सारंग आज खूप टेन्शन मध्ये होता.. “आज चॉकलेट डे.. पाच वर्षांपूर्वी ह्याच दिवशी ह्याच चॉकलेटच्या मदतीने स्पृहाला आयुष्यात आणले होते..आणि आज..” ऑफिस मध्ये आपल्या क्युबिकल मध्ये बसून विचार करत असताना मित्राने आवाज दिला.. “सारंग, चल यार लंच करून येऊ” आणि सारंगच्या विचारांची तंद्री भंगली.
स्पृहा आणि सारंग, वर वर दिसणारे एक आदर्श जोडपे. सारंग इंजिनिअर तर स्पृहा इंटेरियर डेकोरेटर. कॉमन मित्रांच्या माध्यमातून ओळख झाली. आणि हळू हळू मैत्री घट्ट झाली. सारंगला स्पृहा चा स्वभाव रोख ठोक स्वभाव आवडायचा. हळू हळू मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले आणि सारंगने स्पृहा ला प्रपोज करायचे ठरवले. चॉकलेटडे हा दिवस निवडला. ऑफिस मधूनच स्पृहा ला फोन केला. “हैलो स्पृहा, कशी आहेस? तुला आज वेळ असला तर ऑफिस सुटल्यावर भेटूया का ?” स्पृहाला हि सारंगच्या बोलण्यातून वागण्यातून एकंदरीत त्याच्या मनातल्या भावनांची कल्पना होतीच. शिवाय तिलाहि तो आवडत होताच. तो कधी त्याचे मन मोकळे करतोय ह्याचीच ती वाट बघत होती. म्हणून कुठलेही आढे-वेढे न घेता ती म्हणाली , “हो नक्की भेटूया.. पण कुठे भेटायचं ?” “कॅफे निर्वाणा मध्ये भेटूया”. “ओके, साडे सहा शार्प मी तिथे असेन”. इतके बोलून स्पृहाने फोन कट केला. सारंगने सुटकेचा निश्वास टाकला.. “चला पहिली पायरी तरी चढलो. भेटायला तरी हो म्हणालीये..आता पुढचं पुढे पाहू..” असा विचार करून तो काम लवकरात लवकर संपवायच्या मागे लागला. त्याला थोडे लवकर निघायचे होते. कारण स्पृहा ला भेटायला जाताना तिच्या आवडीचे चॉकलेटघेऊन जायचे होते. चॉकलेटम्हणजे स्पृहाचा अगदी वीक point . मूड कितीही खराब असला किंवा Madam कितीही रागावल्या असल्या तरी त्यावरचा रामबाण उपाय म्हणजे चॉकलेटहे सारंगला पक्के माहिती होते. आणि म्हणूनच सेफ साईड दोन chocolates त्याने घेतले आणि तो वेळेच्या थोडा आधीच कॅफे ला पोचला आणि एक कोपर्यातले टेबल पाहून तिथे बसला. म्हणजे कोणी डिस्टर्ब करणार नाही. थोड्याच वेळात स्पृहा आली. सारंग ने इकडचे तिकडचे बोलणे सुरु केले आणि शेवटी मनाचा हिय्या करून तो म्हणाला, “स्पृहा, तुला कल्पना आलीच असेल मी तुला इकडे आज का भेटायला बोलावले.. तुझी माझी मैत्री आज ह्या स्टेजला पोचलीये कि फारसे शब्द न वापरता आपल्याला एकमेकांच्या मनातले लगेच कळते. शिवाय तुम्हा मुलींना तर एक सिक्स्थ सेन्स असतो म्हणतात. त्यामुळे तुला तर चांगलीच कल्पना असेल माझ्या मनात काय चाललाय ह्याची! आहे ना?” स्पृहा ज्या क्षणाची इतक्या दिवसांपासून वाट बघत होती तो अखेर आला होता, तरी स्त्रीसुलभ लज्जेला अनुसरून ती म्हणाली कि, “ सारंग, मला कल्पना आहे. पण मला ह्या क्षणी काय बोलावे हे सुचत नाहीये. तू इतक्या अनपेक्षित क्षणी हा प्रश्न विचारलास कि मला काही सुचतच नाहीये.” त्यावर सारंग म्हणाला ,” कम ऑन स्पृहा, आता लपाछपी कशाला खेळायची? तुला माहितीये कि तू मला आवडतेस आणि कदाचित मी हि तुला आवडतो.. आवडतो ना? प्लीज स्पृहा.. बोल काहीतरी.. युअर सायलेन्स इज किलिंग मी.. तुझ्या उत्तरावर माझ सगळ पुढचं आयुष्य अवलंबून आहे यार. माझं सुख – दु:खं सगळं तुझ्या हातात आहे आता.. प्लीज सांग.. तुला मी आवडतो ना? सांग ना.. माझ्या आयुष्यात आपल्या दोघांची सगळी स्वप्न पूर्ण करायला माझी साथ देशील?” सारंग चे हे बोलणे ऐकून स्पृहाच्या हृदयाची धडधड वाढली होती. तिला खूप काही बोलायचे होते. पण ह्या क्षणाला शब्द मात्र तिची साथ देत नव्हते. तिने फक्त सारंग च्या डोळ्यात पहिले आणि म्हणाली ,” सारंग, तू माझा सगळ्यात जवळचा मित्र आहेस. मला समजून घेतोस, माझी काळजी घेतोस, तू मला कधीही दुखावणार नाहीस हि मला खात्री आहे. माझं पुढचं सगळं आयुष्य तुझ्यासोबत वाटून घ्यायला मी तयार आहे.” स्पृहाचे हे उत्तर ऐकून सारंग चा जीव भांड्यात पडला आणि त्याने, “इस बात पे कुछ मीठा हो जाये” असं म्हणत आणलेला चोकलेटचा अख्खा बॉक्स तिच्या पुढ्यात रिता केला..
स्पृहा आणि सारंग एकमेकांचे चांगले मित्र आहेत हे दोघांच्याही घरच्यांना माहित होते. जेव्हा दोघांनीही लग्नाचा निर्णय आपापल्या घरी सांगितला तेव्हा घरच्यांनीही तो आनंदानी स्वीकारला. कारण दोघेही चांगल्या घरचे, उच्च शिक्षित होते. आक्षेप घेण्यासारखे काही नव्हते. यथावकाश दोघांच्या घरच्यांनी चांगला मुहूर्त बघून दोघांचा साखरपुडा उरकला व लग्नाची तयारी सुरु झाली. सारंग ला बंगलोर ला चांगली ऑफर मिळत असल्यामुळे त्याने घरच्यांशी व स्पृहाशी बोलून बंगलोर ला शिफ्ट होण्याचे ठरवले. एक महिन्यात सारंग चे बंगलोर ला चांगले रुटीन सेट झाले. दोघांनाही भेटता येत नसल्यामुळे दोघेहि थोडे नाराज होते. पण करियरमध्ये चांगली संधी मिळाली म्हणून सारंग खुश होता व त्याची प्रगती पाहून स्पृहालाही समाधान वाटत होते.
यथावकाश लग्न झाले. दोघे छान फिरायलाही जाऊन आले आणि दोघांचे रुटीन आयुष्य सुरु झाले. नवीन शहर, त्यात नवीन आयुष्य आणि करियर ची बसलेली घडी मोडून आलेली स्पृहा बंगलोरच्या नवीन वातावरणाशी व नवरा म्हणून सारंग शी जुळवून घेण्याचा आटोकाट प्रयत्न करत होती. त्यात घरचे सगळे एकटीने बघण्याची सवय नसल्यामुळे तिची तारांबळ उडू लागली. त्यात तिलाही नोकरीची संधी चालून आली. तिने ती स्वीकारली. पण नवीन नोकरी, त्यासाठीचा प्रवास व घराची जबाबदारी व नवीन शहर हे सगळं एकदम अंगावर आल्यामुळे ती भांबावून गेली. घरातले सगळे ती तिच्या परीने नीट करण्याचा प्रयत्न करत होती. पण सारंगला सगळं त्याच्या आईने केले तेच बघायची सवय होती. स्पृहा तिच्या पद्धतीने काही करायला गेल्यास सारंग ते खोडून काढून त्याच्या आईची पद्धत सांगायचा. सुरुवातीला स्पृहाने ऐकून घेतले. पण रोजचेच झाल्यावर तिला राग येऊ लागला. पण वाद नको म्हणून ती गप्प बसायची. सगळं मनात ठेवल्यामुळे तिची घुसमट होऊ लागली. आणि घरात आणखी काही चुका होऊ लागल्या. जसं भाजी आणायला विसरणे, दूध संपले आहे हे विसरणे, दही लावायला विसरणे...
सारंगला त्याच्या आईची म्हणजेच मुरलेल्या गृहिणीचा संसार बघायची सवय असल्यामुळे त्याला ह्या साध्या साध्या चुका नवीन होत्या. त्यात त्याला बहिणहि नाही. त्यामुळे हल्लीच्या मुलींना कामाची सवय नसते, संसारात मुरायला वेळ लागतो हि बाब त्याच्या लक्षात येईना. त्याच्या मते मुलींना हे सगळ जमलेच पाहिजे. एकदा बोलता बोलता तो तिला बराच बोलला, “आता तू एक अल्लड मुलगी राहिलेली नाहीस. एक संसारी बाई झाली आहेस. तुझ्या आईने तुला इतक्या साध्या गोष्टी शिकवल्या नाहीत? माझी आई नाही का करत? सगळ्या बायका हे नीट करतात. मग तुला ह्या सध्या सोप्या गोष्टी का जमू नये ?” हे सगळ ऐकून स्पृहा वैतागली. मुळात तिचा स्वभाव काही ऐकून घ्यायचा नव्हता. त्यात ती सगळ करायचा प्रयत्न करत होती पण तिला तिचाच जवळचा मित्र, प्रियकर सारंग ह्यानेच समजून घेऊ नये? आधीचा सारंग हाच का असा तिला प्रश्न पडायला लागला. तिच्या मनाला ह्या गोष्टी फार लागल्या. आणि एक दिवस तिच्या संयमाचा बांध फुटला.
एक दिवस सारंग ऑफिस मधून घरी आल्यावर म्हणाला उद्या शनिवार आहे. आपल्या दोघांनाही सुट्टी आहे. उद्या काहीतरी स्पेशल बनवतेस का? मस्त भरली वांगी आणि मसालेभात कर. आई करते तसा! झालं!” स्पृहाला राग आला. इतके दिवस साठलेलं सगळ बाहेर पडल. “मी कशाला करू? तुझ्या आईलाच सांग न कुरियर करायला. नाहीतर एक काम कर. जा तुझ्या आईकडे आणि खा मनसोक्त काय खायचं ते. नाहीतरी मी काही केलेलं तुला काही पटत नाही,आणि आवडतही नाही. मी कशाला माझी एनर्जी वाया घालवू मग ?” स्पृहा हे आणि असं बराच काही बोलली. त्यावर सारंगचाही पार चढला. आणि त्याचं पर्यावसान कडाक्याच्या भांडणात झालं. आणि हे असं भांडण हळू हळू छोट्या छोट्या कारणांवरून दर दोन तीन दिवसांनी होऊ लागलं. अशातच स्पृहाची तब्येत बिघडली. डॉक्टरांनी निदान केल कि स्पृहा आणि सारंग आई बाबा होणार आहेत. स्पृहाला वाटलं आता तरी भांडणं’ कमी होतील. तशी ती मी झालीही आणि स्पृहाने एका गोड मुलीला जन्म दिला. बाळाच नाव हौसेनी सानिका ठेवल. आईकडून बंगलोर ला परत आल्यावर स्पृहाने नोकरी सोडायचा निर्णय घेतला कारण बाळाला डे केअर मध्ये ठेवून तिला बाळाची आबाळ करायची तिची इच्छा नव्हती.
स्पृहाने तिचे संपूर्ण लक्ष आता फक्त सानिका वर केंद्रित केले. सानिकाचं सगळ करण्यात तिचा सगळा दिवस निघून जात असे. सुरुवातीला स्पृहाला हे हि रुटीन आवडले. पण सानिका दोन वर्षाची झाल्यावर स्पृहाला घरात बसून डिप्रेशन येऊ लागले. आई वडिलांखेरीज इतर कुणावरही तिला आर्थिक दृष्ट्या अवलंबून असण्याची सवय नव्हती. पण नोकरी सोडल्यापासून सारंग कडे पैसे मागताना तिलाच गिल्टी वाटू लागले आणि ह्याचाही तिला मानसिक त्रास होऊ लागला. इकडे सारंग सुद्धा स्पृहाशी पूर्वीसारखा न वागता, तिला समजून न घेता तिच्याकडून सतत आदर्श आई, आदर्श बायको आदर्श सून होण्याची अपेक्षा करायचा. दिवसभर सानिका मागे तिची दमछाक झाल्यावर ऑफिस मधून आल्यावर तरी त्याने सानिकाला बघावे व तिला थोडा मोकळा वेळ द्यावा अशी स्पृहाची अपेक्षा होती. तिने अनेक वेळा सारंग ला असे बोलूनहि दाखवले.पण सारंग ला वाटायचे कि “मी दिवसभर ऑफिस मधून काम करून थकून घरी येतो. तर हिची अपेक्षा मी घरी आल्यावरही काम करावं ? हि दिवसभर घरीच असते आरामात आणि तरी हिला स्वतःसाठी वेळ पाहिजे? काय तीर मारणार आहे हि असा?” हा सगळा विचार करून सारंगची चिडचिड होऊ लागली.
इकडे स्पृहा ला स्वतःकडे लक्ष द्यायला अजिबात वेळ मिळायचा नाही. दिवसभर दमल्यावर सानिकाने काही कारणाने रात्री सुद्धा जागवलं कि हिची अपेक्षा असायची सारंग ने सुद्धा थोड्यावेळ सानिकाला बघावे. आणि सारंग ला वाटायचे कि हि दिवसभर घरीच असते, मी ऑफिस मध्ये कामात असतो , दमतो तरी रात्रीहि मी जागावं अशी कशी अपेक्षा करू शकते हि? दोघांच्याही एकमेकांबद्दलच्या अपेक्षा पूर्ण होत नसल्यामुळे हळू हळू दोघातला दुरावा वाढत गेला. घरी आल्यावर हि सारखी कम्प्लेंटच सांगते असा विचार करून सारंग स्पृहाशी घरात संवाद साधेनासा झाला. घरी आल्यावर स्वत:च्या सोयीने सानिकाशी खेळायचं, जेवायचं, झोपायचं आणि दुसऱ्या दिवशी परत उठून स्वतःचं आवरून ऑफिस ला जायचं. सुट्टीच्या दिवशी आराम करायचा आणि बाहेरची काही कामं करायची. हे इतकच सारंगच आयुष्य होतं. त्याच्या आयुष्यात त्याने स्पृहाला कुठल्याही प्रकारे जागा ठेवली नव्हती. सानिकासाठी जीव सुद्धा काढून देईल असं त्याच बापाचं प्रेम होतं. पण बाप होण्यासोबतच तो एक नवराही आहे हे तो विसरत चालला होता.
सारंग आपल्याशी पूर्वीसारखा वागत नाही, आपल्याला टाळतो, कामापुरतच बोलतो. आपल्याशी बोलत नाही ,आपल्याला साध कशी आहेस हे हि विचारत नाही , त्याला आपल्या कुठल्याही कामाची किंमत नाही, सतत चुकाच दिसतात. सतत मी कशी वाईट आहे हेच सांगत असतो ह्या विचारांनी स्पृहाला आणखी डिप्रेशन येऊ लागलं. तिची छोट्या छोट्या कारणावरून चिडचिड होऊ लागली आणि राग कधी कधी बिचार्या छोट्या सानिकावर निघू लागला. कुणाशी शेअर करावं म्हटल तर नवीन शहरात आणि काही महिन्यांच्या नोकरीत अशी जवळची मैत्रीसुद्धा कुणाशी झाली नव्हती. घरी आई बाबांना टेन्शन नको म्हणून ती त्यांनाही काही सांगत नव्हती. तिला कळत होतं कि सानिकावर राग काढणं चुकीचं आहे. आपण हे सगळं सारंगशीच नीट बोलायला हवं. तस तिने त्याचा मूड बघून बोलायचा प्रयत्न केलासुद्धा. पण सारंगच म्हणणं “ स्पृहा , तुझ्या स्वभावातच प्रॉब्लेम आहे. तू तुझा स्वभाव बदल. म्हणजे सगळ नीट होईल. आणि घरातल करतेस म्हणजे माझ्यावर उपकार करत नाहीस. माझ्या आईनेसुद्धा हेच केलं आणि जगातल्या सगळ्या बायकासुद्धा हेच करतात. त्यात काय एवढं विशेष?” हे ऐकून स्पृहा रात्रभर रडत राहिली आणि सारंगला गाढ झोपलेलं पाहून तिच्या मनात त्याच्याविषयी चीड उत्पन्न झाली.
सारंगला आपल्याविषयी काहीच वाटत नाही आणि ह्या घरात आपली काहीच किंमत नाही ह्या विचारांनी स्पृहाला घेरलं. तिच्या मनात नको नको ते नकारात्मक विचार यायला लागले. पण सानिकामध्ये तिचा जीव अडकलेला असल्यामुळे तीच मन टोकाची भूमिका घ्याला धजावत नव्ह्तं.
एकदा अशीच उदास बसलेली असताना सानिकाला तिच्या जुन्या मैत्रिणीचा नेत्राचा फोन आला. आणि स्पृहाच्या बोलण्यावरून, तिच्या आवाजावरून नेत्रा ला जाणवलं कि काही तरी प्रॉब्लेम आहे. म्हणून तिने स्पृहा ला खोदून खोदून विचारला आणि स्पृहाचा बांध फुटला. एक तास भर ती हमसून हमसून रडत होती आणि मनात इतक्या दिवसाचं साठलेल्या दुःखाचा निचरा करत होती. शेवटी शांत होऊन तिने फोन ठेवला. त्या दिवशी स्पृहा जरा शांतपणे झोपली. पण इकडे नेत्राला तिची खूप काळजी वाटू लागली. रागाच्या भरात आणि डिप्रेशन मध्ये हिने काही वेडं वाकडं पाउल उचललं तर? ह्या कल्पनेनीच नेत्रा अस्वस्थ झाली. दुसऱ्या दिवशी परत तिने स्पृहाला फोन केला आणि बजावलं कि काहीही झालं तरी ती टोकाचं पाउल उचलणार नाही. तिने स्पृहाला सल्ला दिला कि तिने एखाद्या कौन्सिलर कडे जावं. ते नक्की काहीतरी मदत करू शकतील. स्पृहाला तिचं म्हणणं पटलं. तिने लगेच एका चांगल्या कौन्सिलर चा नंबर शोधून appointment घेतली. प्रश्न हा होता कि सारंग ला कसे पटवून द्यायचे.
तिने सारंग घरी आल्यावर मनाचा हिय्या करून त्याच्यापुढे हा विषय अतिशय शांतपणे मांडला. त्याने तिचे बोलणे काही सिरीयसली घेतले नाही. उलट तिच्याच स्वभावाला दोष देऊन तिच्याच चुका दाखवून त्यावर , “तिसरा माणूस तुझी काय मदत करणार आहे जोवर तू सुधारत नाहीस तोवर काही होऊ शकत नाही” असं बोलला. आता मात्र स्पृहा चा संयम संपला. तिने त्याला शांतपणे विचारले, “तुझा माझ्यातला इंटरेस्ट संपलाय का? बाहेर कोणी दुसरी मुलगी आवडायला लागलीये का? तसं असेल तर स्पष्ट सांग. मी माझ्या मुलीला घेऊन निघून जाईन. पण माझं आयुष्य असं बरबाद करण्याचा तुला काहीही हक्क नाहीये. हे असं आयुष्य मी जगू शकत नाही. मी कुठलाही गुन्हा केलेला नाहीये कि तू मला त्याची इतकी मोठी शिक्षा द्यावी. तुला जर हे नातं टिकवायची इच्छा असेल तर तू उद्या माझ्यासोबत कौन्सिलर कडे येशील. नाही आलास तर मी इथून निघून जाईन. कुठे जाईन ते तुला काय कोणालाही सांगणार नाही. तुझं माझ्यावर प्रेम आहे म्हणाला होतास म्हणून तुझ्याशी लग्न केलं मी! ह्याला जर प्रेम म्हणत असतील तर जगात कोणीही कोणावर प्रेम करू नये. तू रात्रभर विचार कर. सकाळी काय ते मला सांग.” असं म्हणून स्पृहा सानिका ला घेऊन झोपली.
सारंगला ने विचार केला, “हि नेहमीसारखी बडबड करून झोपलीये , सकाळी होईल सगळ नॉर्मल. कशाचा इतका प्रॉब्लेम झालाय हिला काही कळत नाहीये. उगाच इश्यू क्रीएट करतेय. रिकाम्या डोक्याला काही काम नाही म्हणून विचित्र विचार करत बसलीये. काय नवीन खूळ काढलय कौन्सिलरचं काय माहित!” असा विचार करून स्पृहाचं बोलणं अजिबात सिरीयसली न घेता सारंगही झोपला. दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर स्पृहाने परत त्याला थंड स्वरात विचारले. “काय ठरलं तुझं?” सारंग ने तिला म्हटल ,” काय एक एक खूळ डोक्यात घेऊन बसली आहेस? सोड ना आता! काय इतका इश्यू करतेयस?” स्पृहाला हे नवीन नव्हत. खरं तर तिला माहित होतच कि सारंगची हीच reaction असेल. म्हणून तिने परत क्लीअर केलं. “ सारंग , तुला जर माझी आणि आपली नात्याची पर्वा असेल तर विचार कर. हवं तर आज संध्याकाळपर्यंत वेळ घे. आणि संध्याकाळपर्यंत मला निर्णय सांग. इतके दिवस थांबलेय तर आज संध्याकाळपर्यंत थांबणं जड नाही मला. पण आज मला तुझा निर्णय नक्की हवाय कारण ह्यापुढे माझ्या आयुष्यातला एकही दिवस मला असा घालवायचा नाहीये. पूर्ण आयुष्य रडत आणि मन मारत जगणं आता मला जमणार नाही.” स्पृहाने शांतपणे सारंग ला सांगितलं.
स्पृहाचं हे रूप सारंग साठी नवीन होतं. त्याला लक्षात आलं कि स्पृहाने नक्की काहीतरी मनाशी पक्क ठरवलंय. तो स्वत:च्या वागण्याचा विचार करू लागला. खरच काही चुकतंय का आपलं? ह्याच विचारात तो ऑफिस ला गेला. ऑफिस मध्ये सुद्धा त्याचं आज कामात लक्ष नव्हत. ऑफिस मधील बाकी लोक आज चॉकलेटडे साजरा करत होते . पण ह्याच कशातच लक्ष नव्हत. अचानक त्याला ऑफिस मधल्या त्याच्या मित्राने आरवने चॉकलेटदिलं व म्हणाला ,”क्या सारंग भाई.. आज कुछ खोये खोये लाग रहे हो! काही भाभी के साथ valentine’s day कहि जाने का प्लान तो नहि बना रहे? चलो कोई नही. Happy chocolate day.. आप लगे रहो अपनी खयालो कि दुनिया में! हम चलते है ! “ आरव ने दिलेलं चॉकलेटपाहून सारंग ला अचानक आठवलं कि स्पृहाला सुद्धा चॉकलेटकिती आवडतं! कित्येक वर्षात आपण तिला चॉकलेटसुद्धा दिलं नाही. आपण खरंच तिच्या आवडी निवडी विसरत चाललोय का? खरंच आपण ती म्हणतेय तस तिला गृहीत धरून इग्नोर करतोय का? आज चॉकलेटडे.. पाच वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी तिला मी प्रपोज केलं होतं आणि आयुष्य एकत्र घालवायच वचन दिलं होतं. आणि आज काय परिस्थिती आहे?” सारंग च्या डोक्यात विचारांचा नुसता गुंता झाला होता. काय करावं काय करू नये ह्याचं त्याला प्रचंड टेन्शन आलं. आणि तेवढ्यात त्याच्या मित्राने लंच साठी त्याला हाक मारली आणि सारंग ची तंद्री भंगली.
डबा उघडल्यावर त्याला लक्षात आलं आज स्पृहाने वांग्याची भाजी दिलीये. त्याला आवडते तशी. सारंग ला गिल्टी वाटू लागलं. त्याचं जेवणात सुद्धा लक्ष लागेना! त्याने स्पृहाला फोन केला. त्याला काय बोलावं ते सुचत नव्हतं. त्याने फक्त “सानू शाळेतून आली का आणि काय करतेय हे विचारलं.” स्पृहाने एका वाक्यात उत्तर दिलं. “हो. आलीये. जेवून झोपलीये. अजून काही? “ आणि सारंगने शेवटी विचारलं ,” आज संध्याकाळी किती वाजता जायचंय ?” स्पृहाला तिच्या कानांवर विश्वास बसला नाही. पण तरी तिने “सात वाजता बोलावलंय!” सारंग म्हणाला, “ठीक आहे. मी सहा पर्यंत घरी पोचतो. तयार राहा.” ह्यावर कंठ दाटून आलेली स्पृहा इतकाच म्हणू शकली ,” थॅंक यू वेरी मच सारंग”.. फोन ठेवून सारंग कधी घरी येतो ह्याची स्पृहा वाट बघू लागली. इकडे सारंगचाही ऑफिस मध्ये वेळ जात नव्हता. त्याने काहीतरी विचार केला आणि चार दिवस सुट्टीसाठी अप्लाय केले. बॉस कडून लगेच सुट्टी मंजूरदेखील करून घेतली व आपल्या ट्रॅवेल एजंट मित्राकडून इमर्जन्सी मध्ये काही बुकिंग्स करून घेतली. ऑफिस मधून घरी येताना तो नाक्यावरच्या दुकानात थांबायला विसरला नाही. तिकडून स्पृहाच्या आवडीच्या चॉकलेटस चा बॉक्स घेतला. आणि घरी गेल्या गेल्या त्याने तो बॉक्स तिला दिला आणि म्हणाला, “हॅपी चॉकलेटस डे डियर”.. तिने हि तो बॉक्स स्वीकारून त्याला गोड अशी स्माईल दिली. तिला दुसरं काय हवं होतं म्हणा? आपल्या नवर्याकडून, आपल्या जवळच्या मित्राकडून थोडं प्रेम , थोडी काळजी, थोडं अटेन्शन.. इतकच हवं होतं तिला.
ठरल्याप्रमाणे दोघेही कौन्सिलर कडे गेले. जो प्रॉब्लेम होता तो कौन्सिलरच्या मदतीने सोडवायचा प्रयत्न करायचे ठरवले. कौन्सिलर कडून आल्यावर सारंगने स्पृहाला चार दिवस गोवा ट्रीपचं सरप्राईज दिलं. दोघांनीही ह्या ट्रीप मध्ये फक्त एकमेकांना वेळ देऊन मागच सगळ विसरून नव्याने पुढचं आयुष्य सुरु करण्याचा निर्णय घेतला. आणि आई बाप झालो असलो तरी आपण नवरा बायकोही आहोत हे न विसरण्याचा दोघांनीही धडा घेतला.
Chan lihiles aahes.go ahead.
ReplyDeleteChan lihiles aahes.go ahead.
ReplyDeleteWow..nice (y)
ReplyDelete