. अन हे सगळं बाबांना बाहेरून कळाल त्याच वेळी त्यांना हार्ट अटॅक आला. त्यावेळी मी आणि दादाने सगळी धावपळ केली. पण आला का तुझा हा वंशाचा दिवा एकदातरी तोंड दाखवायला? आताही जेव्हा घरात आईला , बाबांना टेन्शन आहे, आधाराची गरज आहे तेव्हा कुठे आहे तुझा वंशाचा दिवा? बसला असेल कुठेतरी मित्रांसोबत अड्ड्यावर पत्ते कुटत. त्याच्यासाठी वाया घालवले ते पैसे माझी मेडिकल ची फी भरायला वापरली असती, तर आज तुमच्याच घराण्याचं नाव झालं असतं. पण मला माझी इच्छा असतानाही डॉक्टर बनू दिलं नाही तुम्ही.माझं जाउद्या हो! माझ्या सगळ्या इच्छा आता माझ्या सासरी पूर्ण होत आहेत. तुम्ही मी मुलगी म्हणून माझ्याकडे दुर्लक्ष केलत. पण दादाने काय बिघडवलय तुमच? का त्याच्या आयुष्याशी खेळत आहात? देवाच्या दयेने छान नात मिळाली ना तुम्हाला? मग पहिल्या बाळंतपणात त्रास होऊन सुद्धा का वाहिनीला दुसरा चान्स घ्यायला भाग पाडलत? का दादाशी असे शत्रू सारखे वागलात? “ लक्ष्मणराव सुन्न होऊन ऐकत होते. आजवर त्यांना त्यांच्या अश्या वागण्याची जाणीव कोणी करून दिली नव्हती. पण आज त्यांची मुलगीच त्यांना त्यांच्याच मुलाचा शत्रू म्हणत होती आणि हे ऐकून लक्ष्मणराव अंतर्मुख झाले.
“तुम्हाला चांगली सून मिळाली म्हणून तुम्ही तिलाही सोडल नाहीत? आणि त्या छोट्या आर्या चा काय दोष? माझ्याशी जसे वागलात तसेच आजी आर्याशी वागते. लाज नाही का गं वाटत आजी तुला? स्वत: एक स्त्री असून एका लहान मुलीशी वाईट वागतेस? तुम्ही सुद्धा दादाला सतत मुलगा हवा घराण्याला वारस हवा म्हणून मागे लागलात, माझ्या तब्येतीचं काही खरे नाही, मारण्याच्या आधी एकदा नातवाचे तोंड बघू दे म्हणून त्याला सतत इमोशनली ब्लॅकमेल केलत. आणि तुमच्या प्रेमाखातर दादाने हि रिस्क घेतली. आणि दादाच्या प्रेमाखातर वहिनीने हि रिस्क घेतली. तुम्हाला काय वाटतं बाबा कि वहिनीचे आई बाबा मुलीकडची बाजू म्हणून तुम्हाला घाबरतात? तसं वाटत असेल तर हा तुमचा गैरसमज आहे. त्यांना वहिनीने सांगितलय कि माझ्या घरी कोणालाही काही बोलू नका. आणि वाहिनीच्या प्रेमाखातर ते शांत आहेत. पण आज जर का त्यांच्या मुलीला काही झालं तर ते शांत बसणार नाहीत. आजी,तुझ्यासकट सगळ्यांची पोलीस कम्प्लेंट करायलाही ते मागे पुढे बघणार नाहीत.”
इतकं सगळं ऐकल्यावर आजी गप्प बसणे शक्यच नव्हते. ती परत म्हणाली, “रश्मी, तुझा बाप ऐकून घेत असला तरी मी काही ऐकून घेणार नाही. आम्ही काहीही चुकीचं वागलो नाहीये. सुनेकडून वंशाच्या दिव्याची अपेक्षा करणं चूक आहे का? तुझ्या आईने नाही ऐकलं आमचं? काही नाही..हि सगळी तुम्हा नवीन मुलींची थेरं आहेत. ती काही ह्या घरात चालणार नाहीत हो.. घराण्याला वारस हा हवाच.. “ ह्यावर रश्मी पेटून उठून बोलली “आजी, मोहित च्या वेळी आई मरता मरता वाचली होती. माझ्या आणि दादाच्या नशिबात सख्ख्याच आईचं प्रेम होतं म्हणून! नाहीतर तू तर काय लगेच तयार होतीस ह्या घरात दुसरी सून आणायला. तुम्हाला मऊ जमीन मिळालीये ना म्हणून कोपराने खणताय तुम्ही. वृद्धाश्रमात हाकलून देणारी सून मिळाली असती तर कळल असतं तुम्हाला. बाबा, आता मी जे तुम्हाला सांगणार आहे ते ऐकून तरी तुमच्या हृदयाला पाझर फुटू द्या !” रश्मीचं हे सगळं बोलण ऐकून लक्ष्मणरावांना स्वतःचीच लाज वाटू लागली. त्यांचा कंठ दाटून आला. त्यांच्या डोळ्यातून पाण्याच्या धारा वाहू लागल्या. ते कसं बसं इतकच म्हणू शकले ,”बोल बेटा! आज सगळं बोलून टाक. सगळं मन मोकळ कर. सांग आम्ही कुठे कुठे कमी पडलो. “
आज आयुष्यात पहिल्यांदा रश्मी तिच्या बाबांना रडताना बघत होती. तिला स्वतःचीच लाज वाटली. ती त्यांच्याजवळ गेली. त्यांच्या खुर्चीजवळ त्यांच्या पायाशी बसून त्यांच्या मांडीवर डोकं ठेवलं. लक्ष्मणरावांनी सुद्धा आयुष्यात पहिल्यांदा आपल्या लेकीच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवला. रश्मी रुद्ध कंठाने बोलू लागली ,”मला माफ करा बाबा. मला तुमचा अपमान करायचा नव्हता. तुम्हाला त्रास द्यायचा नव्हता. पण तुमच्याशी हे सगळं बोलणं सुद्धा खूप आवश्यक होतं. बाबा.. आता मी जे तुम्हाला सांगणार आहे ते प्लीज दादाला सांगू नका कि मी तुम्हाला सांगितलाय. त्याने शपथ घातलीये मला पण तुम्हाला सांगणे आवश्यक आहे. बाबा , दादाला अमेरिकेला खूप चांगला चान्स मिळत होता. पण त्याने तो नाकारला केवळ तुमच्या तब्येतीमुळे! इकडे मोहीतचा काही उपयोग नाही आणि आईला सतत तुमची काळजी असते, तिला एकटीला काही त्रास होऊ नये म्हणून आणि माझ्यावर काही पडू नये म्हणून दादाने त्याच्या करियर मधली एक खूप मोठी संधी सोडली. आणि ह्याला वहिनीचा सुद्धा दुजोरा होता. बाबा, आता तरी तुमची जुनाट मतं सोडून दया. आर्याकडेच तुमच्या घराची ज्योत म्हणून बघा. आणि आजीच्या जुन्या मतांकडे फारसं लक्ष देऊ नका.”
तिचं बोलणं ऐकून लक्म्जणराव म्हणाले, “ बरं केलस पोरी तू हे सगळं मला सांगितलस. नाहीतर मला कधी माझ्या मुलांची किंमत कळलीच नसती गं! ह्यापुढे ह्या घरात कुठल्याही स्त्रीवर अन्याय होणार नाही ह्याची जबाबदारी मी घेतो. तुझ्या आईवर सुद्धा मी खूप अन्याय केलाय. पण आता तिच्यावर सुद्धा मी अन्याय होऊ देणार नाही. दर से हि सही लेकीन अब इस घर मी सब दुरुस्त होगा. फक्त आता मीरा सुखरूप घरी येऊ दे.” हे ऐकून नर्मदाकाकुंनाही भरून आलं. आणि त्यांनी परत देवाकडे प्रार्थना केली कि “ देवा, मुलगा मुलगी काहीही चालेल. पण आमच्या मीराला सुखरूप घरी येउ दे बाबा.”
तेवढ्यात रश्मीचा फोन वाजला. तिच्या दादाचाच फोन होता. तिने थरथरत्या हाताने फोन घेतला आणि म्हणाली ,”बोल दादा, वहिनी कशी आहे?” अरविंद म्हणाला ,”रश्मी, अगं मीरा ठीक आहे आता. स्टेबल आहे. पण मुलगी झाली गं. बाळ सुद्धा ठीक आहे. मी खूप आनंदात आहे. पण घरी...” त्याचं वाक्य पूर्ण न होऊ देताच रश्मी म्हणाली, “दादा, मी घरीच आहे. आणि तू काळजी करू नकोस. हि बातमी ऐकल्यावर सगळे खूप खुश होतील. आता आपल्या घरात कोणीही मुलीच्या जन्माचं दु:ख करणार नाही. सगळे वहिनी आणि बाळाचं खूप आनंदात स्वागत करतील. आता तू फोन ठेव आणि वहिनीकडे बघ. बाकी सगळं डिटेल मध्ये नंतर सांगते तुला. ” इतकं बोलून रश्मीने फोन ठेवला आणि म्हणाली, “आई, बाबा, आपल्या घरात परत एक लक्ष्मी आलीये. तुमच्या घरच्या धनात आता देवाने आणखी एका गोड परीची भर घातलीये. मीरा वाहिनी आता बरी आहे. बाळ सुद्धा ठीक आहे. चला आपण सगळे जाऊया हॉस्पिटल मध्ये.” रश्मीने सांगितलेली गोड बातमी ऐकून सगळ्यांना आनंद झाला, आजीने सुद्धा मीरा आणि बाळ सुखरूप आहे हे ऐकून देवाला हात जोडले व सगळे कुटुंब त्यांच्या घरात आलेल्या परीची भेट घ्यायला आनंदाने हॉस्पिटलकडे रवाना झाले. ....
समाप्त
No comments:
Post a Comment