Friday, July 22, 2016

चक्रव्यूह

I beg to disagree !" अतिशय मंजुळ पण आत्मविश्वासपूर्ण आवाज कॉन्फरन्स रूम मध्ये घुमला आणि आपल्याच प्रेझेंटेशनमध्ये गुंगलेल्या हर्षदने अविश्वासाने मागे वळून पाहिले! हर्षद क्षीरसागर, HK ग्रुपचा चेअरमन. फर्स्ट जनरेशन बिझिनेसमन. सेल्फ मेड मॅन. कोट्याधीश. आपले कोणतेही निर्णय कधीच चूक नसतात ह्याचा अभिमान बाळगणारा. आणि काही चुकले तरी "मेरे मन को भाया मै कुत्ता काट के खाया" ह्या टेचात वावरणारा. थोडक्यात आलम दुनियेची पर्वा न करता आपल्याच धुनकीत जगणारा मस्त कलंदर. त्याला विरोधाची सवयच नव्हती. त्याचे मुख्य कारण असे की त्याला विरोध करायचा म्हणजे त्याच्यापेक्षा जास्त अक्कल असणे आवश्यक होते किंवा नोकरी गमवायची तयारी आवश्यक होती. ह्या दोन्ही गोष्टींचा अभाव स्टाफ मेम्बर्सपैकी प्रत्येकात असल्याने कोणी त्याच्या वाटेला जात नसे. हर्षदही शक्यतो धंद्यात चुकत नसे. त्याचे आजवरचे बहुतेक निर्णय लॉन्ग टर्म मध्ये योग्यच ठरले होते. जे चुकले त्यातून त्याने स्वतः धडे घेतले होते. पण आजवर त्याला तू चुकतो आहेस हे सांगणारे ऑफिसात कोणीच भेटले नव्हते. त्यामुळे ते वाक्य ऐकून हर्षद अविश्वासाने मागे वळला. कॉन्फरन्स रूममध्ये दडपणयुक्त शांतता पसरली! त्या आवाजाच्या दिशेने पाहात हर्षद म्हणाला "come again please!" तोच आवाज आणखी निर्धाराने आला "मला हा निर्णय कंपनीच्या हिताच्या दृष्टीने जरा रिस्की वाटतो आहे. This will impact the top line badly and also the reputation of the organisation!" मानसी पटवर्धन, फक्त हुशारीच्या जोरावर सीए आणि एमबीए करून दहा वर्षांचा अनुभव गाठीशी घेऊन HK मध्ये व्हीपी फायनान्स म्हणून काही दिवसांपूर्वीच रुजू झाली होती. HK मध्ये, विशेषतः हर्षद समोर डेसिग्नेशला फारसा अर्थ नसे. हर्षदने घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी करण्यासाठी पाचशेच्या वर स्टाफ पगार घेत होता. त्याच्या दृष्टीने त्यातीलच एक "जरा जास्त पगार घेणारी" ह्या पलीकडे फारसे महत्व नसलेली बाई आज त्याला मॅनेजमेंट टीम समोर चॅलेंज करत होती. चक्क तू चुकतो आहेस असे खुल्ला सांगत होती! "ओह. आपण जे काही म्हणालात ते जरा डिटेल मध्ये समाजवाल का आम्हा सर्वांना?" इतके कुत्सितपणे म्हणत हर्षद त्याच्या गुबगुबीत चेयरमध्ये कॉफी सिप करत बसला आणि मानसीला समोर येऊन बोलायची त्याने सूचना केली. मानसी शांतपणे चालत पुढे आली आणि हर्षदचेच प्रेझेंटेशन एक एक स्लाईड करत दाखवत, त्यावर आपले मत मांडत आपले मुद्दे डेटा पॉइंट्ससह शाबीत करत गेली. हर्षदला तिची हुशारी, आत्मविश्वास, ज्ञान आणि मुख्य म्हणजे हिम्मत ह्याचे मनोमन कौतुक वाटत होते. तिचे प्रेझेंटेशन संपले. हर्षद हातात पेन फिरवत, पेनाकडे बघत विचारात गुंगला होता. दोन मिनिटे शांततेत गेली. सगळेजण हर्षदच्या प्रतिसादाची वाट बघत होते. अचानक हर्षद उठून उभा राहिला. बाकी सर्व लगबगीने उठले. "Gentleman let me think through this. Wait for my mail tomorrow." इतके म्हणून हर्षद निघून गेला. जाताना फक्त एक कटाक्ष मानसीकडे टाकून. ती शांतपणे आणि त्याच आत्मविश्वासाने उभी होती. सुंदर चेहर्यावर मोहक स्माईल लेऊन. आपल्या केबिन मध्ये आल्यावर हर्षद विचारात पडला. म्हटलं तर त्याला मानसीचं डेरिंगबाज वागणं आवडलं होतं. पण कुठेतरी इगो दुखावल्यामुळे तिचा रागही येत होता. इतकी वर्ष आपल्या मनाला येईल ते डिसिजन घेणारा हर्षद आज विचारात पडला होता. इकडे ऑफिस मध्ये मात्र उद्या काय मेल येणार ह्याची कुजबुज सुरु होती. काही जणांना मानसीचे कौतुक वाटत होते. काही जेलस लोक कशी बॉस ची जिरली ह्याच विचाराने सुखावले होते तर कंपनीतल्या काही सिनियर लोकांना मानसीच्या जॉबची चिंता लागून राहीली होती कारण त्यांना त्यांच्या बॉसचा स्वभाव आणि आधीच्या एमप्लॉयीजचा इतिहास हे सगळे ठावूक होते. “हर्षद सर , आठ वाजलेत. आजही उशिरापर्यंत काम करणार आहात का?” अरुणने म्हणजेच कंपनीतल्या प्यूनने त्याच्या बॉसला नेहमीप्रमाणे विचारले. “काका तुम्ही बाकी सगळं बंद करून व्हा पुढे. मी माझं काम झालं कि निघेन. मला आज वेळ लागणार आहे. तुम्ही जा घरी. उगाच तुमचा खोळंबा नको. चाव्या नेहमीप्रमाणे watchman कडे ठेवतो मी. “ हर्षद ने त्याच्या चांगुलपणाच्या नेहमीप्रमाणे प्यून ला घरी पाठवले आणि कामं करीत बसला. वर्कोहोलिक असलेल्या हर्षदच्या डोक्यात फक्त कामाचेच विचार असल्यामुळे लग्न बिग्नाचा विचार त्याने घरचे मागे लागून लागून कंटाळले तरी कधी केला नव्हता. म्हणूनच ऑफिस मध्ये उशिरापर्यंत काम करण्याची लक्झरी त्याच्याकडे होती. शेवटी जेव्हा भुकेची जाणीव झाली तेव्हा रात्री अकरा वाजता त्याने ऑफिस बंद केले आणि पार्किंग मधून बाईक काढून तो निघाला. एका कंपनीचा मालक असला तरी हर्षद ला चारचाकी गाड्यांचे कधीच आकर्षण नव्हते. त्याचे फर्स्ट लव्ह होते बाइक्स आणि स्पीड. नेहमीप्रमाणे हेल्मेट घालून निर्मनुष्य रस्त्याने तो निघाला. अशाच एका निर्मनुष्य गल्लीतून जाताना त्याला एक माणूस जखमी अवस्थेत जीव मुठीत घेऊन पळताना दिसला. आणि त्याच्या मागे दोन माणसे हातात कोयता आणि तलवार घेऊन त्याच्या मागे पळत होती. तो माणूस नेमका हर्षद च्या गाडी समोर येऊन पडला आणि त्याला वाचवायला म्हणून हर्षदने करकचून ब्रेक मारला आणि गाडी थांबवली. त्याला मदत करणार इतक्यात ती दोन माणसे आली आणि त्या जखमी माणसावर सपासप कोयत्याचे वार करून त्या माणसाला जागीच ठार केले. वर हर्षदलाही धमकी दिली कि ह्या प्रकरणाची कुठे वाच्यता केल्यास त्याची अवस्था सुद्धा त्या ठार मारलेल्या माणसासारखीच होईल. जे काय डोळ्यासमोर दिसतंय ते समजेपर्यंत ती माणसं निघून गेली होती आणि हर्षद समोर पडला होता एका अनोळखी पुरुषाचा रक्तबंबाळ मृतदेह. ते सगळं बघून हर्षदला घेरी आली आणि भयंकर भीती वाटली .त्याच्या अंगाला दरदरून घाम फुटला आणि त्याला त्या मारेकर्यांचे बोलणे आठवले. त्याने गाडीला किक मारली आणि तो कसाबसा घरी पोचला. त्याची तहानभूक सगळीच मेली होती. पायातील बूट काढून कसाबसा बेडवर आडवा पडला आणि त्याचे विचारचक्र सुरु झाले. त्याच्या मनात भीती बसली. आता ती माणसं आपला जीव तर घेणार नाही ना ? काय करावं आता? ती माणसं आपला पत्ता शोध घरी किंवा ऑफिस मध्ये तर नाही येणार ना?ह्या विचारांनी त्याचं डोकं भणाणून गेलं. ह्याच विचारात त्याला पहाटे केव्हातरी झोप लागली आणि जेव्हा जाग आली तेव्हा सकाळचे दहा वाजून गेले होते. हर्षदच्या आई वडीलांना हर्षद चे हे अनियमित रुटीन नवीन नव्हते.त्यामुळे रात्री उशिरा आला म्हणून आईनेही त्याला उठवले नाही. हर्षद उठला तेव्हा त्याचे डोके घणाचे घाव घातल्याप्रमाणे दुखत होते आणि ताप चढला होता. त्याने सेक्रेटरीला “आज येणार नाही” चा मेसेज टाकून घरीच आराम करण्याचे ठरवले. नाहीतरी कालच्या घटनेमुळे आज त्याचे लक्ष ऑफिस च्या कामात लागणे शक्यच नव्हते. त्याने आईला बोलावून औषध मागितले, आणि सेक्रेटरीला “ Not feeling well. On leave today. If anything urgent, let Mr. Pushkar handle the matter.” असा मेसेज टाकून तो परत बेड वर आडवा पडला. झोप येणे शक्यच नव्हते. “असे किती दिवस घरात बसून राहणार? किती नुकसान सहन करणार! I must tell this to someone. येस. पुष्कर.. पुष्करशी बोलायला हवे. पुष्कर नक्की मला मदत करेल.“ हर्षदने विचार केला व पुष्कर ला ऑफिस नंतर सरळ घरीच यायला सांगितले. पुष्कर म्हणजे हर्षदचा जवळचा मित्र. कंपनी सुरु झाल्यापासून त्याचा पहिला एमप्लॉयी आणि आता HK ग्रुप चा चेअरमन. हर्षद नंतर पुष्करच कंपनीचा सर्वेसर्वा होता. संध्याकाळी पुष्कर आल्यावर हर्षदने पुष्करला सगळे सांगितले आणि हताशपणे शून्यात नजर लावून बसला. जे घडले ते ऐकून पुष्करलाही धक्का बसला पण त्याने हर्षद ला सांगितले कि “ टेन्शन घेऊ नकोस. ते लोक तुला काही करणार नाहीत. त्यांना तुला काही करायचं असतं तर कालच केलं असतं जे त्यांच्यासाठी सोपं होतं. फक्त आता हे सगळं विसरून जा आणि कुठेही वाच्यता करून स्वतःचा जीव धोक्यात घालू नकोस. आणि उद्यापासून तुझं रुटीन नेहमीसारखं सुरु कर. आणि त्या मिस.मानसीचे काय करायचे ठरवले आहेस?” हर्षदला पुष्करशी बोलून जरा हलके वाटले आणि त्याचे बोलणे पटले. त्याने सांगितले कि मानसीविषयी त्याने काही ठरवले नाही. पण मुलगी हुशार आहे आणि मुख्य म्हणजे धीट आहे. थोड कंट्रोल मध्ये ठेवायला हवी. कारण तिच्या हुशारीचा कंपनीला फायदाच होणार आहे. तिच्या सजेशन्स चा विचार केला जाईल. “चल बाय! उद्या सकाळी ऑफिसला भेटू!” असं म्हणून पुष्कर गेला. दुसर्या दिवशी सकाळी हर्षद नेहमीसारखा ऑफिसला पोचला. केबिन मध्ये जाताच त्याला त्याच्या टेबलवर एक envelope दिसले. त्यावर ना पाठवणार्याचे नाव होते ना पत्ता. त्याने उत्सुकता म्हणून ते उघडून बघितले तर त्यात एक ग्रीटिंग कार्ड होते, ज्यावर लिहिले होते कि “टेक केअर हर्षद. आय नो युअर लिटील सिक्रेट.” हे वाचून हर्षदला चक्कर आली आणि तो खुर्चीवर कोसळला. जरा भानावर आल्यावर त्याने पुष्करला केबिन मध्ये बोलावून घेतले. पुष्करसुद्धा ते कार्ड पाहून हादरला. पण त्याने हर्षदला शांत राहण्याचा सल्ला दिला. आणि सांगितले कि कदाचित कुणीतरी मुद्दाम मस्करी केली असेल. परत असं काहीतरी झालं तर बघू काय करायचं ते. हर्षद शांत झाला खरा पण त्याला हे प्रकरण काही सोपे वाटत नव्हते. आपलं मन तो कामात रमवण्याचा पुरेपूर प्रयत्न करत होता खरा पण त्याच्या मनातून कालची भयंकर घटना काही जात नव्हती. दोन तीन दिवस असेच गेले आणि एक दिवस हर्षदच्या घरी एक कुरियर आले. त्यावरही पाठवणार्याचे नाव पत्ता काहीही नव्हते. आणि परत एका ग्रीटिंग कार्ड वर एक मेसेज होता. “हाय हर्षद! पोलिसांकडे जायचा विचारही करू नकोस. नाहीतर माहितीये ना काय होईल? “ हे बघून हर्षदच्या पायाखालची जमीनच सरकली. त्याने pAnic होऊन पुष्करला बोलावून ते कार्ड दाखवले. आता मात्र पुष्करने हर्षद ला प्रोफेशनल हेल्प घेण्याचे सुचवले. हर्षदचे contacs मोठे होते. त्यामुळे त्याने डायरेक्ट पोलीस कमिशनर अय्यर ह्यांची भेट घेऊन त्यांना सगळी कल्पना दिली. त्यांनी त्याला संपूर्ण सहकार्य करण्याबद्दल आणि त्याच्या सुरक्षेची काळजी घेण्याबद्दल आश्वस्त केले. त्यांचा खुनाचा तपास सुरुच होता त्यात त्यांना एक साक्षीदार सापडला होता. त्याने मारेकर्यांचे संपूर्ण वर्णन पोलिसांना सांगितले. दोन दिवसात पोलिसांनी खुन्यान्ना शोधून काढले. आणि तसे हर्षद ला कळवले. ती केस वैयक्तिक शत्रुत्वातून घडलेल्या गुन्ह्याची होती आणि मारेकरी सुद्धा हर्षद ला blackmail करू शकतील असे वाटत नव्हते. ते स्वतःच स्वतःच्या टोकाच्या रागातून घडलेल्या गुन्ह्यामुळे घाबरलेले होते. आणि हर्षद ने हेल्मेट घातलेले असल्यामुळे त्याला त्या लोकांनी पहिले नव्हते. गुन्हेगार पकडले गेले हि बाब पोलिसांनी जाहीर केली नाही कारण पोलिसांना हर्षदच्या blackmailers ना शोधून काढायचे होते. गुन्हेगार पकडल्या गेल्यामुळे हर्षद्ची भीती कमी झाली होती. तरी अनपेक्षित पणे परत त्याला एक निनावी ग्रीटिंग कार्ड मिळाले. ह्यावेळी परत त्याच्या ऑफिसच्या पत्त्यावर. त्यातही धमकीवजा संदेश होता. आता मात्र पोलिसांची खात्री पटली कि हे blackmailing कुणीतरी भलतीच व्यक्ती करतेय जिचा गुन्ह्याशी काहीही संबंध नाही.मात्र त्याला फक्त हर्षद ला मानसिक त्रास देण्यात रस आहे. पोलिसांनी हर्षदला परत परत आठवून बघायला सांगितले कि कोणाकोणाला ह्या घटनेबद्दल माहिती आहे. पण पुष्करखेरीज कुणालाही हर्षदने ह्या बाबतीत सांगितलेले नव्हते. संशयाची सुई पुष्कर वर आली होती पण पुष्करची चौकशी केल्यानंतर पोलिसांना तो निर्दोष आढळला. दिवस जात होते पण blackmailerचा शोध काही केल्या लागत नव्हता. आणि हर्षदला धमकीवजा संदेश असलेले ग्रीटिंग कार्ड मिळतच होते. त्यावर काहीच लिहिलेले नसल्यामुळे कुणी पाठवले , कुठुन पाठवले ह्याचा थांगपत्ता लागत नव्हता. एक दिवस पुष्कर आणि हर्षद सगळे कार्ड्स घेऊन बसलेले असताना पुष्करच्या लक्षात आले कि सगळे कार्ड्सवरील हस्ताक्षर एकच आहे. त्याला ते हस्ताक्षर कुठेतरी पाहिल्याचे आठवत होते पण नेमके कुठे हे कळत नव्हते. पहिल्यांदा कार्ड ऑफिसच्याच पत्त्यावर आले म्हणून त्याला संशय ऑफिस स्टाफ वरच येत होता. त्याने हि गोष्ट अय्यर साहेबांच्या कानावर घातली . राहून राहून त्याला वाटत होते कि कोण अशी हिम्मत करेल? इतका टोकाचा सूड कोण उगवेल? हर्षद विषयी स्टाफ मध्ये असंतोष होता पण त्याचा सूड घेण्यासारखं कुणीच नव्हतं. पण पोलिसांच्या मते कोण कुणाचं काय बोलणं मनाला लावून घेईल ह्याचाही भरवसा नाही. म्हणून पोलिसांनी हर्षदला ऑफिस स्टाफच्या हस्ताक्षराचे नमुने पाठवायला सांगितले. पण तेही काळजीपूर्वक! कारण नमुने घेताना blackmailerला संशय येत कामा नये. इतके दिवस गुप्तता पाळली तर थोडक्याने गडबड व्हायला नको म्हणून एक दिवस हर्षदने टीम बिल्डींग activity च्या नावाखाली सर्व स्टाफ चे हस्ताक्षराचे नमुने मिळवले. पोलिसांनी हस्ताक्षर तज्ज्ञाची मदत घेतली असता, त्यांना आढळले कि पंकजनामक सेल्स ऑफिसर च्या हस्ताक्षराशी ग्रीटिंग कार्ड मधील हस्ताक्षर मिळते जुळते आहे. हर्षद ला हे ऐकून धक्का बसला .कारण पंकज अतिशय शांत असं मुलगा होता. कामात कधीतरी काही चुका केल्या असल्या तरी तो कुणाच्या अध्यात न मध्यात असा होता. पण वेळी अवेळी कधीतरी त्यालाही हर्षदच्या फटकळपणाला सामोरे जावे लागले असल्याने त्याने असे केले असल्याची शक्यता होती. पोलीस स्टेशन मध्ये पंकज, पुष्कर आणि हर्षद बसले होते. सुरुवातीला पंकजने सगळं कबुल करण्यास नकार दिला. पण पोलिसी खाक्याचा दणका बसताच त्याने कबुली दिली. “हो. मीच केलयं हे सगळं. मीच सरांना blackmail केलं. आयतीच संधी चालून आली होती मला . ती का सोडू मी? सगळ्यांना मानसिक त्रास देणाऱ्या हर्षद क्षीरसागर ला मी मानसिक त्रास दिला. कारण हा माणूस अतिशय स्वार्थी आणि घमेंडी आहे. अतिशय अहंकारी आणि आत्मकेंद्रित आहे. स्टाफला तर हा कवडीमोलाची हि किंमत देत नाही. कुणाच्या चुका समजून घेत नाही. मला तर किती वेळा अपमानित केलंय ह्याने. पण जेव्हा मानसीने ह्याला challenge केलं तेव्हा ह्याचा इगो दुखावला. मला भीती वाटली कि आता हा मानसी ला काढून टाकणार. मी मानसी ला पहिल्यांदा पाहिलं तेव्हाच तिच्या प्रेमात पडलो. आणि म्हणूनच तिच्यासाठी काहीही करायची माझी तयारी होती. त्या दिवशी जेव्हा मानसीने ह्याची चूक सर्वांसमक्ष दाखवली तेव्हा हा मानसी ला जॉब वरून काढून टाकणार असं वाटलं होतं मला. आणि इतक्या हुशार मुलीच्या करियरची वाट लागू द्यायची नव्हती मला. खरं तर तेव्हाच बोलणार होतो सरांशी. पण सर आलेच नाहीत आणि मग पुष्कर सरांना फोन वर बोलताना ऐकलं आणि त्यांचा तुमच्या घरापर्यंत पाठलाग केला. तुमच्या नकळत तुमचं सगळं बोलणं ऐकलं आणि ह्या आयत्याच चालून आलेल्या संधीचा फायदा घ्यायचं मी ठरवलं. मानसिक त्रास काय असतो ह्याची कल्पना आलीच असेल ह्या माणसाला. आता तरी पुढे माणसांशी वागताना नीट वागेल हा!” इतकं बोलून पंकज थांबला आणि म्हणाला “मला हवी ती शिक्षा द्या. पण मानसीला काढू नका!” हे सगळं ऐकून हर्षदला धक्का बसला पण ह्यापुढे माणसांना कस्पटासमान न लेखता वागायचं त्याने ठरवलं. पुष्कर आणि पोलिसांच्या मदतीने खरा गुन्हेगार समोर आला होता आणि हर्षद चक्रव्यूहातून सहीसलामत सुटला होता. -वैदेही राजे –जोशी

7 comments:

  1. Khup chaan rangavlis katha.shevatparyant curiosity kayam rahate.keep it up!

    ReplyDelete
  2. Khup chaan rangavlis katha.shevatparyant curiosity kayam rahate.keep it up!

    ReplyDelete
  3. Khup chan suspense.keep it up.

    ReplyDelete
  4. Khup chan suspense.keep it up.

    ReplyDelete
  5. Suspense मस्त, कथा सहज पुढे जाते त्यात क्रुत्रिमता अजिबात नाही.

    ReplyDelete
  6. Suspense मस्त.कथा सहज पुढे जाते त्यात क्रुत्रिमता अजिबात नाही.

    ReplyDelete
  7. Suspense मस्त.कथा सहज पुढे जाते त्यात क्रुत्रिमता अजिबात नाही.

    ReplyDelete